□ टप्प्यात येताच टीकेचा ‘करेक्ट कार्यक्रम’, अनगरकरांवर धडाडल्या तोफा
सोलापूर / शिवाजी भोसले
टप्यात आले की विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे तसे प्रत्येक राजकारण्याचे ठरलेले असते. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि या पक्षाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील हे तरी कसे अपवाद ठरणार ? अनगरकर पाटील मंडळी केव्हा कचाट्यात सापडतायेत आणि त्यांचा कधी करेक्ट कार्यक्रम करायचा? याची संधी शोधत असलेल्या नरखेडचे उमेश पाटील यांच्यासमोर अखेर ती संधी आली आणि त्यांनी त्यांनी ‘करेक्ट कार्यक्रम केला. Umesh Patal’s ‘Ashva’ became Susat; Photo from the banner – Narkhedkar Angarkar ‘directly’ accused of removing the symbol
खुद्द बारामतीकरांनी लगाम लावलेला त्यांचा अश्व पुन्हा उधळला. टप्यात येताच, जहरी टिकेचा कार्यक्रम झाला. अनगरकरांच्या दिशेने उमेश पाटलांच्या चौफेर तोफा धडाडल्या. पोस्टरवरील फोटो काढण्याच्या विषयाचे आयतं कोलीत उमेश पाटलांच्या हाती लागले.
विशेषत्वे, उमेश पाटलांच्या धडाडणाऱ्या तोफांना परतवून लावण्याची भूमिका अनगरकर पाटील पिता – पुत्रांनी सध्या तरी घेतली नाही. वर्चस्वाच्या घनघोर लढाईत उमेश पाटलांकडून अनगरकर पाटील यांच्यावर जहरी टिकेचे बाण सुटत होते. याने अनगरकर पाटील परिवार घायाळ झाला होता.
प्रसंगी उमेश पाटलांच्या ‘सळो की पळो’ करण्यातून अनगरकरांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपाचे कमळ हाती धरण्यासाठी प्रयत्न केले. कमळ हाती घेण्यातून त्यांनी मुंबई आणि दिल्ली अशा काही वाऱ्यादेखील केल्या. याच टप्यावर बारामतीकरांनी राजन पाटील आणि त्यांचे सुपुत्र यांची समजूत काढली होती.
या दरम्यान अनगरकर पाटील यांनी उमेश पाटील यांच्या विरोधात बारामतीकर पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकड तक्रारी केल्या होत्या. उमेश पाटील यांनी टिका करत त्रासून सोडले आहे, त्यामुळेच आम्ही राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात आहोत असे सांगितले होते. (वास्तविक नक्षत्र प्रकरणातून वाचणे आणि लोकनेते कारखाना स्व: मालकीचा राहणे यासाठी त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय आहे का हा भाग वेगळा) राजन पाटील परिवारांने राष्ट्रवादी सोडून जाणे पक्षाला परवडणारे नाही, या दूरदृष्टीतून बारामतीकरांनी राजन पाटील यांची समजूत काढण्याबरोबरच, दुसरीकडे उमेश पाटील यांनादेखील समजावले होते. यावर उमेश पाटील काही दिवस शांत होते.
अनगरकरांच्या विरोधातील टिकेचे बाण त्यांनी भात्यात घालून ठेवले होते. अनगरकारांनीदेखील संयम दाखवत उमेश पाटील यांच्यावर टिका करणे बंद केले होते. यातून मोहोळ तालुक्यात जणू वादळापूर्वीची शांतता जाणवत होती. मात्र घडले वेगळेच. अनगरकर पाटील उमेश पाटलांच्या टप्यात आले. मोहोळ शहरासह अन्य ठिकाणी लावलेल्या पोस्टर बॅनरवरून बारामतीकर शरद पवार, अजित पवार तसेच जयंत पाटील यांच्या छबीसह राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हदेखील बॅनरवरून बाजूला केले होते. हेच आयते कोलीत उमेश पाटलांच्या हाती लागले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यावर उमेश पाटील यांनी अनगरकर पाटील पिता पुत्राला लक्ष्य केले. नरखेडकर पाटलांचा अश्व पुन्हा सुसाट झाला. टीकेच्या तोफा त्यांनी धडाडत्या ठेवल्या. अनगरकरांचा भाजप प्रवेश नक्की आहे, म्हणूनच त्यांनी बॅनरवरून फोटो आणि चिन्ह बाजूला केले असा थेट आरोप लावत, त्यांनी अनगरकर पाटील परिवाराचा खरपूस समाचार घेतला.
