सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात दलित विकास निधीवरून टक्केवारीचा गोरखधंदा सुरू आहे, हे उघड सत्य असून त्यामध्ये खोटे आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देतो, असे आव्हान माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी दिले. Chanchal Patil Ram Satpute MLA’s allegation of percentage scam from Dalit Development Fund in Social Welfare Department
सोमवारी (ता. 13) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दलित वस्ती विकास योजनेच्या निधीसाठी टक्केवारीची मागणी होत असल्याचा आरोप आमदार सातपुते यांनी केला. त्यावेळी पालकमंत्री भरणे यांनी टक्केवारी कोण मागते त्यांचे नाव जाहीर करा, असे म्हणताच आमदार सातपुते यांनी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या चंचल पाटील व त्यांचा लिपिक नरळे हे पाच टक्के मागतात, अशी तक्रार केली. तेव्हा त्यांच्याकडील पदभार काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री भरणे यांनी दिले.
त्यासंदर्भात आमदार सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. चंचल पाटील नावाच्या अधिकारी व त्यांच्या लिपिकाने टक्केवारी मागणी सुरू केली आहे. टक्केवारी दिल्याशिवाय कामच मंजूर करत नाहीत. दलित समाजाच्या विकासाचा निधी टक्केवारी देऊन विकत घ्यावा लागत असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा आम्हाला नैतिक अधिकार नाही. संविधानाने आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.
दलित समाजाचे प्रश्न सभागृहात मांडता येत नसल्यास आमदारकीला काय काडी लावायची का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, पालकमंत्री भरणे हे शब्द फिरवतात अशी खंत आमदार सातपुते यांनी व्यक्त केली.
या संदर्भात बोलताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई केली आहे . समाज कल्याण विभागातील नरळे यांना कार्यमुक्त करण्यात केले आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून पुढील कारवाई करू, असे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/560929865584747/
□ उद्यापासून तीन दिवस पंचायत राज समिती सोलापुरात, प्रशासनाकडून तयारी पूर्ण
सोलापूर : सोलापूर पंचायत राज समिती (पीआरसी) उद्या बुधवारी (ता. १५) सोलापुरात दाखल होत आहे. दि. १५, १६ व १७ असे तीन दिवस ही समिती सोलापुरात राहणार असून त्याबाबतची सर्व तयारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
ही समिती १५-१६ व २०१६- १७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील सोलापूर जिल्हा परिषदेच्या संबंधात सीईओ दिलीप स्वामी यांच्यासह विभाग प्रमुखांची साक्ष होणार आहे. तसेच दुसऱ्या
दिवशी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना भेटी देणार आहे. याच दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प. शाळा ग्रामपंचायत पंचायत गटविकास अधिकारी यांना भेटी देऊन साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
तसेच जि.प. सीईओ यांची अंतिम साक्ष होणार आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्व विभागाची जय्यत तयारी झाली आहे. सोमवारी सीईओ स्वामी यांनी दुपारी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली.
पंचायत राज समितीला (पीआरसी) थेट कारवाई करण्याचे अधिकार आहेत. एखादा मुद्दा राहिलेला असेल तर त्यावर काय कारवाई केली, अशी कमिटीकडून विचारणा केली जाऊ शकते. संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला नोटीस द्यावीच लागते. त्यामुळे सर्वच कामे बाजूला ठेवून कमिटीच्या कामाला जिल्हा परिषद प्रशासन प्राधान्य देत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन तयारी करत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत बैठकांचा धडाका सुरू आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांशीही अधिकाऱ्यांनी चर्चा केली. पंचायत राज समिती येणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख प्रलंबित कामे, अहवाल, रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ करत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561045935573140/