मुंबई : देवेंद्र फडणवीस ‘राज ठाकरे यांचं म्हणणं खरं आहे. क्रमांक एकचा भाजप पक्ष सत्तेच्या बाहेर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.
फडणवीस आज नांदेड दाै-यावर आले आहेत. त्यावेळी माध्यमांनी त्यांना राज ठाकरे यांनी शिवसेना राज्यातला दोन नंबरचा तर राष्ट्रवादी तीन नंबरचा पक्ष आहे असे म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे असे विचारताच फडणवीस म्हणाले राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली. भाजपने सेनेसाेबत युती केली हाेती. शिवसेनेच्या देखील चांगल्या जागा निवडून आल्या हाेत्या.
राज्यातील बहुमताचा अनादार करीत शिवसेनेने काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करत भाजपच्या पाठीत खंजीर खुपसत कपटाने सत्ता मिळवली हेच राज ठाकरेंनी काल सांगितल्याचे म्हणाले.
मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे.’ ही राज ठाकरे यांची भूमिका सर्वसामान्य हिंदूला आनंद देणारी आहे. राज यांच्या भाषणामुळे हिंदूह्रृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात म्हटले आहे. शिवसेनेने युती तोडून विश्वासघात केला असे आम्ही एकटे म्हणत होतो. आता राज ठाकरे देखील म्हणत आहेत.
मुसलमानांचे लांगुलचालन नको त्यांचा आदर केला पाहीजे. हेच मुद्दे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडले. त्यांचा भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. शिवसेनेने आमच्याशी विश्वासघात केला हे पूर्वी आम्ही एकटेच म्हणत होते. आता राज ठाकरेही म्हणू लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असे विधान त्यांनी केले. मी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे. काँग्रेसने राज्यात सुसंस्कृतपणे राजकारण केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जातीयवाद पसरवल्या आरोपही पाटील यांनी केला.
Fadnavis: What Raj Thackeray is saying is true, Sharad Pawar’s reply to Raj Thackeray’s criticism
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिले. ‘राज ठाकरे बरेच वर्षे हे कुठं भूमिगत झाले होते ते काल आले, दोन-चार वर्षे भूमिगत होतात, नंतर बाहेर येतात. एखादं व्याख्यान देतात आणि परत दोन वर्षे काय करतात हे मला माहित नाही, असं पवार म्हणाले. तसेच तीस वर्षे एखादी व्यक्ती काम करत असताना त्यांच्याच नावाची मागणी केली म्हणून अजित पवार यांची निवड झाली, असंही ते म्हणाले.
शरद पवारांनी आज राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे 3-4 महिने गायब होतात अन् मग एखादे व्याख्यान देतात. अन् मग परत एकदा गायब होतात असा टोला शरद पवार यांनी लगावला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर देतात. मग पुन्हा ३ ते ४ महिने भूमिगत होतात, अशा शब्दांत पवारांनी राज यांना टोला हाणला. राज यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट आहे. राज यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. राज यांना उत्तर प्रदेशात नेमकं काय दिसलं ते माहीत नाही.
योगी आदित्यनाथ यांच्या ५ वर्षांच्या राजवटीत तिथल्या प्रदेशात काय काय झालं, हे साऱ्या देशाने पाहिलं. लखीमपूर, उन्नाव, हाथरस अशा घटना सगळ्यांनी पाहिल्या. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. पण मला इथं सांगायचंय की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात असं काही होऊ देणार नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंवर ‘पवार स्टाईल’ वार केला.
□ कालची सभा राज ठाकरेंची नव्हती – संजय राऊत
राज ठाकरे यांच्या सभेवर संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की “भाजपचा लाऊड स्पीकर काल शिवतीर्थावर वाजत होता. काल राज ठाकरेंची नाही, भाजपची सभा झाली. राज ठाकरेंना कालची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली होती आणि सभेला भाजपचाच भोंगा होता. एवढंच नाही त्यांना मिळणाऱ्या टाळ्या देखील स्पॉन्सर होत्या.
राज ठाकरे यांच्या भाषणावर महाविकास आघाडी सरकारमधील नेते तुटून पडले आहेत. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, किशोरी पेडणेकर यांनी राज यांच्या भाषणावर टोलेबाजी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राऊतांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
भाजप आपली मळमळ राज ठाकरे यांच्या भोंग्यातून उतरवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम काम करत आहे. राज्य चांगल्या प्रकारे पुढे नेत आहेत,” असे राऊत म्हणाले. ”यूपी बिहारचा विकास व्हायला पाहिजे, पण राज्याचा विकास होतोय तो दिसत नाही,” असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला.
शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही देशातील मोठी माणसं आहेत. त्यांच्याबाबत बोलायचं आणि टाळ्या मिळवायच्या. तुम्हीही पवारांच्या चरणाजवळ सल्लामसलत करण्यासाठी जात होताच की… कशाला उगीच आपण टोलेजंग माणसावर बोलायचं”,” असं राऊत म्हणाले.