□ शरद पवारांच्या दरबारी पोहचली सीडी, बारामतीकर कोणती घेणार भूमिका ?
मोहोळ तालुक्यातील पोस्टर आणि बॅनरवरून शरद पवार, अजित पवार तसेच जयंत पाटील यांच्या छबीसह राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळाच चिन्ह हटवणे यासंदर्भातील पोस्टर बॅनरचे शुटींग तसेच उमेश पाटील यांनी भाषणातून या प्रकरणाचे केलेले पोस्टमार्टम या सगळ्याची व्हिडीओ सीडी शरद पवार, अजित पवार तसेच जयंत पाटील यांना पाठवण्यात आल्या असून अनगरकर पाटील यांचा भाजप प्रवेश कसा निश्चित आहे, हे दाखवण्याचा घाट या सिडीतून करण्यात आला आहे. दरम्यान या सिडी पाहून शरद पवार तसेच अजित पवार कोणती भूमिका घेतात? याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.
□ उमेश पाटलांचे क्लीन प्रश्न, अनगरकरांना गाठले खिंडीत
अनगरकर पाटील परिवार जर राष्ट्रवादीतच राहणार असेल, तर मग पोस्टरवरती नेतेमंडळींच्या छबी का घेतल्या नाहीत ? राष्ट्रवादीचे चिन्हसुध्दा का गायब केले? शिवाय यापूर्वी जेव्हा जेव्हा बॅनर लागली, त्या त्या वेळी राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नेतेमंडळींच्या छबी त्यावर ठळकपणे होत्या. तेव्हा हे कसे चालेल? मग आता काय झाले ? क्लीन प्रश्न पर्यायाने असा मुद्दा उपस्थित करत उमेश पाटील यांनी अनगरकांना पुन्हा खिंडीत गाठले.
□ नरखेडकरांचे पुन्हा ओपन चॅलेज… असेल हिम्मत, तर या मैदानात
मोहोळ तालुक्यावरील वर्चस्वाच्या टोकाच्या संघर्षात, उमेश पाटील यांनी राजन पाटील आणि त्यांच्या सुपुत्रांना यापूर्वी अनेकदा खुले आव्हान दिले होते. आता पुन्हा एकदा ओपन चॅलेज दिले आहे. ज्यांनी उर्जा दिली, ताकद दिली त्यांचेच फोटो काढणार असाल तर मी आता कोणाचेच ऐकणार नाही, हिंमत असेल तर कोणत्याही पक्षातून माझ्यासमोर लढण्यासाठी या, बारा वाड्यावर आणि तेराव्या अनगरमध्ये मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावा, गावातील एक मत सुध्दा पडणार नाही. अनगर आणि वाड्यांच्या जीवावर उड्या मारणाऱ्यांनी मतांची गोळा बेरीज सांगू नये, निवडणुकीत येणारे वेगळे वास्तव असते असे सांगत उमेश पाटील यांनी कडवे आव्हान दिले आहे.
□ अनगरकरांचा नाईलाज
शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील या श्रेष्ठींना उमेश पाटील यांना समजावत राजन पाटील परिवारावर कडवी टिका करण्यापासून परावृत्त केले होते. त्यावर उमेश पाटील हे थंडही झाले होते. पण जेव्हा बॅनरवरून शरद पवार, अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ हे हटवण्यात आले. तेव्हा अनगरकर पाटील पिता पुत्रांनी बारामतीकरांना नाकारल्याचे लपून राहिले नाही. हाच नेमका मोका उमेश पाटील यांनी गाठून अनगरकरांवर तुटून पडले. तिथे अनगरकांचा नाईलाज झाला असे मानले जात आहे. घडल्या प्रकारावर अनगरकर चिडीचूप आहेत, असे मानले जाते.