□ महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचे स्पष्टीकरण !
सोलापूर : बदली ! तसे काहीही नाही ! कार्यशाळेसाठी मुंबईला गेलो होतो !! असे स्पष्टीकरण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी हसतमुखाने दिले. Change! Nothing like that, Municipal Commissioner went to Mumbai for the workshop
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे सोमवारी मुंबईला गेल्यामुळे महापालिकेत उपस्थित नव्हते. मुंबईला ते गेल्याचे कळताच महापालिका वर्तुळात आयुक्तांच्या बदलीच्या चर्चेला उधाण आले होते. गुरुवारी “आयुक्त हटाव “या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तर आयुक्तांची बदली नक्कीच होणार अशी जोरकस चर्चा होती.
दरम्यान, मुंबईवरून सोलापूरला आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पत्रकारांनी मुंबईला गेल्याचं काय विशेष ? बदली वगैरेच्या काय हालचाली आहेत का ? या संदर्भात थेट आयुक्त पी. शिवशंकर यांना विचारले. त्यावर बोलताना आयुक्त हसत हसतच म्हणाले, बदली ! तसे काहीही नाही ! एका कार्यशाळेसाठी मी मुंबईला गेलो होतो !! असे स्पष्ट केले.
मुंबईला पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत प्रकल्प कसे राबवायचे या संदर्भात महत्त्वाची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी मी गेलो होतो. या कार्यशाळेला गुजरात, कर्नाटक , आंध्र प्रदेश यासह विविध राज्याचे अधिकारी उपस्थित होते. महत्त्वपूर्ण विषयावर ही कार्यशाळा होती. बदली वगैरेचे काहीही नाही. आंध्र प्रदेशसंदर्भातील माझा प्रस्तावही अजून मंजूर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त यांच्या कार्यपद्धतीमुळे कर्मचारी ताण – तणावाखाली आहेत असा आरोप होतो आहे. वायटॅग, डब्ल्यूएमएस या प्रणालीमुळे काम करूनही तेवढा पगार मिळू शकत नाही यासह इतर कारणास्तव आयुक्त हटावचा नारा देत गुरुवारी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला होता. परिणामी या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. त्यातच हा संप बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी इशारा दिला होता.
दरम्यान, आयुक्तांचा आदेश डावलून संपात सहभाग नोंदवत मोठ्या संख्येने पालिका कर्मचाऱ्यांनी आपली नाराजी जणू प्रकट केली होती. यामुळे महापालिका आयुक्तांची आता बदली होणार अशी जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळाली. नव्हे ते काय करतात तिकडून तिकडेच जातात अशीही कुजबुज होती. मात्र थेट महापालिका आयुक्तांनीच बदली संदर्भात कोणतीही हालचाल नाही…! एका कार्यशाळेसाठी मुंबईला गेलो असल्याचे स्पष्ट केले. यामुळे बदलीच्या चर्चेला आता तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पार्क स्टेडियमवर होणार महिला क्रिकेटचे चाचणी सामने
सोलापूर : पार्क स्टेडियमच्या मैदान व धावपट्टीची नेमकी चाचणी घेण्याच्या उद्देशातून या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून महिलांचे सराव सामने घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
पार्क स्टेडियम संदर्भात सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी मंगळवारी सायंकाळी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी चर्चा केली. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, रेम्बोर्स व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान यासंदर्भात पत्रकारांना आयुक्तांनी अधिक माहिती दिली.
पार्क स्टेडियम पूर्णपणे सामन्यासाठी सज्ज झाले आहे. या मैदानावरील धावपट्टीची चाचणी व्हावी याकरिता अठरा वर्षाखालील महिला खेळाडूंचे सराव सामने घेण्यात येणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन धावपट्टी व मैदाना संदर्भातील अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर आवश्यक ती कारवाई करून सामन्यासाठी हे मैदान सज्ज होणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिला खेळाडूंचे सराव सामने होतील. एसपीएल उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचे नियोजन आहे. एसपीएल स्पर्धेसाठी एसपीएल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेतून सोलापुरातील पार्क स्टेडियम चे नूतनीकरण करण्यात आले आहे. हे स्टेडियम पूर्णपणे सामन्यासाठी सज्ज झाले आहे. याचे पालकमंत्री निवडीनंतर उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला बोलण्याची नियोजन महापालिका करत आहे. पालिकेने यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडे या मैदानावर रणजी सामने घेण्याचा प्रस्ताव दिला होता.
तत्पूर्वी या पार्क स्टेडियमच्या मैदानावरील धावपट्टीची चाचणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून महिला खेळाडूंचे सराव सामने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रणजी सामना आणि त्यानंतर नॅशनल सामना घेण्याचे नियोजन आहे.