□ शेतकऱ्यांचा गनिमी कावा ; कारखानदारांचे आडमुठे धोरण ; वाहतुकदार परेशान
सोलापूर : ऊसदरासाठी संघर्ष समिती आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींची ऊसदराची बैठक फिसकटल्यानंतर ऊसदर आंदोलन अधिक आक्रमक वळणावर पोहोचले असून रस्त्यारस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडले जात आहेत. कारखानदार अन् शेतकऱ्यांतील संघर्ष वाढला असून पन्नासपेक्षा जास्त वाहनांचे टायर फोडून राग काढला आहे. Solapur. Conflict between industrialists and farmers increased; The Bhajan Andolan sugarcane transport angered by bursting the tires of more than fifty vehicles
काल रात्री जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, माढा, माळशिरस, मंगळवेढा इत्यादी भागांमध्ये ५० ते ६० ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत. या आंदोलनाला शेतकऱ्यांची छुपीसाथ मिळत असून संघर्ष समितीच्या गनिमी काव्याने वाहतुकदार परेशान झाला आहे. दुसरीकडे कारखानदाराच्या बेदखल भूमिकेमुळे हे आंदोलन आता अधिकच आक्रमक होत आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी यांनी काही मार्ग निघण्याच्या अपेक्षेने बैठक बोलावली होती. परंतु कारखानदारांनी याला प्रतिसाद न देता आडमुठे धोरण स्विकारले. त्यामुळे संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे.
ऊसाचा अंतिम दर ३ हजार १०० आणि पहिली उचल २ हजार ५०० रुपयांची द्यावी या मागणीसाठी उसदर संघर्ष समितीने आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. पंढरपूर येथे ऊस परिषद घेवून या मागणीसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या. कारखान्यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. कारखान्यांनी या परिषदेच्या मागण्याची आणि आंदोलनाची कसलीही दखल घेतली नाही.
त्यामुळे टप्प्याटप्याने संघर्ष समितीने आपले आंदोलन अधिक उग्र करण्यास सुरुवात केली आहे.
त्याचा परिणाम रस्त्यारस्त्यावर दिसू लागलेला आहे. समिती आणि कारखाने यांच्यातील बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या आंदोलनाची धार वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात टायरफोड आंदोलन वेग धरू लागले आहे. ऊस दर संघर्ष समिती व साखर
कारखानदारांमध्ये ऊस दराची बैठक निष्फळ ठरली आहे. साखर कारखान्याचे चेअरमन या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे काही तोडगा निघण्याचा प्रश्नच आला नाही. या अनुपस्थितीचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात उमटत आहेत.
बार्शी कुर्डवाडी रोडवर शेंद्री स्टेशन व साक्षी पेट्रोलियम रिधोरे दरम्यान आंदोलकांनी ट्रॅक्टरचे चारही टायर फोडले. हा प्रकार हॉटेल शिवरायजवळ घडला आहे. मात्र साखर कारखानदारांनी कारखाना सुरू होऊन जवळपास दहा ते पंधरा दिवस उलटून देखील ऊस दराविषयी आपली भूमिका जाहीर केली नाही.
पंढरपूर तालुक्यात बाजीराव विहीर परिसरात पहिली टायरफोड घटना घडली आणि त्यापाठोपाठ याचे लोण जिल्ह्यात पसरू लागले आहे. पिराची कुरोली फाटा, दसूर पाटी, शेळवे, जुना अकलूज रोड अशी विविध ठिकाणी वाहनाचे टायर फोडले जात आहेत. यामुळे वाहनचालक मालक धास्तावलेले आहेत. आत्तापर्यंत पन्नास साठ वाहनाचे टायर फुटले असून संघर्ष समिती अधिकच आक्रमक होत चालली आहे.
□ ऊस वाहतूक रोखण्यासाठी भजन आंदोलन…
मंगळवेढा तालुक्यात असणाऱ्या चार कारखान्यांची ऊस वाहतूक रोखण्यासाठी बोराळे येथील चौकातच चार ते पाच गावातील शेतकरी एकत्र येत रात्री खडा पहारा देण्यासाठी चक्क विठ्ठलाचा धावा करीत भजन आंदोलन सुरू केले. या भजनाच्या माध्यमातून ‘बा.. विठ्ठला कारखानदारांना सद्धबुद्धी दे’ अशी मागणी करीत रात्र जागून काढली. अशीच अनोखी आंदोलने प्रत्येक गावागावातील चौकात पुढील काळात होणार असल्याचे ऊसदर संघर्ष समितीने सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापुरातील ऊस वाहतूकदाराचा पैसे घेऊन मध्य प्रदेशात खून
सोलापूर : मध्य प्रदेशमध्ये असलेल्या एका आदिवासी गावामध्ये ऊस तोड मजूर आणण्यासाठी गेलेल्या बेंबळे (ता. माढा) येथील प्रतिष्ठित बागायतदार प्रशांत उर्फ अण्णासाहेब महादेव भोसले यांचा खून करुन मजूर आणि मुकादम यांनी मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ऊस वाहतूकदार प्रशांत महादेव भोसले यांनी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठी करार केला होता. यासाठी मध्यप्रदेशातील ऊसतोड मजूर घेऊन भोसले
मध्य प्रदेशातील सेंधवा येथून येत असताना खांडवा (मध्यप्रदेश) पासून अर्धा कि.मी. अंतरावर चिचोरी या ठिकाणी मुकादम व मजूर यांनी संगनमत करून भोसले यांच्या जवळचे एक लाख ५० हजार व मोबाईल तसेच अगोदर दिलेले दोन लाख ४० हजार रुपये असे एकूण तीन लाख ९० हजार घेऊन निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (ता.30 ऑक्टोबर) सायंकाळी घडल्याची माहिती त्यांचे भाचे प्रमोद रेडे यांनी दिली.
