सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या दुचाकीला क्रूझर जिपने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शहराजवळील कुमठे रस्त्यावरील घोडातांडानजिक आज शुक्रवारी (ता.9) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
विकास लोकू चव्हाण (वय – १९) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. आज शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विकास हा आपल्या दुचाकी एचएफ डीलक्स (एमएच.१३.बीएन.१८३७) वरून कुमठे गावातील कॉलेजला जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणार्य क्रुझर गाडीने त्याला जोरदार धडक दिली. घटनेनंतर क्रूझर गाडी चालक फरार झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर विकासच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस पथक दाखल झाले. नातेवाईकांनी जोपर्यंत कार चालकास अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती, त्यावेळी पोलिसांनी समजूत काढून मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
विकास हा अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे घोडातांड्यावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. अधिक तपास फौजदार रफिक शेख,पोलीस नाईक प्रकाश सुरवसे हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● रिक्षाची मोटरसायकलीला धडक; एकाचा मृत्यू
सोलापूर : रिक्षा मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.६ डिसेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान जुना टीव्ही केंद्र न्यायाधीश निवासस्थान जवळ घडली.
याप्रकरणी सैफन मौला शेख (वय-२५,रा.शोभादेवी नगर,टिपू सुलतान चौक, नई जिंदगी) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सिकंदर निसास नदाफ (रा.कुर्बान हुसेन नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी हा त्याच्या ताब्यातील रिक्षा क्र. एम.एच.१३.बीवी.०५७८ ही रिक्षा विरुद्धदिशेने अतिवेगाने व बेकायदेशीरपणे चालून फिर्यादी यांच्या मोटरसायकल क्र.एम.एच.१३.बीडब्लू.६९७६ याला जोरात धडक देऊन फिर्यादी व फिर्यादी यांचा मित्र यांना गंभीर दुखापत झाली. तसेच फिर्यादी यांचा मित्र म.गौस हुसेनबाशा जहागीरदार यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.असे फिर्यादीत नमुद आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार हे करीत आहेत.
● प्रहारच्या जिल्हाध्यक्ष – शहराध्यक्षसह ६ जणांवर गुन्हे दाखल
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात विनापरवानगी गैरकायद्याची मंडळी जमवून जनावरे आणून बांधल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षसह सहा जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार शब्बीर तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, शहराध्यक्ष जमीर शेख, मुजाहिद रमजान सय्यद, मुस्तफा जाकीर हुसेन रचभरे, मोहसीन नजीर तांबोळी, अकिब नाईकवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे आहेत.
मंद्रूप येथील एमआयडीसीमध्ये शेत जमीन गेलेल्या काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून आंदोलन सुरू होते गुरुवारी या आंदोलनात प्रहार संघटनेने उडी घेतली. काही शेतकऱ्यांसह जनावरे घेऊन संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि थेट जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात नेली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेठीस तर धरलेच मात्र पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.