सोलापूर : जन्मदात्या आईचे श्राध्द. श्राध्दाच्या सैपाकासाठी भाड्याने भांडी आणलेली. कार्यक्रम संपला; भांडी परत केली. पण त्या भांड्याच्या भाड्याचे पाचशे रुपये उधार राहिले. ते पैसे देण्यावरून दोन सख्ख्या भावात जुंपले. तू मी वरचा वाद हाणामारीपर्यंत पोहचला. त्यात एका भावाचा दुसऱ्या भावाने जीव घेतला. एक भाऊ जिवानिशी गेला तर त्याचाच दुसरा भाऊ सहकुटुंब अटकेत गेला. After mother’s Shraddha, brother-brother fight for the rent of utensils Crime Government Hospital
ही घटना आहे वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंजारवाडी (ता. द. सोलापूर) या गावात घडलेली. सैफन गुडूभाई नदाफ (वय ४५) असे या भांडणात भांड्याच्या भाड्यापायी जिवास मुकलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचाच मारेकरी भाऊ मिरालाल गुडूभाई नदाफ, त्याची दोन मुले रफिक मिरालाल नदाफ व सलीम मिरालाल नदाफ व पत्नी ज्ञामतबी मिरालाल नदाफ यांच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रविवारी (दि. २८ ऑगस्ट) सैफन नदाफ हे शेतात कामानिमित्त गेले होते. शेतातील मोटर चालू होत नसल्याने ते डीपीजवळ गेले. त्याठिकाणी मिरालाल आले आणि भांड्याचे भाड्यावरून वाद सुरू झाला. त्यांच्यात शिवीगाळ सुरू असतानाच मिरालाल यांची दोन्ही मुले रफिक, सलीम व पत्नी त्याठिकाणी आले. त्या सर्वांनी मिळून सैफन यास लोखंडी सळई व दगडाने जबर मारहाण केली. सैफनची पत्नी सोडविण्यासाठी गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात काल मंगळवारी (ता. 30) सकाळी सैफन यांचा मृत्यू झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ भांड्याचे भाडे ठरले कारणीभूत
मृत सैफन व आरोपी मिरालाल यांची आई नाजबी गुडूभाई नदाफ यांच्या श्राध्दाचा कार्यक्रम नुकताच नदाफ कुटुंबात पार पडला. या कार्यक्रमातील सैपाकासाठी लागणारी भांडी भाड्याने आणली होती. या भांड्याचे पाचशे रुपये भाडे देण्याचे राहिले होते. राहिलेले ते भाडे हे आरोपी मिरालाल याने द्यावेत, असे मयताचे म्हणणे होते. यावरूनच त्यांच्यात पहिल्यांदा कुरबुरी झाल्या होत्या.
■ मिरालालचे संपूर्ण कुटुंब अटकेत
याप्रकरणी मयत सैफनची पत्नी सैनाजजी सैफन नदाफ (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वळसंग पोलीस ठाण्यात आरोपी मिरालाल, त्यांची दोन्ही मुले व पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या चौघांनाही अटक केली असूने सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले पुढील तपास करीत आहेत.