》 प्रसिध्द गायक केके यांच्या पार्थिवावर मुंबईतील वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. केके यांचे कोलकत्यात एका गाण्याच्या कॉन्सर्टनंतर हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव कोलकात्याहून मुंबईला सकाळी विमानाने आणण्यात आले. वर्सोव्याच्या प्लार्क प्लाझामध्ये त्यांचे पार्थिव सकाळी 10 ते 12.30 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. Singer KK merges with Infinity; Goodbye! Superstar in the music world, read the full story
तडप तडप के इस दिल से आह निकलती रही, अशा अनेक गाण्यांनी चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा संगीत विश्वातील तारा आज अनंतात विलीन झाला. गायक केके यांच्या पार्थिवावर मुंबईत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या सुमधूर आवाजाने स्वर्गसुखाचा अनुभव देणारे केके आज आपल्यात देहरुपाने नसले तरी त्यांच्या अजरामर गाण्यांनी ते कायम सर्वांच्या हृदयात जिवंत असणार आहेत. अलविदा सुपरस्टार !
》》》प्रतिभावान गायक…
देशातील विविध भाषांमधील गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध गायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनाने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. कोलकाता येथे त्यांची लाइव्ह कॉन्सर्ट सुरू होती. त्याचवेळी त्यांची तब्येत बिघडली. केके गेले दोन दिवस कोलकाता इथे होते.
पण त्यांचे कुटुंब त्यांच्या बरोबर नव्हते. कुटुंबाचा निरोप घेऊन कोलकाता येथे आले पण कुणालाच ठाऊक नव्हते की, ही भेट शेवटची ठरणार. केकेंच्या केके हे सामान्य कुटुंबातले. गायनाचे कुठलेही शिक्षण न घेता त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्या गायकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यातूनच ते प्रतिभावंत गायक ठरले. कारण त्यांच्याकडे प्रतिभा होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आपल्या अंतरंगात कला आहे हे कळाल्यावर त्यांनी गायकीची साधना सुरू केली आणि त्यांना सिद्धी व प्रसिद्धी लाभत गेली. दिल्लीत असताना ते जिंगल्स गायचे. ते ऐकून संगीतकार ए रहेमान प्रभावित झाले. त्यांनी केकेंना मुंबईला यायला सांगितले. त्यांचा सल्ला मान्य केल्यानंतर मुंबई ही त्यांची कर्मभूमी ठरली.
या मुंबईने केके सारख्या फकिराला अमीर करून सोडले. आता कुठे चार दिवस सुखाचे आलेले असताना नियतीने त्यांच्या आयुष्यावर घाला घालावा हे दुःख कुणालाच सहन होणारे नाही. जिंगल्स ते प्रतिभावान गायक असा त्यांचा जीवनप्रवास विलक्षण आहे. केके नेहमी म्हणायचे, गायकाचा आवाज समोर येणे महत्त्वाचे असते, चेहरा नाही. आवाजच त्याची ओळख असते. म्हणून ते सोशल मीडियापासून अंतर राखूनच असायचे. पण आपल्या दमदार आवाजातून त्यांनी रसिकांच्या मनात कायम घर केले आहे. दिल्लीतील किरोरी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
लहानपणापासूनच प्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि संगीतकार आरडी बर्मन यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. विशेष म्हणजे गायक होण्याआधी त्यांनी जवळपास ८ महिने सेल्समन म्हणून काम केले होते. अधिक काळ या क्षेत्रात न राहता आपली आवड जपण्यासाठी त्यांनी मायानगरी गाठली.
१९९४ मध्ये मुंबईत आल्यानंतर गायिका शिबानी कश्यपसोबत जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर गुजराती, तेलुगू, तामीळ, कन्नड, मराठी, बंगाली आणि मल्याळम गाण्यांनाही आपला आवाज दिला. ५३ वर्षीय गायक केके यांनी १९९६ मध्ये माचीस सिनेमातील ‘छोड आये हम वो गल्लीयां’ या गाण्यातून वॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
केके हे एक असे गायक होते, जे प्रत्येक शैलीतील आणि प्रत्येक भावनेचे गाणी सहज गाऊ शकत होते. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अभिनेते आर. माधवन त्यांच्याविषयी म्हणतात की केके ओठातून नव्हेतर पोटातून गायचे. गायकाचा हा खरा धर्म आहे. ओठातील गाणे हे केवळ मनोरंजनाचे असतात तर पोटातून येणारे स्वर मनाला रुंजी घालत असतात, असे संगीतशास्त्र सांगते.
कसा योगायोग पाहा. माधवन यांचा बुधवारी वाढदिवस होता आणि याच दिवशी केके जग सोडून निघून गेले. दोघांमध्ये वेगळे बंध होते. केके अतिशय साधे आयुष्य जगायचे. त्यांनी कधी दारूलाही स्पर्श केला नाही. ज्याला परिस्थितीची जाणीव असते आणि लहानपणीच ज्यांच्यावर संस्कार केले जातात. अशी माणसे व्यसनापासून दूर असतात आणि त्यांची रहाणी साधीच असते. केके हे त्यातीलच एक आदर्श व्यक्ती होती. त्यांच्या मृत्यूविषयी बुधवारी वेगवेगळ्या बातम्या बाहेर आल्या.
त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा संयश व्यक्त केला गेलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केकेंच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. कोलकत्तामधल्या एसएसकेएम -रुग्णालयात ऑटोप्सी करण्यात येणार आहे. यानंतर हॉटेल स्टाफ आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले. त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल. एकमात्र, केके आज नाहीत पण त्यांची गाणी रसिकांना सदैव त्यांच्या आठवणी करून देतील. स्वरांच्या रूपाने केके अजरामर राहतील.
✍ ✍ ✍ ✍
》 (दै. सुराज्य संपादकीय लेख)