सोलापूर : मोहोळ तालुक्यात वाळू ठेकेदाराची सध्या मनमानी चालू आहे. नदी पात्रात मोटारीचा पाइप जोडण्यास गेलेल्या शेतक-यास ठेकेदाराने मारहाण केली. या घटनेमुळे बेगमपूर परिसरातील नदीकाठ काठालगतचे शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. Farmer in Mohol beaten by sand contractor in Solapur
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील शेतकरी विनोद विश्वनाथ पाटील यांना भीमा नदी पात्रात मोटारीचा पाइप जोडत असताना मारहाण केली. या घटनेची कामती पोलिसात नोंद झाली आहे.
विनोद विश्वनाथ पाटील यांची भीमा नदी काठावर शेती आहे. शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी विनोद विश्वनाथ पाटील हे त्यांचे सहकारी भास्कर पांडुरंग पाटील, दीपक औदुंबर पाटील, अभिषेक आप्पासाहेब पाटील (सर्व रा. बेगमपूर) यांना घेऊन शेतातील विद्युत मोटारीचा पाइप जोडण्यासाठी गेले होते.
हे सर्वजण पाईप जोडत असताना वाळू ठेकेदार नागेश ताकमोगे (रा. सोलापूर), दत्तात्रय गणपत चव्हाण (रा.बेगमपूर), महावीर कदम (रा.बार्शी) व इतर ५० ते ६० अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यातील दत्तात्रय चव्हाण यांनी आम्ही येथील वाळूचा ठेका घेतला आहे. तुमचा नदीत यायचा काही संबंध नाही, अशी धमकी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावर आम्ही मोटारीचा पाईप जोडण्यासाठी आलो आहोत, असे सांगत असताना त्यांनी शिवीगाळ करून हातातील काठ्यांनी मारहाण करून आम्हाला जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी केशव बाबासाहेब पाटील आले असता त्यांनाही धक्काबुक्की करून त्याचे मोटार सायकलची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी विनोद पाटील यांनी कामती पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
□ अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
सोलापूर : कोणीतरी अज्ञात इसमाने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कशाचीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापुरात घडली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी ही तिच्या आजीच्या घरी देवाचा कार्यक्रम आहे असे सांगून घरातून गेली होती. त्यावेळी बराच वेळ झाल्यानंतर ती तरुणी परतली नसल्याने तिच्या आईने शेजार्यांकडे व आपल्या नातेवाईकांकडे विचारपूस करून माझी मुलगी आली आहे का असे विचारून चौकशी केली.
मात्र ती कोठेही मिळून न आल्याने पीडित मुलीच्या आईची खात्री झाली कि, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या मुलीला कशाचीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत.