मुंबई : पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. राऊतांनी आपला पैसा गुंतवणुकीसाठी श्रद्धा डेव्हलपर्सचा वापर केल्याचा ईडीला संशय आहे. संजय राऊत यांच्याकडे असलेल्या दोन महागड्या गाड्या या श्रद्धा डेव्हलपर्सने खरेदी केल्याचे समजते. त्यामुळे संजय राऊत यांची श्रद्धा डेव्हलपर्समध्ये आर्थिक गुंतवणूक असल्याचा संशय ईडीला आहे. ईडी आता त्यादृष्टीने तपास करणार आहे. Sanjay Raut was using two luxury car developers owned by others
एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या या दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय करत होते. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बुधवारी ईडीने मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरचाही समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार पत्रा चाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचालकांच्या मालकींच्या गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले.
ईडीच्या पथकाने श्रद्धा डेव्हलपर्सच्या मुलुंड येथील कार्यालयातील कागदपत्रं आणि संगणकाची तपासणी केली. श्रद्धा डेव्हलपर्सचे भांडूप, मुलुंड, विक्रोळीत अनेक प्रकल्प सुरु आहेत. रविवारी, 31 जुलैला निवासस्थानी छापा टाकण्यात आल्यानंतर ईडीला संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचालकांची मालकी असलेल्या दोन अलिशान गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाली होती.
आर्थिक गुन्हे शाखेतील माहितीच्या आधारे ईडीने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. ईडीने गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत आणखी माहिती घेतली असता, ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केल्याचे आढळून आले. त्यानंतर हा तपास शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा व त्यानंतर संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला.
□ खरेदी केल्या सदनिका
मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना २०१० ते २०१२च्या दरम्यान १ कोटी ६ लाख रुपये मिळाल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम वर्षा राऊत यांनी दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे. याशिवाय अलिबाग येथील किहीम समुद्रकिनारी ८ भूखंडदेखील संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर व संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आले.