भारतीय राजकारणातील आचार-विचार, तत्त्वे, संकेत, पक्षनिष्ठा आणि जनसेवा या साऱ्या आयुधांची मोडतोड झाली असून हुजरेगिरी, चमचेगिरी, पक्षाचा घात करून अन्य पक्षांचा आश्रय घेणे, एकमेकांना संपवणे, पक्षश्रेष्ठींना गुंडाळून ठेवणे, जनसेवा ऐवजी केवळ मेवा खात राहणे, अशा अपप्रवृत्तीने राजकारण नासून गेले आहे. बहुमताची सत्ता हाती घेत केंद्रात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे जेव्हा आले, तेव्हा भाजपेतर पक्षांमधील नेत्यांचे पित्त चांगलेच खवळले. Hardik Patel becomes ‘Pavan’! He took so many steps that he became a political hero … Patidar leader Gujarat politics
या माणसाची राजकीय खुंटी सत्तेतून हालणार नाही, या धास्तीने भाजप विरोधक खंगून गेले. काँग्रेस गर्भगळीत झाली. मोदींना फाईट देण्याची ताकद अन्य पक्षांमध्ये नव्हतीच. त्यामुळे मोदींना पर्याय शोधला जाऊ लागला. मोदींना बदनाम करण्यासाठी डावपेच आखले गेले. डावे पक्ष व त्यांच्या आश्रयाला असलेल्या विद्यार्थी संघटनांनी त्यासाठीची शोध मोहीम सुरू केली. दिल्लीतील जेएनयूमधील डाव्या विद्यार्थी संघटनांनी घातलेला दंगा डाव्या पक्षांच्या पथ्यावर पडला. त्या धुमाकूळमधून हार्दिक पटेलचा चेहरा पुढे आला. त्याने मोदींवर इतके तोंडसुख घेतले की- डाव्यांना हार्दिकचा मोह आवरला नाही.
मोदींना पर्याय म्हणून त्याचा चेहरा समोर आणला गेला. डाव्यांनी त्याला इतक्या पायघड्या घातल्या की, तो काही दिवसातच पोलिटिकल हिरो बनला. व्याख्यानाच्या आर्डरी येऊ लागल्या. प्रसिध्दीचे कॅमेरे भोवताली फिरू लागले. बघता बघता हार्दिक चमकला. या सवंग लोकप्रियतेत हार्दिकचे पाय काँग्रेसच्या दावणीला कसे वळले हे कुणालाच कळले नाही. कधीकाळी भाजपवर निशाणा साधणाऱ्या हार्दिकने गुरुवारी भारतीय जनात पक्षात प्रवेश करून कमळ हाती घेतले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/553903799620687/
हार्दिकची ही खेळी भाजपेतर पक्षांना धक्का देणारी आणि धडाही देणारी आहे. भाजपेतर पक्षांनी ज्यांचे ज्यांचे म्हणून चेहरे पुढे आणले, त्या सर्वांना गळाला लावण्यात भाजपने चतुराई दाखवली हे विशेष. हार्दिकने पाटीदार समाजाचे आंदोलन हाती घेतल्यानंतर त्याचा भाजपवर खूप मोठा परिणाम झाला. गुजरातच्या मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यापर्यंत आली होती. त्यात हार्दिकचे यश होतेच.
पण कालांतराने काँग्रेसमधूनच त्याचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. कानामागून आली, तिखट बनली अशी एक म्हण आहे. राजकीय पक्षांचे हायकमांड ती डोक्यात ठेवूनच पक्ष चालवत असतात. कुणीही आला की, त्याला मोठे होऊ दिले जात नाही. हार्दिकच्या बाबतीत तेच घडले. राहुल यांना स्पर्धक नको होता. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस व हार्दिक यांच्यात जी धूसपूस सुरू होती, त्यावर भाजप नेत्यांची करडी नजर होतीच. हे भांडण भाजपच्या पथ्यावर पडले.
भाजपने हुशारी दाखवत हार्दिकलाच आपल्या गोठ्यात बांधून आपला डाव यशस्वी केला. कुर्मी, पाटीदार आणि गुर्जर समुदायाचा समावेश ओबीसींमध्ये करावा आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याच्या मागणीसाठी हार्दिकने ९ सप्टेंबर २०१५ मध्ये पटेल नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. मार्च २०१९ मध्ये अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल यांच्या उपस्थितीत हार्दिकने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जुलै २०२० मध्ये, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हार्दिकची गुजरातचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला आव्हानात्मक जबाबदारी देण्यात आली.
काँग्रेस पक्ष सामान्य लोकांना प्रोत्साहन देतो आणि २०२२ मध्ये काँग्रेस दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास त्यावेळी हार्दिकने व्यक्त केला होता. राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात एक छोटा शिपाई बनून काम करणार असल्याचे हार्दिकने यांनी म्हटले होते. पण हाही विश्वास आता मोडून पडला. त्याला भाजपने पदाचे आमिष नक्कीच दाखवलेले असणार. त्याला तो बळी पडला. आता भाजपमध्ये कसा रमतो आणि भाजपवाले त्याला कशी वागणूक देतात हे आता येत्या काळात पहायला मिळेल. एकमात्र हार्दिकचे पंख वाढू द्यायचे नाहीत, याची काळजी भाजप श्रेष्ठी घेत राहतील. इथेच खरी मेख आहे.
✍ ✍ ✍
(दैनिक सुराज्य संपादकीय )
https://www.facebook.com/109399567404448/posts/553919282952472/