□ घरावरून हटवला बोर्ड, पक्षाचा व्हॉट्सॲप ग्रुपही सोडला
पुणे : निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील मनसेचे मोठे नेते तात्या म्हणून ओळख असलेले वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आज मोरेंनी त्यांच्या घरावरुन ‘मनसे’चा बोर्ड हटवला असल्याचे वृत्तही सोशल मिडीयावर फिरत आहे. मस्जिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि मोरे यांच्यात मतभेद दिसून आले होते.
माजी नगरसेवक आणि मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात घेतलेल्या भूमिकेवरुन नाराज होवून आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशातच वसंत मोरे यांनी आज पक्षांतर्गत वादाला वैतागून पक्षाचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडला असल्याचे वृत्त खात्रीलायक सुत्रांनी दिले आहे. विभाग प्रमुख, मनसेचे प्रमुख नेते असलेला व्हॉट्सॲप ग्रुप मोरे यांनी सोडला आहे. याशिवाय राज ठाकरे यांच्याकडूनही मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे वृत्त आहे. पुण्यातील नाराज मनसे पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि साईनाथ बाबर यांना ‘शिवतीर्थ’वर पाचारण केले आहे. मात्र यात शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.
MNS’s Tatya Vasant More from Pune will join NCP?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, अशा भूमिकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होवून या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमधील चांदिवली, कुर्ला आणि अन्य भागात मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली आहे. तर काही ठिकाणी भोंगे लावण्याचा प्रयत्न करत असलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मात्र राज ठाकरे यांच्या याच आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. मोरे तात्या माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभागात बहुतांश मुस्लीम मतदार असल्याने मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपण प्रभागात शांतता ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यांवर पक्षाचे माजी शहराध्यक्ष अजय भोसले आणि राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी प्रश्न उपस्थित करत मोरे यांच्यावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर, नाराज असलेले मोरे राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
□ ‘पार्ट टाइम’ राजकारण करणाऱ्यांनी मला ‘पक्षनिष्ठा’ शिकवू नये
वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येत मी मनसे सोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करत ‘पार्ट टाइम’ राजकारण करणाऱ्यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये, अशी टीका पक्षातील पदाधिकाऱ्यांवर केली आहे. मनसेच्या मेळाव्यानंतर पुण्यात मनसेचे दोन्ही नगरसेवक या घोषणेमुळे अडचणीत आल्याची चर्चा होती. त्यानंतर मोरे यांनी प्रभागात शांतता ठेवण्यास आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
मोरे अप्रत्यक्ष ठाकरे यांचा आदेश धुडकावत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर भोसले आणि संभूस यांनी पत्रकार परिषद घेत मोरे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. त्याला मोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मोरे यांनी व्हॉटसअप स्टेटसवर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ठेवून मी इथेच बरा, असे सांगत मनसे सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
“पार्ट टाइम काम करणाऱ्यांनी मला पक्ष निष्ठा शिकू नये. कालपासून मला सर्वच पक्षाच्या ऑफर आल्या आहेत. पण, मी कोणाकडेही जाणार नाही. मी मनसेचे काम करणार आहे. ”
– वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसे