सोलापूर – आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात आज शिवसेनेचे किरीट सोमय्या यांचे हातोड्याने तोंडफोडो आंदोलन झाले.
महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून त्यांना नामोहरम करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या आता स्वतः घोटाळ्याप्रकरणी उघडे पडले आहेत .आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे या मागणीसाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी दुपारी पार्क चौकात आंदोलन झाले. शिवसेनेच्या कार्यालयासमोर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर प्रतीकात्मक हातोडा मारून सोमय्यांचे तोंडफोडो आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले.
भ्रष्ट सोमय्या हाय हाय, सोमय्यांच्या भ्रष्टाचाराने भाजपचा बुरखा फाडला, निषेध असो निषेध असो, किरीट सोमय्यांचा निषेध असो, सोमय्या मुर्दाबाद, ईडीचा राडा, सोमय्यांना गाडा, भ्रष्ट सोमय्यांची भाजपमधून हकालपट्टी झालीच पाहिजे, देशाची सुरक्षा सोमय्यांकडून वेशीवर, शिवसेना झिंदाबाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असो आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
२०१३ सालामध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती. केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यासाठी असमर्थता दाखविल्यानंतर सोमय्या पुढे आले आणि त्यांनी त्यासाठी रेल्वे स्थानक तसेच विमानतळावर डबे घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला. आयएनएस विक्रांत ही देशाची शान असल्यामुळे या भावनेपोटी सामान्यातील सामान्य माणसांनी सढळ हाताने मदत केली. इतकेच नव्हे तर नौदलाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा यासाठी हजारो रुपये दिले.
Solapur: Shiv Sena’s Kirit Somaiya’s hammer blowing agitation
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मात्र जमा झालेला हा कोट्यवधी रुपयांचा निधी राजभवनात पोहोचलाच नाही. या गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांचे सोमय्या यांनी काय केले ? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर माहितीच्या अधिकारात मिळालेली धक्कादायक माहिती देशासाठी चिंतेची बाब बनली आहे. किरीट सोमय्या यांनी गोळा केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी राजभवनात पोहोचवलाच नाही आणि दुसऱ्याचे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणण्याचे नाटक करणाऱ्या सोमय्या यांचे पितळ उघडे पडले. सोमय्या यांनी १०० कोटींचा घोटाळा करून सामान्य जनतेने आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी दिलेल्या पैशातून स्वतःच्या बांधकाम व्यवसाय व निवडणूक खर्चासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केला आहे .
आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे स्मारक तयार करण्यासाठी राजभवन येथे निधी जमा करण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला आणि तो स्वतः वापरल्याचा संशय असून अशा देशद्रोही कृत्यामुळे किरीट सोमय्याला राज्यातच नव्हे तर देशातही राहण्याचा अधिकार नाही. दुसऱ्याच्या घरावर हातोडा मारण्याचे नाटक करून प्रसिद्धी मिळविण्याचा स्टंट करणारे किरीट सोमय्या आता स्वतः च भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने किरीट सोमय्या यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे.
यावेळी उत्तर तालुकाप्रमुख शहाजी भोसले, उपतालुकाप्रमुख संजय पौळ , माथाडी सेना जिल्हाप्रमुख महेश भोसले, तालुका समन्वयक वजीर शेख, युवा सेना तालुका समन्वयक प्रसाद निळ, विभाग प्रमुख आच्युतराव बाभळे, प्रमोद गवळी, नंदू गवळी, नसीर शेख, दिपक भातलवंडे, विष्णु भोसले, अरूण जाधव, अर्जुन गायकवाड,सुरेश राठोड, किसन भोसले, विष्णु भोसले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.