□ स्वामी प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अक्कलकोट : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे प्रकट दिन उद्या रविवारी (ता. ३) र येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. कोरोना नियमावलीमुळे धार्मिक कार्यक्रमास मर्यादा होती. कोरोना ब-यापैकी आटोक्यात आल्याने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महाराष्ट्र निर्बंधमुक्त केलाय. त्यामुळे वटवृक्ष मंदिरात दोन वर्षानंतर भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
तब्बल दोन वर्षानंतर वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी स्वामींचा प्रकट दिन साजरा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
आज गुढी पाडव्यानिमीत्त हिंदू धर्म नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर चोळप्पा महाराजांचे वंशज व मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात महेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादूकांस पहाटेच्या काकडआरती नंतर देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात आला. सकाळी १०:३० वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रींच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४४ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन व भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पुजन झाले.
सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने शिरा प्रसाद वाटप केला.
Religious program after two years at Vatvriksha temple; Tomorrow is Swami’s day of revelation
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सालाबादप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मुळस्थान) अक्कलकोटच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उद्या रविवारी साजरा होत आहे. पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानचे विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहिले जाईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होवून स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न होईल.
यानंतर स्वामी प्रकट दिनानिमित्त दुपारी १२ ते १ या वेळेत प्रसिद्ध सुंद्रीवादक भिमण्णा जाधव यांचा सुंद्रीवादनाचा व दुपारी ४ ते ६ या वेळेत व्यंकटेश संगीत विद्यालय सोलापूर यांच्या वतीने रसिका व सानिका कुलकर्णी यांचा शास्त्रीय राग गायन व भक्ती संगीत सेवेचा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सादर होईल.
दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी – गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी वटवृक्ष मंदिरातील नुतन गाभारा स्वरूपातून स्वामी दर्शनाचा, पाळणा कार्यक्रम, भोजन महाप्रसाद, भजन, भावगीत, भक्तीसंगीत सेवा इत्यादी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने केले आहे.