सोलापूर : महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे दहा दिवस ८ जुलैपर्यंत दीर्घ रजेवर असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा पदभार दिला आहे. या निमित्ताने पुन्हा आयुक्तांच्या बदलीचा विषय चर्चेला आला आहे. Municipal Commissioner on 10 days leave, post to District Collector
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मे महिन्यात केंद्राकडे आंध्र प्रदेश या मूळ केडरमध्ये बदली मागितली होती. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास चार ते पाच महिन्याचा कालावधी लागेल, असेही आयुक्तांनी सांगितले होते. त्यांचा महाराष्ट्रातील दहा वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याने ते नियमानुसार या बदलीस पात्र होते. याबाबत केंद्र शासनाला केलेल्या अर्जावर महाराष्ट्र शासन व आंध्रप्रदेशच्या शासनाकडून मान्यता आवश्यक असते.
महाराष्ट्र शासनाने या अर्जाला मान्यता दिल्याची माहिती नुकतेच आयुक्तांनी सांगितले होते. आंध्रातील टोबॅको बोर्डात एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरसाठी त्यांनी हा अर्ज केला होता. सोलापूर महापालिका आयुक्त पदाचा दोन वर्षाचा कालावधीही पूर्ण झाला आहे. उद्या बुधवारपासून ८ जुलै असे दहा दिवस प्रदीर्घ रजेवर असल्याने त्यांच्या बदलीचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ सोलापुरात धनगर साहित्य संमेलन; गडकरींच्या हस्ते उद्घाटन तर केजरीवाल समारोपाला येणार
सोलापूर – चौथ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे येत्या २३ व २४ जुलै रोजी सांगोला तालुक्यात आयोजन करण्यात आल्याची महिती योजनचे संस्थापक डॉ. अभिमन्यू टकले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाचे उद्घाटन २३ जुलै रोजी दुपारी बारा वाजता केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून २४ रोजी सायंकाळी पाच वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीच्या अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. एस. चोपडे यांची तर स्वागताध्यक्षपदी प्रा. संजय शिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय संमेलनात साहित्य दिंडी, स्व. गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्काराचे वितरण, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. तसेच धनगर समाज आरक्षण, धनगर समाजातील अधिकाऱ्यांकडून समाजाच्या अपेक्षा, समाजातील महिलांचे व समाजाचे इतर प्रश्न आदी विविध बाबींवर चर्चा व विचारविनिमय होणार असल्याचे डॉ. टकले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस स्वागताध्यक्ष प्रा. संजय शिंगाडे, संभाजीराव सूळ, चंद्रकांत हजारे, शेखर बंगाळे, गडदे आदी उपस्थित होते.