□ पकडली नामवंत हृदयरोगतज्ञांची नाडी, तपासली कारखान्याच्या साखरेतील गोडी
सोलापूर : कृषी अभ्यास शिबिराचे स्टिकर्स लावलेल्या जिल्ह्याबाहेरचे पासिंग असणाऱ्या गाड्यांचा ताफा, सोबत बाहेरच्याच पोलिसांचा तगडा बंदोबस्त, गुरुवारची सकाळ उजाडण्यापूर्वीच हा ताफा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी पोहचला. त्यानंतर घरी येणारे वृत्तपत्र आणि सकाळचा चहापाठोपाठ सोलापुरात आयकर विभागाच्या धाडी पडल्याची ब्रेकिंग न्यूज धडकली. Information that Income Tax Department raids, teams are staying at night in Pandharpur, Solapur
या पथकाने शहरातील नामवंत हृदयरोगतज्ञांच्या कमाईची नाडी आणि जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या साखर सम्राटाच्या कारखान्यातील साखरेची गोडी तपासण्याचे काम गुरूवारी दिवसभर सुरू असल्याचे पाहण्यास मिळाले.
आयकर विभागाच्या काही गाड्या सात रस्ता परिसरात घुसल्या. काही गाड्या अश्विनी हॉस्पिटलच्या फाटकातून आत शिरल्या. काही गाड्या सातरस्ता परिसरातीलच मेहुल कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयासमोर जाऊन थांबल्या. त्याचवेळी काही विश्रामगृहाच्या
पाठीमागील स्पंदन हॉस्पिटलच्या फाटकासमोर थांबल्या. सातरस्ता परिसरात या गाड्या पोचत असताना दुसरीकडे काही गाड्या अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या फाटकातून आत घुसल्या. शिवाय काही गाड्या होटगी रस्त्यावरील रघोजी हॉस्पिटलच्या कॅन्टिनसमोरच जाऊन थांबल्या. काही गाड्या सोन्या मारुतीजवळच्या छोट्याशा बोळातही घुसगाड्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी उतरले. सोबत बाहेरून आलेला पोलीस पथकही दिमतीला होता.
या अधिका-यानी थेट संबंधितांच्या कार्यालयाचा ताबा घेतला. कार्यालयातील लोक कार्यालयातच राहिले. बाहेरचे लोक बाहेर राहिले. दिवसभर या पथकाने विविध कागदपत्रे तपासली. काही कागदपत्रे ताब्यातही घेतली. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी मोहीम चालूच होती. प्रत्यक्षात मात्र धाडीत काय सापडले? काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली का? याची कोणतीच माहिती अधिकृतपणे सांगण्यात आली नाही.
● नो… नो… फोन कट
डॉ. अनुपम शहा यांच्याकडे त्यांच्या क्लिनिकवर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘नो… नो… म्हणत फोन कट केला. त्यामुळे त्यांच्याकडील कोणतीच माहिती समजू शकली नाही.
● डॉ. परळे बाहेरगावी
डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटलवरही धाड पडल्याचे वृत्त आहे. याबाबत डॉ. परळे यांना विचारणा केली असता ‘माझे सासरे मयत झाल्याने मी बाहेरगावी आहे…’ असे सांगत त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
● धवल शहा नॉटरिचेबल
मेहुल कन्स्ट्रक्शनवर पडलेल्या धाडीसंदार्भात धवल पटेल यांना संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागला. त्यामुळे त्यांच्याकडील धाडीसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापुरात याठिकाणी झाली तपासणी
मेहुल कन्स्ट्रक्शन, अश्विनी हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय (कुंभारी), बिपीनभाई पटेल यांचे निवासस्थान, डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल, डॉ. अनुपम शहा यांचे हार्ट क्लिनिक, डॉ. विजयकुमार रघोजी यांचे रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल याठिकाणी आयकर विभागाने छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती चालू होती. महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मालमत्ता आणि उत्पन्नाचे मार्ग यांची कसून तपासणी केली आहे. काही पथकांनी रात्री धाड घातलेल्या घरी मुक्काम केल्याचे वृत्त आहे.
□ अभिजित पाटील यांचे निवासस्थान व कार्यालयांवर छापा
पंढरपूर : येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या येथील कार्यालय, निवासस्थानी तसेच उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्याच्या कार्यालयावर आयकर विभागाने एकाचवेळी छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. यासंदर्भात अभिजित पाटील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कारखाना चालविणारा माणूस म्हणून अभिजित पाटील यांची ओळख आहे. डीव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद, नाशिक व नांदेड सांगोला, बीड येथे साखर कारखाने चालविण्यास घेतले आहेत. तसेच १२ वर्षापासून बंद असलेला सांगोला कारखाना देखील यंदा सुरू केला. तालुक्यातील सर्वात मोठ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यामुळे सहा साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत. अल्पावधीत पाटील यांनी हा पल्ला गाठला.
दरम्यान गुरूवारी (ता.25) पहाटे साडे सहा वाजता तीन गाड्यांमधून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील बाजार समितीनजीक असलेल्या पाटील यांच्या कार्यालयावर छापा टाकला. तसेच त्यांच्या निवासस्थानी देखील अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली होती.
उस्मानाबाद येथील साखर कारखान्याच्या कार्यालयावर देखील याचवेळी छापा पडला असल्याची माहिती आहे. पाटील त्यांच्या पंढरपूर येथील कार्यालयातूनच कारखान्यासह इतर व्यवसायाचा कारभार चालतो. रात्री उशिरा पर्यंत कागदपत्रांची तपासणी व चौकशी सुरू होती. याबाबत माहिती घेण्यासाठी अभिजित पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद लागला.