● एकानेही पाडवा साजरा केला नाही ना गुढी उभारली
बार्शी : बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील वीर जवान विठ्ठल रामभाऊ खांडेकर (वय ४०) यांना काश्मिर मध्ये सेवा बजावत असताना वीरमरण आले. कासारवाडी येथे जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडुन सलामी देत शासकीय इतमामात पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
अमर रहे, अमर रहे..शहिद जवान विठ्ठल खांडेकर अमर रहे, वीर जवान तुझे सलाम या घोषणा यावेळी देण्यात आल्या. ओमकार या अवघ्या आठ वर्षाच्या चिमुरड्याने आपल्या वडीलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. त्यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. केंद्रीय राखीव पोलिस दलात असलेले खांडेकर सध्या काश्मिर मधील पुलवामा येथील छावणी मध्ये कार्यरत होते. त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या वीर मरणाचे वृत्त गावी येताच परिसरात शोककळा पसरली. शनिवारी गावात एकानेही पाडवा साजरा केली नाही. गुढी उभारली नाही. गाव शोकसागरात बुडाला.
शनिवारी (ता. २) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जवान विठ्ठल खांडेकर यांचे पार्थिव कासारवाडी येथे शासकीय वाहनातून घरी आणले. तेथे खांडेकर यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी केली.
Barshi: Funeral of Veer Jawan Vitthal Khandekar in a state funeral
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कासारवाडी-गोडसेवाडी रस्त्यावरील अंत्यविधी ठिकाणी पार्थिव आल्यानंतर मान्यवरांनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. सीआरपीएफ च्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडत आपल्या लाडक्या सहकारी जवानाला सलामी अर्पण केली. प्रेमळ व जिवाला जिव देणारा मित्र गमावल्याच्या प्रतिक्रिया मित्राकडून व्यक्त केल्या जात होत्या.
यावेळी आ.राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, सहायक कमांडर तानाजी केसरकर, बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, सपोनि शिवाजी जायपत्रे, डाॅ. बी.वाय.यादव, जयकुमार शितोळे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, असिफ तांबोळी, रमेश पाटील, डाॅ. संजय अंधारे, कासारवाडीचे सरपंच नितीन मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड, ग्रामसेवक राहुल गरड, राकेश मंडलिक, मंडळाधिकारी उमेश डोईफोडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
● आर्थिक परिस्थितीवर मात करून देशसेवेसाठी सीआरपीएफमध्ये भरती
विठ्ठल खांडेकर यांचे प्राथमिक शिक्षण गावात, ८ वी ते १० वी महाराष्ट्र विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालयात झाले. भरती होण्यापूर्वी त्यांनी फोटोग्राफी व इतरांकडेही काम केले. आर्थिक परिस्थितीवर मात करून ते २००४ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले. त्यांचे सेवेचे अवघे १६ महिनेच अद्याप शिल्लक होते. दरम्यान ते सेवेत असतानाच त्यांना वीरमरण आले. शहीद विठ्ठल खांडेकर यांच्या पश्चात वडील रामभाऊ, पत्नी सोनाली, मुलगा ओमकार, मुलगी स्नेहल, भाऊ सयाजी,भावजय, चार बहिणी असा परिवार आहे.