● मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना
• सोलापूर : जिल्ह्यात लम्पी आजारग्रस्त जनावरे वाढत आहेत. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या ऊसतोडणी कामगार बैलगाड्यांसोबत, गायी, म्हशींसह येत आहेत. यामुळे येणाऱ्या जनावरांचे लसीकरण झाले की नाही, याची तपासणी कारखाना प्रशासनाने करावी. तसेच यासाठी सर्व साखर कारखान्यांनी एक समन्वय अधिकारी नेमावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. Solapur. Sugar mills should appoint coordination officer for lumpy: CEO Dilip Swamy
जिल्ह्यातील लम्पी आजाराबाबत नियोजन भवन येथे गुरूवारी सीईओ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, प्रादेशिक उपसंचालक (साखर) पांडुरंग साठे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ज्योती परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे उपस्थित होते. तसेच ऑनलाईनद्वारे सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
यावेळी सीईओ स्वामी म्हणाले, जिल्ह्यात लम्पी आजाराने ५५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९३.२९ टक्के जनावरांचे लसीकरण झाले. आहे. उर्वरित जनावरांचे आठवड्याभरात लसीकरण होईल. प्रत्येक साखर कारखान्यांनी ऊसतोडणीसाठी जिल्ह्यात येणाऱ्या जनावरांचे लसीकरण झाले की नाही, याची तपासणी करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमावा. शिवाय कारखान्यांनी निवडक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना तपासणीसाठी नियुक्त करावे.
□ कारखान्याने जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा
जिल्ह्यात येणारी बैल, गायी यांचे लसीकरण झाल्याचे तपासून खात्री करूनच प्रवेश द्यावा. तपासणीमध्ये त्या जनावरांना लस देऊन २१ दिवस झालेले असावे. २१ दिवस झाले नसल्यास अशा जनावरांना त्वरित कारखाना परिसरातील विलगीकरण कक्षात ठेवावे. यासाठी विलगीकरण कक्ष तयार करावा. यासाठी साखर कारखाना प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा. संपर्कात राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना सरकारकडून मदत जाहीर
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेत लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसार दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजार मदत दिली जाणार आहे. तसेच इतर गोवंशाच्या मृत्यूबाबतही मदत दिली जाणार आहे.
पशुसंवर्धन विभागातील अधिकारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली असून, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्यात मागील दोन… महिन्यांत शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
मान्सूनचा पाऊस लांबल्याने हाती आलेल्या पिकाची हानी होत असून, शेतातून पिके काढण्याची वेळ आली तरी पाऊस कमी झाला नसल्याने उभ्या पिकांला पुन्हा कोंब फुटण्यास सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, जनावरे आजारी पडून दगावत आहेत. दुधाच्या व्यवसायालादेखील उतरती कळा लागली आहे. अशा या दुहेरी आर्थिक संकटावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजारांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे. सरकारकडून या मदतीचा शासन आदेश बुधवारी सायकाळी उशिरा जारी करण्यात आला असून, ४ ऑगस्टपासून जी जनावरे लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. या शासन निर्णयानुसार, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे.