सोलापूर / पंढरपूर : आज आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. Mahapuja of Vithuraya was performed by cm Eknath Shinde.
आज रविवारी (दि. 10 जुलै ) पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.
रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित होते.
खासदार श्रीकांत शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा चार पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यंदा मानाचा वारकरी म्हणून मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.
नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहेत. गेल्या मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. हे दाम्पत्य संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. यंदा मंदिर प्रशासनाने आषाढी एकादशीसाठी जय्यत तयारी केली आहे.
या वर्षी कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने वारीला परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह दुणावला होता. यावर्षी विदेशातील वारकरी देखील पंढरीला दाखल झाले आहेत.
आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी पावणेबारा वाजता मुख्यमंत्री पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच दुपारी साडेबारा वाजता ते पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील.
आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रा. तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578587140485686/
□ मुख्यमंत्र्यांना ‘विठ्ठलाची महापूजा’ करण्यास निवडणूक आयोगाची अट
सोलापूर : ऐन आषाढी एकादशीच्या तोंडावर राज्यातील नगरपलिका निवडणुका जाहीर होत आचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या महापूजेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, कोणत्याही योजना, विकासनिधी यांची घोषणा न करण्याच्या अटीवर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यास परवानगी दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी राज्यात राजकीय भूकंपास प्रारंभ झाला. सरकार बदलण्याची चिन्हे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून सुरू झाल्याने श्री विठ्ठलाची महापूजा कोणाच्या हस्ते होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच शपथविधीनंतर या प्रश्नावर पडदा पडलेला असताना राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, कोणतीही योजना किंवा निधीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची महापूजा करता येणार आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची अट घातली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासही हरकत नाही. मात्र, त्याठिकाणीही कोणतीही घोषणा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्याच्या पूर्व नियोजित दौऱ्यात कोणताही फरक किंवा बदल झालेला नाही. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू असली तरी निवडणूक आयोगाने काही अटी घालून महापूजेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे महापूजा होईल, असे सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी स्पष्ट केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/578586813819052/
□ अखेर वारकऱ्यांसाठी टोलमाफीचे परिपत्रक जारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला होता. परंतू तरी देखील वारकऱ्यांकडून टोलवसुली केली जात होती. याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यावर, राज्य सरकारने यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. ही सवलत फक्त 15 जुलैपर्यंत देण्यात आली आहे. उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे खूप लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात.
□ आषाढी यात्रा : पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाल्याचा अंदाज
पंढरपूर – आषाढी सोहळ्यासाठी दहा लाख भाविक पंढरपूरला आले असावेत, असा अंदाज आहे. दरम्यान दशमी दिवशी भरपावसात पालखी सोहळ्यांनी वाखरीतून प्रस्थान ठेवून पंढरपूर शहरात प्रवेश केला.
खरे दोन दिवस नवमी व दशमी ला पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली असली तरी वारीचा उत्साह कमी नाही. दर्शनरांग पत्राशेडपर्यंत गेली होती. सकाळी पंढरपूरला आलेल्या मानाच्या पालख्या वाखरीत जेथे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालख्या मुक्कामी होत्या तेथे दाखल झाल्या होत्या. येथे संतभेटीचा कार्यक्रम झाला. यानंतर सर्वच पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
पंढरपूर शहरात 65 एकर भागात दीड लाखाहून अधिक भाविकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तेथे प्रशासनाने सुरक्षा, आरोग्य, पाणी, शौचालयं याची व्यवस्था चोख ठेवली आहे. दरम्यान शहरातील मठ , भक्तनिवास, लॉज तसेच गावभागात घरोघरी वारकरी उतरले आहेत. यासह मोकळी पटांगण ही वारकर्यांच्या राहुट्या व वाहनांनी भरून गेले आहेत. आषाढी यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात पोलिसांनी जवळपास पाच हजार पोलीस तैनात केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकादशीची शासकीय महापूजा करणार आहेत. दरम्यान मंदिरे समितीच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेत चहा, फराळाचे वितरण केले जात आहे. आज शनिवारी दशमी दिवशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढल्यानंतर चंद्रभागा पात्रातही स्नानासाठी वारकरी मोठ्या संख्येने येत होते. वाळवंट व घाटांवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
□ विठ्ठल – रूक्मिणी मातेसाठी दोन किलो सोन्याचे मुकुट
पंढरपूर : उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या,दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात भक्तांसाठी युगानुयुगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणी अधूनमधून सोन्या-चांदीच्या वस्तू आणि दागिने भाविक अर्पण करत असतात. पण नांदेडमधील व्यापा-याने दोन किलो सोन्याचे आकर्षक मुकुट बनवून दिले आहेत.
उमरी (जि.नांदेड) येथील प्रसिध्द व्यापारी विजय पंढरीनाथ उत्तरवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सुमारे दोन किलो सोन्याचे (किंमत सुमारे एक कोटी तीन लाख) अत्यंत आकर्षक मुकुट बनवून घेतले आहेत. विठ्ठल रखुमाईसाठी त्यांनी 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे मुकुट बनवले आहेत. आषाढी एकादशीला उत्तरवार कुटुंब पंढरपुरात जाऊन हे मुकुट अर्पण करणार आहेत.
आई-वडिलांच्या इच्छेनुसार बनवलेले हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी श्री व सौ. उत्तरवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपूर्त करणार आहेत, अशी माहिती येथील प्रसिध्द व्यापारी विठ्ठल कटकमवार यांनी ही माहिती दिली.
पंढरपुरातील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल कटकमवार यांचे मामा विजय उत्तरवार हे उमरी (जि. नांदेड) येथील सोन्याचे प्रसिध्द व्यापारी आहेत. त्यांच्या आई-वडिलांची श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट अर्पण करण्याची इच्छा होती. त्यानुसार विजय उत्तरवार आणि त्यांच्या मुलांनी इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले होते.
खामगाव येथून खास कारागीर बोलावून त्यांनी विठुरायासाठी आणि श्री रुक्मिणीमातेसाठी अत्यंत आकर्षक असे दोन मुकुट बनवून घेतले आहेत. विठुरायासाठीच्या मुकुटासाठी सुमारे ११८४ ग्रॅम तर श्री रुक्मिणीमातेच्या मुकुटासाठी सुमारे ७८४ ग्रॅम, असे दोन्ही मिळून १९६८ ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. हे मुकुट आज आषाढी एकादशी दिवशी सौ. उत्तरवार दांम्पत्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपुर्त करणार आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578592907151776/