भाकड दुध संघातील दूधाचा मलिदा
Solapur District Milk Sangh: Vice-President and Director’s ‘pride’ of Malida Latana from low-quality milk
□ कमी प्रतीचे दूध घालून भाकड संघाला ओरबडण्याचा गोरखधंदा
□ दुध संघाच्या संचालक मंडळींच्याच डेअरीवाल्यांचा ‘प्रताप’
□ सुदर्शन आणि रामप्रसाद दुग्ध संस्था कारवाईच्या रडारवर
□ कमी प्रतीचे दूध घालून मलिदा लाटण्याच्या संचालकांच्या ‘वरकमाई धंद्या’ चे विरवडे बुद्रुकच्या चंद्रभागा डेअरीने उघडे पाडले पितळ
सोलापूर / शिवाजी भोसले : कोणीही यावे अन् टिकली मारून जावे, याप्रमाणे आजवर गेल्या अनेक वर्षांत संबंधीतांनी जिल्हा दूध संघातील मलिदा लाटला. पाचही बोटे तुपात ठेवली, दूध संघात यायचे ते मलिदा लाटण्याच्या हेतूनेच. असचं समीकरण संघाच्या बाबतीत आजवर राहिलेलं. सहकार पंढरी समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एक मोठी सहकारी संस्था जिल्ह्यातील नेतेमंडळी आणि संघ प्रशासनातील अधिकारी – कर्मचारी यांनी अक्षरशः ओरबडून खाली. या संघाची स्थिती दुभत्या नव्हे, तर भाकड जनावरांप्रमाणे आहे.
दरम्यान संघाच्या अशा भाकड काळ परिस्थितीत कमी प्रतीचे ( पाणी घातलेले ) दूध घालून चांगल्या प्रतिच्या दूधाची बिले घेण्याचा प्रकार संघात सुरू आहे.
संघ बचाव समितीचे मुख्य प्रवर्तक आणि मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुकच्या चंद्रभागा दुग्ध संस्थेचे संचालक अनिल अवताडे यांनी या प्रकरणाचा पुराव्यानिशी भांडाफोड केला आहे. संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे आणि कार्यकारी संचालक राजीव सांगरोलीकर यांच्याकडे कारवाईसाठी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर कुठे कारवाईला मुहूर्त लागला.
प्रथम दर्शनी चौकशीत दोषी आढळलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या सुदर्शन आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील रामप्रसाद या संस्थांवर अखेर नाईलाजाने का होईना कारवा ईची कुऱ्हाड उचलली. या दोन्ही संस्थांचे संघाकडे दूध घेणे बंद केले आहे, तसे या संस्थांना कळविण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ कमी प्रतीच्या दूधाआडून मलिदा लाटणाऱ्या या बहाद्दर संचालकांची नावे आली पुढे …
कमी प्रतीचे दूध संघाला घालून चांगल्या प्रतिचे दूध घातल्याची बनवाबनवी करत, भाकड दूध संघाला ओरबडणाऱ्यांमध्ये संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी जे माजी आमदार राजन पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात, त्यांच्या कामतीमधील सुदर्शन संस्थेचा समावेश आहे. ( दीपक माळी यांच्याकडील उपाध्यक्ष पदाच्या तक्रारीचे प्रकरण सध्या चालू आहे, यामध्ये माळी यांनी अनेक कागदपत्रे बनावट तयार केल्याचे तपासात पुढे आले आहे ) तर संघाचे संचालक मनोज गरड हेदेखील दोषी ठरलेत. त्यांच्या रानमसले ( उत्तर सोलापूर ) येथील रामप्रसाद डेअरीचाही समावेश आहे. दीपक माळी आणि मनोज गरड हे संचालक या प्रकरणात दोषी असल्याची माहिती समोर आली आहे.
● असा झाला भांडाफोड
गेल्या आठवड्यात कामतीच्या सुदर्शन डेअरीच्या दूधाची प्रत ३:१/७:१ अशी होती, तर रानमसलेच्या रामप्रसाद डेअरीच्या दूधाची प्रत ३:/ ६.८ ही होती. याच दरम्यान विरवडे बुद्रुकच्या चंद्रभागा डेअरीच्या दुधाची प्रत ३:७ / ८.२ होती.संचालक मंडळींच्या दोन्ही संस्थांची दूधाची प्रतवारी कमी होती, हाच धागा पकडून अनिल अवताडे यांनी पुराव्यानिशी तक्रारी केल्या. मागच्या तीन महिन्यांपासून कमी प्रतीचे दूध घालून मलिदा लाटण्याचा प्रकार सुरू आहे, असे अनिल अवताडे यांनी ‘सुराज्य डिजिटल’ ला सांगितले.
□ हरकत घेणाऱ्या दीपक अवताडेंनाच बघून घेण्याची धमकी
दूध संघाला कामतीच्या सुदर्शन डेअरीकडू कमी प्रतीचे दूध घालण्याचा प्रकार मागच्या तीन महिन्यांपासून बिनदिक्कतपणे सुरू आहे म्हणे. याबाबत चंद्रभागा डेअरीच्या दीपक अवताडे यांनी हरकत घेतली. त्यावर कामती मार्गावरील दूध संघाचे वाहातूक ठेकेदार धनाजी माने यांनी अवताडेंना दमबाजी केली, बघून घेण्याची भाषा केली, असा आरोप दीपक अवताडेंनी केला असून माने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्याकडे केली आहे.