मुख्यमंत्री पदाच्या बोहोल्यावर एकनाथ शिंदे बसवलेले व्यक्तिमत्त्व आहे. हा माणूस तसा सरळ मनाचा आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कारात लहानाचा मोठा झालेला हा पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. सध्या तो कमळाबाईच्या हनी ट्रॅप मध्ये फसलेला आहे. श्रद्धा आणि निष्ठा यांचा गैरवापर त्यांच्याकडून करवून घेतला जात आहे. After municipal elections, Eknath Shinde’s chief ministership is in danger
एकनाथांनी हे तथाकथित धाडसी पाऊल उचलण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या इतिहासाचा अभ्यास करायला हवा होता. आपण हिंदू निश्चित आहोत. पण त्याचबरोबर पहिले पाऊल मराठी मनाचे आहे. मराठी माणसाचे आहे आणि ते मराठी मातीतील आहे. मराठी माणूस अखंड हिंदुस्तानच्या पाठीशी वर्षानुवर्षे उभा राहिलेला आहे. धोरणाने, धाडसाने, धीराने आणि कर्तृत्वाने हे मुख्यमंत्री विसरलेले दिसत आहे. प्रेम आंधळे असते म्हणतात. म्हणूनच प्रेमात फसलेल्या प्रत्येकास असा विसर पडतच असतो.
शत प्रतिशत भाजप ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन यांनी ही भूमिका खुलेपणाने मांडलेली आहे. मोकळ्या मनाने आणि दिलदारपणाने बाळासाहेब ठाकरे यांनी या भूमिकेचे स्वागतच केले होते व आहे. यात शंका बाळगायचे कारण नाही. कारण प्रतिस्पर्धी तगडा असावा हीच कदाचित बाळासाहेबांची विचारसरणी होती. कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ते स्पर्धक कधीच नव्हते. ते अडथळे होते. असो.
भारतीय जनता पक्षाला मुंबई आणि ठाण्याच्या महापौरपदाची स्वप्नं पडत आहेत. ही स्वप्ने सत्यात उतरतील का नाही हे येणारा काळ सांगेलच. पण ही स्वप्ने धाडसाने प्रत्यक्षात उतरविण्याऐवजी कपटाने त्याचा मार्ग मोकळा करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाने आखलेले दिसत आहे. मुंबई आणि ठाणे ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांची होती. एकट्याने मुंबई-ठाण्याचे महापौरपद आणि सत्ता मिळू शकत नाही, याची भारतीय जनता पक्षाला पूर्ण कल्पना आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
म्हणूनच यावेळी भारतीय जनता पक्षाने म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी वर्णन केलेल्या कमळाबाईने हनी ट्रॅप लावला आहे आणि त्यात एकनाथ शिंदे सारखा घरंदाज माणूस अडकलेला आहे. प्रेमात अडकलेला आणि फसलेला प्रत्येक जण घरदार सोडून जातो. जाताना घरातील हाती लागेल ती संपत्ती म्हणजे रोख रकमा, दागदागिने घेऊन पळून जातो. शिवसेनेचे आमदार बरोबर घेऊन जात असताना, अगदी तशीच वागणूक एकनाथ शिंदे यांच्या हातून झालेली आहे. प्रेमात आणाभाका घेतल्या जातात. सुखी संसाराची स्वप्ने दाखविले जातात.
या वेळेच्या हनी ट्रॅप मध्ये हिंदुत्वाच्या स्वप्नाची भुरळ पाडली गेली आहे आणि याला एकनाथ शिंदे सारखा सरळ स्वभावाचा मनुष्य बळी पडलेला आहे. मुख्यमंत्री म्हणून वागत असताना, बोलत असताना एकनाथ शिंदे यांची जी देहबोली दिसते आहे, त्यातून जे संकेत मिळत आहेत, त्यावरून काढलेला हा निष्कर्ष आहे. भाजपचे म्हणजेच कमळाबाईचे नियोजन पक्के आहे. मुंबईसह ठाण्याची महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी ठेवायचे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जयजयकार करीत मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता मिळवायची. आपला महापौर बसवायचा. एकदा का हे डोहाळे पूर्ण झाले की मग शिंदे यांची मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी करायला वेळ लागणारा नाही.
उध्दव ठाकरे यांनी अपेक्षित केलेले अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद, त्यांना न दिल्याची किंमत भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये मोजावी लागलेली आहे. तीच किंमत ते आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून मोजत आहेत. अर्थात हे सारे दाखवायचे दात आहेत. हिंदुत्वाच्या नावाने उभा केलेला चेहरा फसवा आहे. एकनाथ शिंदे यांची अंतिमतः फसवणूक होण्याची शक्यता अधिक दिसते आहे.
मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली, आणि महापौर भारतीय जनता पक्षाचा झाला नाही झाला तरी, त्यांना एकनाथ शिंदे यांची गरज भासणारी नाही. आपला मुख्यमंत्री संख्येच्या आधारे झाला पाहिजे ही पदराआड ठेवलेली आंतरिक इच्छा उफाळून वर येईल आणि मग एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून असलेले अस्तित्व विसर्जित होईल. तेंव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील. कमळाबाईच्या हनी ट्रॅपचा बळी अशी त्यांची इतिहासात नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम्ही व्यक्त केलेले विचार कोणत्या सूत्राचे नाहीत. राजकीय विश्लेषक म्हणून नाहीत. कोणाच्या रागा-लोभापाई केलेले नाहीत. कोणत्याही विचाराला बळी पडून केलेले तर नाहीतच नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या आजपर्यंतच्या एकंदरीत कार्यपद्धतीच्या निरीक्षणावरून व्यक्त केलेले हे विचार आहेत. जशी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही असे सांगितले जाते. तसेच अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचाही भारतीय जनता पक्ष राहिला नाही. हे खरे आहे. ज्यांना यातून जो अर्थ काढावयाचा आहे, त्यास ते मोकळे आहेत. उगाच सगळीकडेच हिंदुत्व तथा राष्ट्रीयत्व असल्या पगड्याखाली राहण्यात मजा नसते. ते तर आमच्या रक्तातच पिढीजात भिनलेले आहे.