□ सोलापूर जिल्ह्याला चौथा गेटकेन पार्सल संपर्कमंत्री
□ राज्य पातळीवर सोलापूरला गृहीत धरून कारभार
□ भूमिपुत्र जिल्ह्याचा पालकमंत्री कधी होणार ?
Tanaji Sawant Radhakrishna Vikhe Patil Solapur Gateken Contact Minister
सोलापूर : मुख्य राज्यासह केंद्रात देखील राजकीय नेतृत्वाचा ठसा उमटवेल्या सोलापूर जिल्ह्याला गृहीत धरून कारभार सुरू असून या जिल्ह्यावर अहमदनगरस्थित मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील या गेटकेन पालकमंत्र्याला आणून बसवण्यात आले असताना नव्या पालकमंत्र्यांच्या स्वागतला नाराजीच्या पायघड्या आहेत.
विशेषत्वे, गेटकेन पालकमंत्र्यावरून जिल्ह्यात पुन्हा नाराजीचा सूर उमटला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवणे क्रमप्राप्त होते, असाही सूर सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात उमटत आहे. शिंदे गट प्रणीत शिवसेना व भाजप युतीच्या सरकारमधील पालकमंत्रीपदच्या मागच्या साधारण दीड महिन्यांपासून रखडलेल्या प्रक्रियेचा निर्णय शनिवारी मार्गी लावण्यात आला. पालकमंत्रीपदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय प्रतिनिधित्व करीत असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांवर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीवरून सोलापूर जिल्ह्यात नाराजी पसरली आहे. विखे पाटील यांना या जिल्ह्याची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसताना त्यांची यापदी नियुक्ती केल्याने त्यांच्या या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून काय न्याय मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यातील सत्तांतरापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना देखील जिल्ह्यातील कोणत्याच आमदाराकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नव्हती. या पदाला ‘लायक’ असणारा एकही आमदार सोलापूर जिल्ह्यात नव्हता का? असा संतापजनक सवाल त्यावेळीही वारंवार उपस्थित केला जात होता.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड तसेच दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या ‘सिंहासना’वर आणून बसविण्यात आले. हे सगळे पालकमंत्री जिल्ह्यासाठी गेटकेन पार्सलच होते. दरम्यान गेटकेन पार्सलच कित्ता राज्यातील सध्याच्या शिंदे गट शिवसेना आणि भाजप युती सरकारने गिरवला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी या जिल्ह्याचा स्थानिक आमदार पालकमंत्री न करता परजिल्ह्यातील आमदार इथे पालकमंत्री म्हणून बसविण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ दगडापेक्षा वीट मऊ…
राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर आणून कोणता हेतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साध्य केला याचा अंदाज कोण्याच राजकीय विश्लेषकांना लागेना झाला आहे. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आश्चर्यकारक धक्का दिल्लीस्थित भाजपवाल्यांनी दिला.
त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर विखे पाटील यांची नियुक्ती करण्याचा वेगळा धक्का वा राजकारण आहे का? याचीही पडताळणी केली जात आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातले प्रा. सावंत हे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी चालले असते, कारण ते या जिल्ह्याचे भूमिपुत्र तरी आहेत. उस्मानाबादसह सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असती तरी सोलापूर जिल्ह्यात संताप व्यक्त केला गेला नसता. ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असे जिल्ह्याने मानले असते.
□ सावंत का नको ?
फडणवीस यांच्यासारख्या मंत्र्यांकडे तब्बल सहा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद ठेवले गेले. अन्य काही मंत्र्यांकडदेखील अधिक जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे दिली गेली आहेत. असे असताना उस्मानाबाद जिल्ह्याबरोबरच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सावंत यांना का दिले गेले नाही? सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अनभिज्ञ असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाच का या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले गेले. सावंत का नको होते ?
□ आता कोणता नवा चमत्कार ?
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर आणून बसवलेल्या इंदापूरचे गेटकेन पार्सल दत्तात्रय भरणे यांनी मोठा चमत्कार घडविला. इंदापूर आणि बारामती तालुक्यातील गावांसाठी उजनीतून पाणी पळविण्याचा तो चमत्कार. अशात आता राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अहमदनगरला काय नेण्याचा चमत्कार दाखवतात ? हे येणारा काळच सांगेल.
□ निर्णयाकडं लक्ष ते कायमच …
राज्यातील विद्यमान सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात होणार आहे म्हणे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार ? जिल्ह्यात कोणत्या तालुक्याकडे लाल दिवा जाणार याबद्दलचे प्रचंड औत्सुक्य आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून जिल्ह्यात कोणाला लाल दिवा मिळणार? ते आता पुढील महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंत कायम राहील.