□ आनंदाश्रू दाटले नयनी, हृदयस्पर्शी सोहळा पाहुनी !
सोलापूर : महापालिकेत अनंत अडचणींना तोंड देत सुमारे 25 ते 35 वर्षे रोजंदारी कामगार म्हणून सेवा बजावली. 14 वर्षांच्या लढा आणि पाठपुराव्यानंतर सेवेत कायम होण्याची अखेर स्वप्नपूर्ती झाली. 131 रोजंदारी कामगारांना मंगळवारी (ता.1) कायम नियुक्ती आदेश प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. “आनंदाश्रू दाटले नयनी, हृदयस्पर्शी सोहळा पाहुनी !” असाच भावनिक प्रसंग पहायला मिळाला. Finally, Praniti Shinde Ashok Janrao granted permanent appointment order to 131 daily workers of the Municipal Corporation in a touching ceremony.
महापालिकेतील सन 1995 पूर्वीच्या 131 रोजंदारी कामगारांना कायम सेवा नियुक्ती आदेश मंगळवारी दुपारी प्रदान करण्यात आले. हलगीच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. महापालिका आवारात हिरवळीवर हा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. आमदार प्रणिती शिंदे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या हस्ते कामगारांना कायम नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक चेतन नरोटे, महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, कामगार नेते जनार्दन शिंदे, सरचिटणीस प्रदिप जोशी, सचिव चांगदेव सोनवणे , शशिकांत सिरसट, बाली मंडेपू , अजय क्षीरसागर, अनिल जगझाप आदींसह मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापालिका सभेत दिनांक 26 ऑक्टोबर 1995 रोजी केलेल्या ठरावानुसार महापालिकेतील रोजंदारी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम करण्यात येत होते. दरम्यान, सोलापूर महापालिकेतील 3100 पैकी राहिलेल्या 131 रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित होता. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवण्यात आला होता.
अखेर या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली. काही दिवसांपूर्वी तसा शासन आदेश नगरविकास विभागाने काढला. सुमारे 25 ते 35 वर्षे रोजंदारीवर या कामगारांनी अनंत आर्थिक व कौटुंबिक अडचणींना तोंड देत सेवा बजावली. कामगार नेते अशोक जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने तब्बल 14 वर्षांच्या दीर्घ लढ्याला व पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आमदार प्रणिती शिंदे यांनीही याकामी सहकार्य केले. त्यानंतर अखेर या 131 रोजंदारी कामगारांना कायम सेवा नियुक्ती आदेश मंगळवारी दुपारी प्रदान करण्यात आले. महापालिका आवारात हिरवळीवर हा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
यामध्ये झाडूवाली 4, बिगारी 125 व मलेरिया फिल्ड वर्कर 2 अशा 131 रोजंदारी सेवकांचा समावेश आहे.सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अनेक वर्षांचे कष्ट सार्थकी लागल्याची भावना या कामगारांनी व्यक्त केली. यावेळी महिला व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप जोशी यांनी केले. आभार शशिकांत शिरसट यांनी मानले.
□ लोकांचे काम करण्याचा आनंद मंत्रीपदात नाही : आ. शिंदे
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, महापालिकेच्या ऐतिहासिक ठिकाणी हा सोहळा पार पडला. कामगार व संघटना यांना काय अडचणी येतात, हे माहीत आहे. कामगार हा कुटूंबाचा भाग आहे. मला आपुलकी वाटते. हे माझं कर्तव्य आहे. जनतेच्या कामासाठी मी इथे सोलापुरात थांबले. पण मला लोकांसाठी काम करायचं होतं. अन्यथा उच्च न्यायालयात वकिली केली असती. लोकांचे काम करण्याचा आनंद मंत्रीपदात नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला तर रान पेटवू असा इशारा दिला. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे. लोकशाहीत भीती लोकांची हवी हुकूमशाहीची नसावी. महागाई वाढली. कशी बशी लोकांनी दिवाळी साजरी केली. सामान्य जनतेचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे.
यावेळी कामगार नेते जानराव यांच्या कामाचे कौतुक केले. मला आव्हानात्मक काम करायला आवडते. डिसेंबर महिन्यात अधिवेशनात उर्वरित सन 1995 नंतरच्या 257 रोजंदारी कामगारांना कायम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची आ. प्रणिती शिंदे यांनी ग्वाही दिली.
□ प्रत्येक कामाला शासनाचे मार्गदर्शन नको : आ. शिंदे
महापालिका आयुक्त हे काम चांगले करीत असले तरी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याबद्दल आ. प्रणिती शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शनासाठी प्रस्ताव पाठवू नये. तुम्हाला माहित असताना वेळ घालवू नका. शासन पुन्हा प्रस्ताव पालिकेकडे पाठविते. हा खेळ नाही. जिवाभावाचे प्रश्न असतात. संवेदनशीलता दाखवा. माझेही काही प्रस्ताव मार्गदर्शनासाठी पाठवले आहेत. तातडीने कामे मार्गी लावावीत अशी सूचना आ. प्रणिती शिंदे यांनी केली.
□ 14 वर्षानंतर माझं ध्येय पूर्ण झाले : जानराव
महापालिकेच्या 3100 कामगारांपैकी राहिलेल्या 131 रोजंदारी कामगारांना कायम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा केली होती. 14 वर्षे पाठपुरावा केला. अखेर सततच्या पाठपुराव्याने ते माझे ध्येय आज पूर्ण झाले. हे कर्मचारी कायम झाले. याचे मोठे समाधान वाटते, अशी भावना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधीचे यावेळी कामगार नेते अशोक जानराव यांनी आभार मानले. यापुढे सन 1995 नंतरच्या रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचै सांगितले.