सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेस रात्री उशिरा दाखल झाले. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. त्यानंतर स्थानिक शिवसेनेला त्यांनी चांगलाच झटका दिला. शिवसेनाचा मोठा गट शिंदेंच्या गटात सामील झाल्याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले. Chief Minister Eknath Shinde shocked in Solapur; A large group of Shiv Sena joined Shinde’s group
सोलापूर महापालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, इतर चार-पाच माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांना फोडून शिंदे गटात सामील करून घेतले आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत केले आहे.
राज्यात मोठे सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट तयार झाला आहे. शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा असल्याने शिवसेना नेमकी कोणाची, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.
सोलापूर महापालिकेतील काही माजी पदाधिकारी, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट घडवून त्यांना पाठिंबा जाहीर करायला लावला. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेत नगरसविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मोठी मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, असे त्यातील काहींनी सांगितले. पण, आगामी काळात पक्षांतर्गत राजकारणामुळे ते पदाधिकारी निश्चितपणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिसतील, अशीही चर्चा आहे.
माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, माजी शहरप्रमुख हरीभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के, माजी तालुकाप्रमुख चरण चौरे, संजय कोकाटे, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, पंढरपूर विभागाचे उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख आदी उपस्थित होते. त्या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याची माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ महेश कोठे यांची सावध प्रतिक्रिया
काँग्रेसमधून शिवसेनेत आणि शिवसेनेतून आता राष्ट्रवादीत जाण्यास इच्छूक असणारे माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी त्यांच्या काही समर्थक नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर येथे भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले. त्यावेळी काहींनी उघडपणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. पण, महेश कोठे यांनी आपण सध्यातरी राष्ट्रवादी प्रवेशावर ठाम असल्याचे सांगितले. मात्र, पुढे भविष्यात राजकीय परिस्थिती पाहून काहीही होऊ शकते, असेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
□ सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख बदल
सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल कोकीळ मुंबईतील शिवडीतले नगरसेवक आहेत. कोकीळ हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात.
□ राष्ट्रवादीकडे ओढा
महाविकास आघाडी करण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची महत्वपूर्ण भूमिका होती. राष्ट्रवादी पक्ष महाविकास सरकारच्या सत्तेचा केंद्रबिंदू होता. या सरकारमध्ये राष्ट्रवादीचाच जास्त बोलबाला व चलती आहे. म्हणूनच सोलापुरातील शिवसेना, काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे अनेक दिग्गज पक्षांतर्गत नाराजीमुळे राष्ट्रवादीकडे आकर्षित झाले होते.
माजी महापौर महेश कोठे, अॅड. यू. एन. बेरिया, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे या दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. तांत्रिक अडचणीमुळे या सर्वांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश लांबला होता, मात्र प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याने हे सर्व दिग्गज राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर चक्क महेश कोठे यांच्यावर महापालिका निवडणुकीची धुरा सोपविली.