सोलापूर /सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील नऊजणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या धीरज चंद्रकांत सुरवसे (वय ३०, रा. धानेश्वरी नगर, वसंत विहारजवळ) याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मिरजचे विशेष सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी दिला. तर अब्बास महंमदअली बागवान (वय ४८, रा. सरवदेनगर, मुळेगाव रस्ता) याच्या छातीत दुखत असल्याने त्यास उपचारास मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Sangli: Dheeraj Survasela remanded in police custody, admitted to Bagwan hospital in Mahisal murder case
गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे कुटुंबाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे पोलीस अंधश्रद्धेच्या दृष्टीने देखील तपास करीत होते. त्यानुसार पोलिसांनी सोलापुरातील बागवान आणि सुरवसे या दोघांना अटक केली. त्यातील सुरवसे याला मिरज येथील न्यायालयाने ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली. तर बागवान याच्या छातीत दुखत असल्याने त्यास उपचारास मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
यातील आरोपी मांत्रिक अब्बास बागवान याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २००९ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यातून त्याची २०१५ मध्ये निर्दोष मुक्तता झाली होती. या प्रकरणात आरोपी मौलाना व सुरवसे यांच्यावतीने ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड. देवदत्त बोरगावकर यांनी काम पाहिले.
तोच तेरा वर्षांपूर्वी सोलापुरात कुप्रसिध्दीस आलेला मांत्रिक मौलाना… कारणही तेच… गुप्तधनासाठी जीव घेणे… फक्त ठिकाण बदलले… गुप्तधनासाठी सोलापुरात त्याने जसा दोघांचा जीव घेतला… तशाच पध्दतीने त्याने म्हैसाळमध्ये नऊजणांना संपवले… नाही म्हणायला सोलापुरातील पत्नी-पत्नीच्या मुली तेवढ्या वाचल्या… म्हैसाळमध्ये मात्र रडायलाही कोणी नाही उरले… तो सोलापूर कोर्टातून निर्दोष सुटला… पण तेरा वर्षानंतर तो ‘तशाच’ गुन्ह्यात सांगलीत अडकला… मौलानाची ही बातमी येताच आठ वर्षांपूर्वीच्या आठवणीने सोलापूर पुन्हा एकदा हादरले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571371707873896/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ पत्नीला फासावर लटकावले, पतीला विष पाजले, सोलापुरातील घटना
चिकन विक्रीचा व्यवसाय करणारे मुश्ताक सय्यद रशिद इनामदार आणि त्यांची पत्नी शाहीन यांच्या घरी मे २००९ मध्ये याच मौलाना आब्बास बागवान याने गुप्तधन काढून देण्यासाठी पूजा बांधली होती. त्यावेळी ‘हजरतजी का हुक्म है’ असे सांगून मुश्ताक यांना कारल्याच्या रसातून विष पाजले. ते बेशुध्द पडल्यानंतर शाहीन यांना गळफास घेण्यास फर्मावले. त्यात शाहीनचा मृत्यू झाला आणि उपचारानंतर काही दिवसांनी मुश्ताक शुध्दीवर आले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. मात्र पुढे मुश्ताकही मरण पावले.
□ दोन्हीकडे चिठ्ठीची आयडिया
सोलापुरात इनामदार यांच्या घरी पूजा बांधण्यापूर्वी मौलाना आब्बास याने इनामदार यांच्याच मुलीकडून त्यांच्या कर्जदारांची नावे एका चिठ्ठीवर लिहून घेतली होती. प्रत्यक्ष मंत्र तंत्र सुरू असताना त्या चिठ्ठीवर मुश्ताक शाहीन या पती-पत्नीची सही घेतली होती. म्हैसाळच्या हत्याकांडातही वनमारे – यांच्या घरी चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांना पैसे दिलेल्या २५ कर्जदारांची नावे आहेत. म्हणजेच कर्जाला कंटाळून इनामदार पती-पत्नीने आत्महत्या केली असे मौलानाला भासवायचे होते. हीच पध्दत मौलानाने म्हैसाळमध्येही वापरली आहे.
□ मुश्ताक वाचल्यामुळे झाला भांडाफोड
गळफास जोरात बसल्यामुळे शाहीनचा मृत्यू झाला, ही बाब उघडकीस येईपर्यंत मुश्ताक बेशुध्द होते. उपचारादरम्यान ते शुध्दीवर आल्यानंतर मौलानाचा भांडाफोड झाला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. म्हैसाळमध्ये मात्र कुटुंबातील कोणीच वाचणार नाही; याची मौलानाने खबरदारी घेतली. पण घटनेपूर्वीच वनमारे यांच्या घरातून गुप्तधन काढून देण्यासाठी मौलाना आब्बास नेहमीच येत असल्याची बातमी म्हैसाळमध्ये पसरली होती. त्यातूनच तांत्रिक माहितीच्या आधारे सांगलीचे पोलीस मौलानापर्यंत पोहचले.
□ मौलानाची तब्येत खालावली
दरम्यान, सांगली पोलिसांनी सोलापुरात येऊन मौलानाला बेड्या ठोकून सांगलीला नेले. तोपर्यंत मौलाना आब्बास याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवसे याला अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आरोपी मौलाना व सुरवसे यांच्यावतीने ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड. देवदत्त बोरगावकर यांनी काम पाहिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571359661208434/