मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. 17 वर्षापूर्वी झालेल्या गैरव्यवहाराबाबत त्यांना ही नोटीस पाठवली असल्याचे समोर आले आहे. 2005 साली एका एनजीओच्या मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त होत्या. त्या एनजीओच्या बँक खात्यात एकाच दिवसात 1 कोटींच्यावर देणग्या जमा झाल्याने मेधा पाटकर यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राजकीय नेत्यांवर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई होत असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यासुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. ईडीने मेधा पाटकर यांना याप्रकरणी नोटीस बजावल्याची माहिती आहे. मात्र ईडी अधिकार्यांकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या एनजीओच्या खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याचा आरोप करणारी एक तक्रार त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे. 2005 साली म्हणजेच तब्बल 17 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून ईडीबरोबर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि प्राप्तिकर विभागातही (आयटी) पाटकर यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.
ED issues notice to Medha Patkar regarding malpractice, Medhatai’s revelation
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नर्मदा नवनिर्माण अभियान हा मुंबई चॅरिटी कमिशनर यांच्याकडे नोंदणी असलेला एनजीओ आहे. यात मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. याच एनजीओच्या बँक ऑफ इंडिया मधील खात्यात जून 2005 मध्ये एका दिवसात 1 कोटी 19 लाख 25 हजार 880 रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची माहिती आहे. ही सर्व रक्कम 20 वेगवेगळ्या खात्यांवरुन 5 लाख 96 हजार 294 रुपयांच्या एकसमान रकमेच्या व्यवहारांच्या स्वरुपात जमा झालेली आहे. ही रक्कम जमा करणार्या देणगीदारांपैकी एक देणगीदार अल्पवयीन असल्याचीही माहिती मिळते.
यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या बातम्या चुकीच्या असून त्याबद्दल स्वत: मेधा पाटकरांनी खुलासा केला आहे. ही बातमी पसरवण्यामागे राजकीय खेळी असून मुद्दामहून बदनामी करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मेधा पाटकर यांच्यावर 17 वर्षांपूर्वीच्या एका संशयित पैशाच्या व्यवहारावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ईडीसोबत महसूल गुप्तचर संचलनालय आणि आयकर विभागाने हा गुन्हा दाखल केला असल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मेधा पाटकर यावर स्पष्टीकरण देताना म्हणाल्या की, “ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. ही राजकीय खेळी आहे. जे कोणी ही तक्रार दाखल केली आहे ते गृहस्थ राजकीय पदाधिकारी असून त्यांनी आपली बदनामी करण्यासाठी हे आरोप केले आहेत. नर्मदा बचाव आंदोलनाचे गेल्या 30 वर्षांपासून आपण काम करत आहोत. 2004 पासून हा ट्रस्ट कार्यरत आहे. एकाच दिवसांमध्ये 20 जणांकडून एक कोटी रुपयांच्या वर निधी आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण त्याला कोणताही पुरावा नाही. त्यामुळे मुद्दामहून बदनाम करण्यासाठी हा आरोप करण्यात आला आहे.”