भोसले हे मजुरांच्या पिकअपमध्ये बसले होते. तर त्यांच्या सोबत असणारे त्यांचे भाचे टेम्पोच्या पुढे होते. भोसले यांना वाचवण्यासाठी रेडे गेले असता त्यांना मारण्यासाठी मजूर धावून गेल्यामुळे ते पुढे जवळच असलेल्या महाराष्ट्राच्या सीमेवर गेले. अर्ध्या तासानंतर ते परत आले असता भोसले यांना मारून रस्त्यावर टाकून मजुरांनी पळ काढल्याची माहिती प्रमोद रेडे यांनी दिली.
या घटनेची मध्य प्रदेशातील खांडवा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून संबंधित ठाण्याकडून अधिक तपास सुरू आहे. भोसले यांच्या मृतदेहाचे धुळे येथील जिल्हा उपरुग्णालयात शवविच्छेदन केले गेले. काल सोमवारी (दि. 1 नोव्हेंबर ) दुपारी शवविच्छेदनानंतर भोसले यांचे प्रेत घेऊन सर्वजण बेंबळेकडे निघाले.
दरम्यान भोसले यांच्या खुनाची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली असून अनेक ऊस वाहतूक संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे. या संघटना आक्रमक झाल्या आहेत, भोसले यांना न्याय मिळावा तसेच ऊस वाहतूकदारांची मुकदम वा मजूर यांच्याकडून होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचलण्याची मागणी ऊस वाहतूकदारांकडून होत आहे.
□ असा केला घात
प्रशांत भोसले हे ठरल्याप्रमाणे शनिवारी (दि. 29 ऑक्टोबर) रोजी मध्य प्रदेशला गेले होते. रविवारी (दि. ३०) दिवसभर मजूर व मुकादम यांच्याशी चर्चा, बोलणी करून व त्यांना ॲडव्हान्स पैसे देऊन सायंकाळी सहा वाजता मजुरांची टोळी एका टेम्पोमध्ये भरून बेंबळेकडे येण्यास निघाले.
परंतु, याचवेळी टेम्पोतील मजुर व मुकादम यांनी प्रशांत भोसले यांना ‘अण्णा तुम्ही आमच्या टेम्पोतच बरोबर बसा’, असा आग्रह केला. प्रशांत भोसले यांना वाटले की प्रवास दूरचा आहे तेव्हा या मजुरांना चहापाणी, नाश्ता, जेवण पाहिजे असेल म्हणून त्यांनी टेम्पोत बसण्याचा आग्रह केला असावा व असे त्यांनी आपले भाचे प्रमोद रेडे यांना सांगितले होते. त्यानंतर ते मजुरांच्या टेम्पोत बसले. काही काळ स्कॉर्पिओ पाठीमागे व मजुरांनी भरलेला टेम्पो पुढे असा प्रवास सुरू होता.
यावेळी भोसले यांच्याजवळ किमान दोन ते सव्वा दोन लाख रुपयांची रोकड होती. हे पैसे टोळीच्या मुकादमाला व मजुरांना माहीत होते. थोड्याच वेळात टेम्पो पाठीमागून येईल या उद्देशाने स्कॉर्पिओ मधून प्रमोद रेडे व इतर दोघे यांनी आपली गाडी पुढे घेतली व ते पाठीमागून मामा टेम्पोमधून येतील या अपेक्षेने म.प्र.व महाराष्ट्र सरहद्दीच्या पुढे आले.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश या सरहद्दीवर तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर जंगली भागातील रस्ता आहे. परंतु स्कॉर्पिओ पुढे गेल्याचे पाहून मजूर बसलेला टेम्पो आड बाजूला घालून टेम्पोतच प्रशांत भोसले यांना बेदम मारहाण केली व त्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला फेकून दिले. पुढे गेलेल्या स्कॉर्पिओ मध्ये प्रमोद रेडे यांनी टेम्पोला उशीर का होत असावा, अशी शंका आल्यामुळे मामा प्रशांत भोसले यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल लागत नव्हता.
ब-याच वेळा प्रयत्न करूनही फोन लागत नसल्याचे दिसून येतात रेडे व इतर दोघांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व त्यांनी आपली गाडी माघारी फिरवून घेतली. परंतु परत थोड्याच अंतरावर जाताच त्यांना प्रशांत हे अत्यवस्थ अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. जवळचे पैसे लुबाडून त्यांना रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने महाराष्ट्र हद्दीतील श्रीरामपूर या गावी हॉस्पिटलमध्ये प्रशांत भोसले यांना दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
त्यानंतर प्रशांत रेडे यांनी ही बातमी रविवार, दि. ३० रोजी रात्री अकराचे दरम्यान बेंबळे येथे कळवली असता तेथून काही तरुण मंडळी व नातेवाईक तातडीने श्रीरामपूरच्या दिशेने रावाना झाले. काल सोमवारी दुपारी शवविच्छेदनानंतर भोसले यांचे प्रेत घेऊन सर्वजण बेंबळेकडे निघाले.