□ पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर : पंढरपूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश साठे यांना खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पंढरपुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घडलेली घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याची माहिती महेश साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. Bhalke Kale threatened to kill the leader of Eknath Shinde group in Pandharpur
खुनातील फरार आरोपी परमेश्वर देठे यांनी फोन करून आपणास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप साठे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
दोन आठवड्यापूर्वी तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यामध्ये सतरा पैकी सात जागेवर परिचारक गटाने, साठे यांनी चार जागेवर तर भालके-काळे गटाने सहा जागांवर विजय मिळवला होता. महेश साठे यांनी आपल्याच कुटुंबातील पाच जणांना उमेदवारी देत चार जणांना विजयी केले. दरम्यान साठे यांनी स्वतंत्र आघाडी उभा केली असली तरी निवडणुकीपूर्वी त्यांनी भालके व काळे गटाशी हातमिळवणी केली होती.
यामुळेचे भालके – काळे गटाच्या उमेदवारांविरोधात त्यांनी आपले उमदेवार दिले नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर भालके – काळे व साठे यांची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र सरपंचपद खुले असल्याने यावरून वाद सुरू झाला. भालके
– काळे गटाने साठे यांना विश्वासात न घेता परिचारक यांच्याबरोबर सरपंचपदासाठी बोलणी केली असल्याचा आरोप साठे यांनी यावेळी केला.
मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही. यानंतर साठे यांनी भालके-काळे गटाशी फारकत घेत थेट परिचारक गटाशी युती केली. साठे यांचे बंधू संजय साठे यांना उपसरपंचपद देण्यात आले तर परिचारक गटाच्या विजयमाला वाळके यांना सरपंचपदी संधी मिळाली.
याचा धक्का भालके – काळे गटाला बसला. या गटाचे परमेश्वर देठे यांनी महेश साठे यांना अनोळख्या मोबाईल क्रमांकावरून फोन करीत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे परमेश्वर देठे व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर मागील महिन्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी देठे फरार असताना देखील पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महेश साठे यांनी देठे याच्या विरोधात गुन्हा केला असल्याची माहिती दिली.
तसेच आमदार शहाजी पाटील यांना याविषयी सर्व माहिती दिली असून ते पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. साठे हे मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबई येथे भेट घेवून आरोपीस अटक करण्याची व संरक्षण मिळावे अशी मागणी करणार असल्याचेही म्हटले आहे.
□ सोलापूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांची होणार चौकशी
सोलापूर : सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कैलास आढे, पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी आश्रमशाळांना बेकादेशीरपणे अनुदान वाटप प्रकरणी चौकशी करण्यासाठी उपायुक्त भगवान वीर यांची नियुक्ती केली आहे.
कैलास आढे हे किसन पाटील या शिपायामार्फत कोट्यावधीतचा पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांनी केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात आले होते.
या प्रकरणाची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांना चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.