बार्शी : शेअर बाजारात भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 42 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल, वैभव आणि त्यांचे वडिल अंबादास फटे यांच्याविरोधात पोलिसांनी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल करणार्यांच्याच रकमेचा या दोषारोपपत्रात उल्लेख आहे. अनेक कारणांनी जे पोलिसांकडे जावू शकले नाहीत, अशा अज्ञात गुंतवणूकदारांच्या रकमेचा विचार केला तर हा आकडा शंभर कोटी रुपयापर्यंत पोहचू शकतो. मात्र त्याबाबतीत पोलिसांसमोर पुरावे न आल्याने त्याचा समावेश होऊ शकला नाही. अनेक गुंतवणूकदारांनी विशालची पत्नी राधिका आणि आई अलका हे देखील या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा शपथपत्रात उल्लेख केला असला तरी त्यांच्याविरोधात मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही.
बहुचर्चित विशाल फटे घोटाळ्याचा मास्टरमाईंड विशाल स्वत:च असला तरी त्याच्या एकूण गैरव्यवहारातील त्याच्या कुटुबियांचा सहभाग लपून राहिलेला नाही. विशालने जी मोठी आर्थिक उलाढाल केली ती कुंटुबियांच्या परस्पर होणे शक्यच नव्हते. त्याने स्थापन केलेल्या विशालका कंपनीमध्ये तर त्याचे वडिल अंबादास फटे हे भागीदार संचालक आहेत. तर त्याच्या कारभारात भाऊ वैभवचा सहभाग ही नैसर्गिक होता. त्यामुळे पोलिसांनी आजपर्यंत केलेल्या चौकशीत या तिघांचा सहभाग आढळून आल्याने दोषारोपपत्रात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
वैभव फटेच्या जामिनाच्यावेळी त्याच्यावतीने तो स्वतंत्र राहत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला असला तरी त्याच्या पत्नीने घरात झालेल्या तोडफोडीच्या, चोरीच्या घटनेचा गुन्हा नोंदविताना मात्र आपण एकत्रित राहत असल्याचा उल्लेख केलेला आहे.
दि. 14 जानेवारी रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात विशाल फटे आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार लक्षात घेवून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.
त्यानंतर या शाखेकडे प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार फसवणुकीचा आकडा 42 कोटी रुपये पर्यंत पोहचला. या तपासाचे प्रमुख आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक संजय बोठे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य तपास झाला. 31 मार्च रोजी ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यानंतर हा तपास बार्शी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी जनार्दन नालकूल यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.
Big Bull: Chargesheet filed against torn brother and father; The number of frauds has gone up to 42 crores
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 167(2) नुसार आजीवन कारावास किंवा दहा वर्षाच्या शिक्षेचा समावेश असलेल्या कलमांचा या गुन्ह्यात समावेश असल्यामुळे 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे दडपण पोलिसांवर होते. त्यानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी सध्या विशालची पत्नी राधिका आणि आई अलका या दोघींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयातच सुनावणी सुरू आहे. या अर्जाच्या निकालावर पुढील पूरक तपासाची दिशा अवलंबून असणार आहे.
● जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
बार्शी : शेजार्याला त्रास देवून जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झालाय.
अभिमान राऊत , गोपीनाथ राऊत, लक्ष्मण बारकूल, मंगल राऊत (सर्व रा. राऊत वस्ती, राऊत प्लॉट, परांडा रोड, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अनिता व्यंकट काळे यांनी फिर्याद दिली आहे.
अनिता काळे या आपला मुलगा रविंद्र यांच्यासमवेत आरोपींच्या घराशेजारी राहतात. त्यांच्या पतीने सदरील जागा राऊत यांच्याकडून नोटरी करुन घेतली होती. या जागेवर त्यांनी पक्के घर बांधले आहे. किरकोळ कारणावरुन त्यांचा राऊत कुटुंबियांशी नेहमी वाद होतो. राऊत कुटुंबिय घरात मोठ्या आवाजात होमथिएटर लावतात. त्याचा त्रास होतो म्हणून फिर्यादी सतत सांगते होते, मात्र ते ऐकत नाहीत.
त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसांकडे तक्रार ही केली होती. 14 एप्रिल रोजी दुपारी 03:00 वाजता त्या घरी असताना लक्ष्मण बारकूल याने त्रास देण्याचे उद्देशाने घरातील होम थिएटरचा आवाज मोठा केल्याने त्यांनी त्यास आवाज कमी करणेबाबत सांगितले असता अभिमान राऊत, मंगल राऊत, लक्ष्मण बारकूल, गोपीनाथ राऊत हे सर्व त्यांच्या घरासमोर आले. त्यांना जातीवाचक बोलून तु आमच्या जागेत राहत आहेस, तु आम्हाला समजावयाला निघालीस. तु येथे कशी राहतेस हेच आम्ही पाहतो, तुम्ही सर्व आताच्या आता हे घर व जागा खाली करा, नाहीतर तुझ्या मुलाला जिवे ठार मारु, अशी धमकी दिली.
शिवीगाळ करून घरावर दगड फेक केली. रविंद्र यास लाथाबुक्क्याने मारहाण केली. मोटारसायकलवर दगड घालून अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.