• सोलापूर : पळवापळवीनंतर अस्तित्वात आलेल्या ई-डी सरकारला पाच महिने झाले. त्यातील एक महिना तर फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात होते. उर्वरित चार महिन्यातील तीन महिन्यात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क चार प्रकल्पांनी महाराष्ट्रातून अन्य राज्यांसाठी टेक ऑफ केले आहे. Take-off of four projects in three months, landing of ‘Tata’ Airbus in Gujarat ED Govt
पुण्यात होणारा वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ ‘टाटा’च्या एअरबसने गुजरातमधील बडोद्याला लँडिंग केले आहे. परिणामी तब्बल १.८० लाख कोटी रुपयांचे हे चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे जवळपास एक लाख रोजगारांना महाराष्ट्र मुकला आहे.
अवघ्या तीन महिन्यात महाराष्ट्रातून चार मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. या प्रकल्पांची किंमत १.८० लाख कोटी रुपये इतकी आहे. यामुळे महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. शिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जवळपास एक लाख रोजगार मिळण्याची संधीही हुकली आहे. आता ऐन दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे.
□ आदित्य ठाकरेंची सरकारवर सडकून टीका
महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
□ उद्योगमंत्रीच म्हणाले, टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गेला गुजरातला
वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ नागपुरात होणार एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. ‘टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरातील मिहान येथे होत आहे. त्यासाठी, आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. टाटा कोलॅबरेशनसह हा प्रकल्प येत आहे, त्यामुळे टाटा एव्हीएशनच्या लोकांसाठी आम्हाला बोलावे लागणार आहे,’ असे उद्योगमंत्री उदय सामंत सप्टेंबरमध्ये म्हणाले होते. मात्र, तरीही हा प्रकल्प गुजरातला गेला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
१. टाटा एअर बस
टाटा एअरबसचा सी – २९५ लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा नागपूरमधील प्रस्तावित प्रकल्प गुजरातमधील बडोद्याला गेला आहे. या प्रकल्पांची किंमत २२ हजार कोटी रुपये इतकी होती. राज्याचे उद्योगमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टाटा एअरबसचा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये होईल असा विश्वास होता. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार होता.
२. वेदांता- फॉक्सकॉन
गेल्या काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पही गुजरातला गेला होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प १.५४ लाख कोटी रुपयांचा होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता सोबत झालेल्या चर्चेनुसार, सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे ८० हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील ३० टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता.
३. रायगडमधील बल्क ड्रग पार्क
केंद्र सरकारमार्फत देशात चार मोठे बल्क पार्क उभारण्यात येणार आहेत. यातील एक प्रकल्प रायगड जिल्ह्यातील रोहा व मुरूड येथे होणार होता. त्यासाठी ५ हजार एकर जमीन देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ३ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून ५० हजार जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार होता. पण हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता दिली.
४. औरंगाबादचा मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प
औरंगाबादमधील मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प (वैद्यकीय उपकरणाचे कारखाने) सप्टेंबरमध्ये रद्द करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ४२४ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३ हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार होता. पण महाराष्ट्रातील प्रकल्पाला मान्यता मिळाली नाही. त्याचवेळी तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.