□ सोलापुरातील १६ डॉक्टरांचा सहभाग
सोलापूर : महाराष्ट्रातील रोटरी क्लबच्या ४ जिल्हा शाखांच्या ४३ सर्जन्सकडून काश्मीरमध्ये आठ दिवसात २ हजार ४९९ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या शिबिरात सोलापुरातील १६ डॉक्टरांचा सहभाग होता तर या उपक्रमाच्या खर्चाचा विचार केल्यास 50 कोटींच्यावर जाऊ शकतो, असेही प्रधान म्हणाले. Solapur doctors participate in 2499 surgeries in Kashmir in eight days by 43 Rotary surgeons
काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, सोपोर आणि गंदरबल अशा चार जिल्हा सहकारी रुग्णालयात या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. विशेष बाब म्हणजे शस्त्रक्रिया झालेल्या २,४९९ रुग्णांपैकी एकालाही शस्त्रक्रियानंतर गुंतागुंत झालेली नाही. श्रीनगरचे विभागीय आयुक्त आणि मूळचे महाराष्ट्रीयन असलेले पांडुरंग पोळे यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला.
११ ते १८ मे या दरम्यान झालेल्या मोफत शिबिरात कर्करोग, अस्थीरोग, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा, डोळे, दंत सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, मूत्र विकार अशा ११ प्रकारातील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. काश्मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग पोळे यांचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
रोटरी जिल्हा ३१३२ ( सोलापूर, सातारा, नगर ,मराठवाडा ),रोटरी जिल्हा ३१३१ ( पुणे, आणि रायगड ) तसेच ३०७० आणि ३०६० अशा ४ रोटरी डिस्ट्रिक्टच्या संयुक्त विद्यमाने आणि काश्मीर महसूल विभागातील चार जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या सहकार्याने ११ ते १८ मे दरम्यान मोफत शिबिरात या विक्रमी २,४९९ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या असल्याची माहिती सोलापूरचे प्रकल्प संचालक डॉक्टर राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563741891970211/
काश्मीरमध्ये विभागीय आयुक्त पोळे यांनी आठ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने घरोघरी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पाठवून शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या ९ हजारावर रुग्णांची नोंद केली. रोटरीचे प्रकल्प संचालक सोलापूरचे डॉक्टर राजीव प्रधान आणि पनवेलचे प्रकल्प समन्वयक डॉक्टर गिरीश गुणे यांनी सप्टेंबर २०२१ पासून म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून प्रकल्पाचे नियोजन केले होते. तीन डॉक्टरांच्या पथकाने काश्मीरमध्ये जाऊन प्रत्यक्ष सरकारी रुग्णालयांची पाहणी केली.
या रुग्णालयांमधील उपकरणे, उपलब्ध स्टाफ आणि ऑपरेशन थिएटर्सची संख्या अशा सर्व बाबींचा विचार करता शस्त्रक्रिया शिबिराचे हे शिवधनुष्य पेलणे अवघड होणार असल्याचे डॉक्टर प्रधान आणि डॉक्टर पुणे यांना जाणवले. त्यांनी पुन्हा विभागीय आयुक्त पोळे यांच्याशी संपर्क साधून काश्मीरच्या चार जिल्हा सरकारी रुग्णालयात शिबिराच्या पंधरा दिवसांसाठी ओटी असिस्टंट, नर्सेस असा १५० जणांचा स्टाफ स्टाफ पाठविण्याचा निर्णय घेतला.
आसपासच्या जिल्ह्यातून रुग्णवाहिका आणि व उपकरणे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शिबिरामध्ये रुग्णांवर या शस्त्रक्रिया पार पडल्या. १३ मे रोजी शिबिराच्या तिसऱ्या दिवशी काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर महामहीम मनोज सिन्हा यांनी सोपोर येथे या शिबिराचे अनौपचारिक उद्घाटन केले. तसेच रोटरी प्रकल्पातील सर्जन टीमचे त्यांनी विशेष कौतुक केले.
□ यांनी बजावली सेवा
सोलापुरातून या शिबिरासाठी डॉक्टर संजय मंठाळे, डॉक्टर सौरभ ढोपरे, डॉक्टर शशिकांत गुंजाळे, डॉक्टर उमा प्रधान यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी सेवा बजावली. तर डॉक्टर ओम मोतीपावले,स्वाती हरकाल, हरीश मोटवानी आणि रवींद्र साळुंखे यांनी या प्रकल्पाचे स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवला.
काश्मीरमधील धगधगत्या या अशांत परिसरामध्ये रोटरीच्या शिबिरात सहभागी झालेल्या डॉक्टर मंडळींनी आठ दिवस आपले दवाखाने बंद ठेवून रुग्णांवर उपचार करून शस्त्रक्रिया करण्याची सेवा बजावली. या शिबिरात सोलापुरातील १६ डॉक्टरांचा सहभाग होता. या संपूर्ण आरोग्यसेवेच्या प्रकल्प खर्चाचा विचार केला तर तो ५० कोटींच्यावर जाऊ शकतो, असेही डॉक्टर प्रधान यावेळी बोलताना म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563713271973073/