□ शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी घेतल्या बैठका
सोलापूर : मी निष्ठावंत आहे, असे केवळ तोंडी सांगणे यापुढे चालणार नाही. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि मातोश्रीवर निष्ठा असणाऱ्यांनाच आगामी काळात महापालिका, विधानसभा अथवा अन्य निवडणुकीची तिकिटे दिली जातील, असे शिवसेना नूतन जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सोलापुरात सांगितले. Only those who are loyal to Matoshree will get tickets; Solapur with Uddhav Thackeray who elected the rebels
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या विधानसभानिहाय बैठका मुंबईहून आलेले संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर घेतल्या.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, साईनाथ अभंगराव, प्रा. अजय दासरी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे उपस्थित होते.
प्रत्येक विधानसभेच्या शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा, पक्ष संघटनेच्या सद्यस्थितीची माहिती संपर्कप्रमुख कोकिळ यांनी घेतली. तसेच पदाधिकारी आणि शिवसैनिकांना सूचना दिल्या.
अनिल कोकिळ म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी पैसा, ओळख, नातेवाईक अशा निकषांवर उमेदवारी न देता ज्यांची पक्षावर आणि ‘मातोश्री’ वर निष्ठा आहे, अशांचाच विचार तिकिटासाठी केला जाणार आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना पद घेऊन देखील काम करणे शक्य नाही अशा पदाधिकाऱ्यांनी पक्षास स्पष्ट कळवावे. जे शिवसैनिक, पदाधिकारी पक्षासाठी वेळ देऊन प्रामाणिकपणे काम करतील, अशा शिवसैनिकांनाच पक्ष बळ देणार आहे. शिवसेनेचे पद मिळो अथवा न मिळो, पण पक्षासाठी कार्य करत रहा. पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन करणाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी निश्चितपणे घेतली जाणार असल्याचे सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587146682963065/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तळागाळातील शिवसैनिकांशी संपर्क साधून सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आगामी काळात जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांनी घराघरापर्यंत जाऊन सदस्य नोंदणी केली पाहिजे. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथ प्रमुखांना यात समाविष्ट करून घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जावे, असे आवाहनही कोकिळ यांनी याप्रसंगी केले.
राज्यात अनेक जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असला तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र शिवसेनेचा बुरुज अभेद्य राहिला आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केलेल्या कार्यावर आणि निष्ठेच्या बळावर सोलापूरची शिवसेना अखंड राहिली आहे, असेही संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यावेळी म्हणाले.
विविध विधानसभा निहाय झालेल्या बैठकांना शहर मध्य विधानसभेचे संपर्कप्रमुख शशिकांत आगवणे, अक्कलकोट विधानसभेचे संपर्कप्रमुख संतोष जाधव, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, भीमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, संतोष पाटील, दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रमुख योगीराज पाटील, अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख, कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी, शहर उत्तरचे समन्वयक महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते.
□ शिवसैनिकांनी दिले पक्षनिष्ठेचे प्रतिज्ञापत्र
“माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर संपूर्ण श्रध्दा व निष्ठा आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे”, असे प्रतिज्ञापत्र उत्स्फूर्तपणे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी यावेळी भरून जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांना सुपूर्द केले.
□ बंडखोरांना निवडून देणारे उद्धव ठाकरेंसोबतच
शिवसेनेतून बाहेर पडले ते शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत. परंतु त्यांना ज्यांनी निवडून दिले ते शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता हे सर्वजण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत, असा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी व्यक्त केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587126076298459/