सोलापूर : मुळेगाव रोडवरील गंगाई केकडे नगरात मध्यरात्री दीडच्या दरम्यान एका 35 वर्षीय इसमाचा खून झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Solapur. Murder of Tenant; There is talk of an accident due to pot money
नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, केकडे नगरातील रहिवासी कोकणे यांच्या घरात मयत माधू नारायणकर हे भाड्याने राहत होते. मटक्याच्या पैशावरून हा घातपात झाल्याची चर्चा होत होती. काल मंगळवारी (ता. 20) नारायणकर हे आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते.
मध्यरात्री दीडच्या दरम्यान त्यांना एक फोन आल्याने ते उठून घराच्या बाहेर गेले, याच दरम्यान अनोळखी इसमाने येऊन त्यांचा गळा आवळला आणि धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.
आपला पती बाहेर का गेला हे पाहण्यासाठी म्हणून पत्नीने बाहेर येऊन पाहिले असता पती हा रक्ताच्या थारोळ्यात पढलेला दिसून आला. पत्नीने आरडाओरडा केल्याने शेजारी जमा झाले, त्यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांनी ही घटनास्थळी भेट दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
□ नदीत बुडालेला मृतदेह दोन दिवसांनी आढळला
सोलापूर – पाकणी येथील सीना नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्यात तोल जाऊन बुडालेल्या अशोक भीमराव जाधव (वय ४० रा.रायगाव ता.करमाळा) यांचा मृतदेह मंगळवारी (ता.20) सकाळी तिर्हे (ता.उत्तर सोलापूर) येथील पाण्यात तरंगताना आढळून आला.
अशोक जाधव हे रविवारी पाकणी येथे सासरी आले होते. दसऱ्याच्या निमित्ताने ते पत्नी आणि मुलीसह रविवारी दुपारी एकच्या सुमारास पाकणी येतील सीना नदीच्या बंधार्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता.
पोलीस आणि नागरिकांनी शोध घेतले असता त्यांचा मृतदेह आढळला नव्हता. आज सकाळी त्यांचा मृतदेह घटनेच्या १० कि.मी.अंतरावरील तिर्हे येतील पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली. हवालदार महिंद्रकर पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
– हंगरगा येथे आत्महत्येचा प्रयत्न
हंगरगा (ता.तुळजापूर) येथे राहणाऱ्या विकास गणपत बिराजदार (वय २८) याने स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मागचे कारण समजले नाही.
● २५ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी दोघेजण अँटी करप्शनच्या जाळ्यात
सोलापूर : वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच मागितल्याने मंडल अधिकार्यासह कोतवालास दोन वेळा पडताळणी करून अँटीकरप्शन विभागाने ताब्यात घेतले आहे.
मदनसिंग सुपडसिंग परदेशी (वय-३५, पद-मंडल अधिकारी,अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर, मल्लिनाथ रेवणसिध्द बाळगी (वय-३६,पद-कोतवाल,अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता.दक्षिण सोलापूर) या दोघांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी कार्यालय येथे दिलेल्या वारस नोंदीच्या हरकती अर्जावर सुनावणी होवून तक्रारदार यांचे बाजुने निकाल देणेसाठी यातील आलोसे कोतवाल मल्लिनाथ बाळगी यांनी मंडळ अधिकारी परदेशी यांचे करिता म्हणून तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली व त्याबाबत खात्री करुन देणे करिता तक्रारदार यांचे मंडळ अधिकारी परदेशी यांच्याशी फोनवरुन बोलणे करुन दिले असता मंडळ अधिकारी परदेशी यांनी त्यास संमती दिल्याने दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.ही कारवाई उमाकांत महाडीक,पोलीस निरीक्षक,लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना अतुल घाडगे, पोशि स्वप्नील सण्णके, चापोशि उडानशिव यांनी केली.