पंढरपूर : तीर्थक्षेत्र पंढरपूरसाठी विशेष विकास आराखडा तयार करण्याची सूचना अधिकार्यांना दिली असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजे नंतर पत्रकारांशी बोलताना दिली. Chief Minister Eknath Shinde’s suggestion to prepare special development plan for pilgrimage Vithuraya Rathutsav
आषाढी एकादशीच्या सोहळ्या निमित्त श्रीविठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेस आलेल्या एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संंवाद साधला. यावेळी शिंदे यांनी राज्यातील तमाम जनतेच्या वतीने महापूजा केली. यानंतर विठोबा रखुमाईस राज्यावरील सर्व दुःख, अरिष्ट, संकट, अडचणी दूर व्हावेत असे साकडे घातले. बळीराजा हा आपला मायबाप असून त्यास चांगले दिवस येऊ देत, अतिवृष्टी होऊ नये. राज्याची भरभराट वेगाने होऊ देत, सर्व समाजघटक सुखी राहू देत. तसेच थोडा राहिलेल्या कोरोनाचा देखील नायनाट होवू देत अशी प्रार्थना केली.
एकनाथ शिंदे यांनी, आषाढी एकादशीस विठुरायाची महापूजा करण्यास मिळाली असल्याने आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा व भाग्याचा दिवस असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून शिंदे यांनी थेट पंढरी गाठली होती. मोदी यांनी भेटी दरम्यान महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे प्रकल्प उभा करा, तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे सांगितले.
तसेच राज्यात ९२ नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाऊस अधिकचा झाल्यास या भागात प्रशासकीय यंत्रणा नियुक्त करावी लागते. यामुळे आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याविषयी विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान तीर्थक्षेत्र पंढरी हे लाखो वारकर्यांचे श्रध्दा स्थान असून याच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. इतर देवस्थानमध्ये ज्या पध्दतीने स्वच्छता असते, सुविधा असतात त्या प्रमाणे आराखडा करण्याच्या सूचना केल्या आहेत. या बाबत आपण अधिकार्यांची बैठक घेतली असून यामध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मंदिर परिसर यांचा विकास करणे, चांगले रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, फूटपाथ आदी सुविधावर भर देण्याची सूचना केली आहे. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा बनविण्यात येणार असून यामध्ये शहराच्या भविष्याचा विचार करून विकास केला जाणार आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे, आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ विठुरायाचा रथ उत्सव उत्साहात साजरा
पंढरपूर – आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी राही रखुमाईसह विठुरायाचा रथ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोरोनामुळे आषाढीमध्ये दोन वर्षे हा सोहळा ट्रॅक्टरमधून काढण्यात आला होता.
जवळपास तीनशे वर्षाची परंपरा असलेला हा रथ सोहळा खाजगीवाले संस्थानने सुरू केला. यात्रा काळात येणार्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी हा रथ सोहळा काढण्याची परंपरा आहे. सध्याच्या माहेश्वरी धर्मशाळेमधून वीस फुटाचा हा लाकडी रथ प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येतो. यामध्ये विठुरायासह राही व रखुमाईच्या पितळी मूर्ती विराजमान केल्या जातात.
आज रविवारी दुपारी साडे बारा वाजता हा रथ सोहळा प्रदक्षिणा मार्गावरून निघाला. यावेळी दुतर्फा उपस्थित भाविकांनी बुक्का व खारीक उधळून देवाचे दर्शन घेतले. हा रथ ओढण्याचा मान वडार समाजास आहे. कोरोनामुळे दोन वर्षे आषाढी वारीवर निर्बंध लादण्यात आले होते. या काळात लाकडी रथाऐवजी ट्रॅक्टरमध्ये मूर्ती ठेवून रथाची परंपरा पूर्ण करण्यात आली.
दोन वर्षाने हा सोहळा पुन्हा सुरू झाल्याने रथाला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. गर्दी मुळे जागोजागी रथ थांबविण्यात येत होता. सायंकाळी सहा वाजता प्रदक्षिणा पूर्ण करून हा रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत दाखल झाला. यावेळी आरती म्हणून रथाची सांगता करण्यात आली. रथाचे मानकरी म्हणून देवधर, रानडे, जोशी, बडवे यांना मान आहे. तर हरिदास यांना देखील अभंग गायनाचा मान आहे. त्यांचा माहेश्वरी धर्मशाळेकडून सन्मान केला जातो.