मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज विरोधक आणि सरकारी पक्षातील आमदार हे आमनेसामने आले होते. यावेळी तेथे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व शिंदे गटातील आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. आमदारांनी शिवीगाळ केल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे. याबाबत ते विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार केलेली आहे. Embarrassment in the Legislature: Pushing; Will complain to the Assembly Speaker
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यामुळे राजकीय दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडल्यानंतर सत्ताधारीही आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला. एकनाथ शिंदेंच्या बंडापासून ते भाजपसोबत सत्तास्थापन करेपर्यंत शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या आमदारात खटके उडतच आहेत.
विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणांनी विधानभवन दणाणून सोडले होते आज मात्र लाजीरवाणा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच शिंदे गटातील आमदारांनी आम्हाला धक्काबुक्की केली तसेच आई-बहिणींवरून शिवीगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यातील परिस्थिती बघता ओला दुष्काळ जाहीर करावी यासाठी मविआचे आमदार जमा झाले होते. त्याचवेळेस शिंदे नावाच्या आमदाराने आम्हाला धक्काबुक्की केली. शिव्या दिल्याचा आरोप केला आहे. यावरून राजकिय तापमान अजून पेटणार अशी चिन्हे दिसत आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. आज बुधवारी सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोविड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकासा आघाडीचे आमदारही त्याठिकाणी आले. त्यांच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
आघाडीच्या आमदारांना गाजराच्या माळा आणल्या होत्या. ‘गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशी घोषणाबाजी केली. सत्ताधारी आणि विरोधकांची घोषणाबाजी सुरु असताना राडा झाला आणि एकदम तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली.
यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.
हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.