Solapur: The growing strength of the Shinde group is a headache for the BJP Vijay Deshmukh
सोलापूर / अजित उंब्रजकर : शिंदे गटाची वाढती ताकद भाजपची डोकेदुखी बनण्याची शक्यता? राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होऊन महाआघाडीची सत्ता गेली तर शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपची सत्ता आली. यानंतर संपूर्ण राज्यात शिंदे गटाची ताकद वाढत आहे. सोलापूर शहरातही अशीच परिस्थिती असून शिंदे गटात अनेक माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे तर आणखी काही माजी नगरसेवक प्रवेशासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सर्व महापालिका निवडणुका शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोलापुरात शिंदे गटाची वाढणारी ताकद ही आगामी काळात भाजपची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना आपलीच आहे, असा दावा केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना असा दावा केल्यामुळे संपूर्ण राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याचा अनेक नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा कल वाढला आहे. सोलापुरातही अशीच परिस्थिती आहे. सोलापुरात एकनाथ शिंदे गटात माजी नगरसेवक, अमोल शिंदे मनोज शेजवाल, हरिभाऊ चौगुले यांच्यासह अनेक मोठे पदाधिकारी गेले आहेत. शिवाय आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत.
मध्यंतरी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा सोलापुरात दौरा झाला. त्यावेळी त्यांनी आगामी काळात अनेक मोठमोठे नेते शिंदे गटात येतील, असे वक्तव्य केले होते. शिंदे गटात वाढणारा नेत्यांचा प्रवेश हा आगामी काळात भाजपसाठी डोकेदुखी बनणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राज्यातील सर्व महापालिका निवडणुका शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. जर महापालिका निवडणुकीत या दोन दोन्ही पक्षाची युती झाल्यास सोलापुरात जागा वाटपात अडचण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जे जे नेते सध्या शिंदे गटात प्रवेश करू इच्छित आहात त्यापैकी अनेक जण पुन्हा महापालिकेसाठी इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी द्यायची झाल्यास भाजपच्या जागा कमी होणार आहेत. सध्या भाजपकडे ही प्रत्येक प्रभागात उमेदवार आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत शिंदे गट आणि भाजपची युती झाल्यास अनेक प्रभागात अडचण होण्याची शक्यता आहे.
सध्या शिंदे गटात जे जे प्रवेश करत आहेत ते सध्या बहुतांश शहर उत्तर मधीलच पदाधिकारी आहेत. शहर उत्तर भाजपचा हा बालेकिल्ला आहे तेथे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पूर्वीपासूनच जोरदार बिल्डिंग लावली आहे. कमीत कमी 30 नगरसेवक शहर उत्तरमधून निवडून आणायचे असा विडा आमदार विजयकुमार देशमुख यांनी उचलला आहे.
मात्र शिंदे गट आणि भाजपची युती झाल्यास येथील काही जागा शिंदे गटाला भाजपला सोडावे लागणार आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपची पंचाईत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे शिंदे गटाची वाढती ताकद भाजपच्या पर्यायाने आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठी मोठे दुखी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
□ भाजपच्या नेत्यांची मोठी कसोटी लागणार
भाजपला बंडखोरीची भीती 2019 ते 2021 दरम्यान राज्यात महाआघाडीची सत्ता असतानाही सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार, असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होता त्यामुळे अनेकांनी गेल्या दोन वर्षापासूनच महापालिकेची तयारी सुरू केली होती आता सत्तांतर होऊन भाजपची सत्ता राज्यात आली आहे.
त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास आणखीनच वाढला आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक प्रभागात तीन ते चार जण इच्छुक आहेत अशा परिस्थितीत भाजप आणि शिंदे गटाची युती झाली आणि शिंदे गटाला काही जागा सोडण्याचा निर्णय झाल्यास भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात उमेदवारी देताना आणि समजूत घालताना भाजपच्या नेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे.