सोलापूर : तडीपार असलेल्या आरोपीने चौपाड येथील मोबाईल दुकान फोडून तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना चौपाडातील मोबाईल दुकानात घडली. यात हल्लेखोर तडीपार आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. Arrest of the accused immediately; A coyote attacked a mobile shop in Chowpad
काल शुक्रवारी (दि.५ ऑगस्ट) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास संजय मोबाईल शॉपी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी नागार्जुन मोहन जोपल्ली (वय-२९,रा. दाजी पेठ) याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून विपुल रामदास शिंदे (रा.सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
विपुल शिंदे याने संजय मोबाईल शॉपी या दुकानाची यापूर्वी नासधूस केल्याने दुकानाचे मालक पंकज फाटे व मॅनेजर महमंदजाफर अब्दुलगफार शेख यांनी विपुल शिंदे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीवरून विपुल शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता व त्याला तडीपार देखील करण्यात आले होते.
याच दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तुझा मालक कुठे गेला आहे. त्याच्यामुळे मी जेलमध्ये गेलो, तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्हाला धंदा करायचा असेल तर मला महिन्याला दहा हजार रुपये द्या नाहीतर मी धंदा करू देणार असे धमकावले. धमकावत विपुल शिंदे याने लोखंडी कोयत्याने दुकानातील काचेची तोडफोड करून शिवीगाळ केली.
त्यानंतर त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने दुकानातील काचेची तोडफोड करून तू मध्ये येऊ नकोस असे म्हणून फिर्यादी नागार्जुन याला कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केले आहे. तसेच शिंदे याच्या दहशतीमुळे घाबरून त्या भागातील व्यापाऱ्यांनी पळापळ करून दुकानाचे शटर बंद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/596968825314184/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ विजापूर रोड येथे चालणाऱ्या कुंटणखाण्यावर छापा; पीडित महिलेची सुटका तर एकीस अटक
सोलापूर : विजापूर रोड जवळील आरटीओ ऑफीस जवळ बेन्नुर नगर येथे चालणाऱ्या कुंटणखाण्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारून एका पीडित महिलेची सुटका केली.तर कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक केली.
बेन्नुर नगरात बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडील अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी बोगस गिऱ्हाईक पाठवून बातमीची खात्री करून छापा टाकून कारवाई केली.
या गुन्ह्यातील महिला आरोपीने आपल्या राहत्या घरात एका पीडीत महिलेस अटकावून ठेवून तिची शारीरीक पिळवणूक करून तिला पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करून एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे. महिला आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महिला आरोपीस ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी हे करीत आहेत.
□ शेटफळ येथे शेतात विष पिऊन आत्महत्या
शेटफळ (ता.मोहोळ) येथील भांगे यांच्या शेतात कामाला गेल्यानंतर विष प्राशन केल्याने सचिन बलभीम इंगळे (वय २२ रा. सिध्देवाडी (ता.मोहोळ) हा उपचारादरम्यान मरण पावला. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर त्याला मोडनिंब येथे प्राथमिक उपचार करून अनिल (भाऊ) यांनी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान तो मरण पावला अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/596860378658362/