● घरात लग्न; दारात मोर्चाचे विघ्न, वधूपिता बंदोबस्तात मग्र
Leaving daughter’s marriage on onduty; Vivek Phansalkar Mumbai Police Maharashtra Police gives priority to duty when daughter is married
● आधी मोर्चा, नंतर लेकीचे लग्न, विवेक फणसाळकरांच्या ‘कर्तव्या’ची चर्चा
मुंबई : महाविकास आघाडीकडून मुंबईत काल शनिवारी महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात अनेक पक्षाचे नेते सामील झाले. तसेच हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचा काल विवाह सोहळा असताना सुद्धा ते बंदोबस्तात स्वत: हजर आहेत. मुलीचे लग्न असताना सुद्धा त्यांनी ड्युटीला प्राधान्य दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
इकडे दारात मांडव सजलेला… तिकडे मोर्चाची तयारी सुरू झालेली…, नवरी नटलेली… मोर्चासाठी नेते एकवटलेले…, विवाहस्थळी पै पाहुणे आणि नातेवाईक मंडळी गोळा झालेली… आंदोलनस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी जमलेले… इकडे नवरी नटली ; नवरा मुलगा पारण्यावरून आला… तिकडे विविध पक्षांची नेतेमंडळी आंदोलनासाठी गोळा झाली…, लग्नघरात लगीनघाई तर आंदोलनस्थळावर मोर्चा काढण्याची घाई… मांडवदारी हातात अक्षता; मोर्चास्थळी हातात निषेधाचे फलक…, इकडे मंगलाष्टिका आणि तिकडे घोषणाबाजी सुरू झालेली… दोन्ही ठिकाणचे ‘कर्तव्य’ पार पाडण्यासाठी एका माणसाची उपस्थितीत मात्र महत्त्वाची आणि तितकीच अत्यावश्यक… पण एकच माणूस एकाचवेळी दोन ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. अशावेळी त्या माणसाच्या अंगावरील ‘खाकी’ जागृत झाली अन् पहिल्यांदा खाकीचे ‘कर्तव्य’ पार पाडून ते लेकीच्या डोईवर अक्षता टाकण्याचे वधूपित्याचे ‘कर्तव्य’ पार पाडण्यासाठी गेले. चित्र आहे मुंबईतील.
काल शनिवारी (दि. १७) महाविकास आघाडीने निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार प्रकार घडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून बंदोबस्तावर देखरेख करत होते मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर. तिकडे घरात लग्न सुरू असताना इकडे मोर्चामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये; म्हणून मोर्चा सुरू असताना तिकडे वधूपिता डोळ्यात तेल घालून चोख बंदोबस्त ठेवण्यात होता. आधी मोर्चा उरकून नंतर लग्नाला उपस्थिती लावणाऱ्या फणसाळकरांचीच मोर्चात आणि लग्नात अशा दोन्ही ठिकाणी चर्चा ऐकायला मिळाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● लेकीचं लग्न बापाच्या आयुष्यातला अत्युच्च क्षण
लाडाची लेक म्हणजे बापाच्या मनातला मखमली कप्पा. लेकीसाठी बाप म्हणजे सर्व काही आणि लेक म्हणजे बापाचा जीव की प्राण. लेकीला ठेच लागताच बापाच्या डोळ्यात टच्चकन पाणी येतं. अशा लेकीचं लग्न म्हणजे बापाच्या आयुष्यातला अत्युच्च क्षण.
हा क्षण श्री. फणसाळकरांच्या आयुष्यात आलेला असतानाच त्यांच्यासमोर उभारला तो महाविकास आघाडीच्या मोर्चातील बंदोबस्ताचा प्रश्न. फणसाळकरांनी आधी ‘खाकी’चं ‘कर्तव्य’ चोखपणे बजावलं. त्यानंतरच ‘खाकी’मध्ये दडलेल्या बाप लेकीच्या लग्नाचं ‘कर्तव्य’ बजावण्यासाठी मांडवात पोहचला.
● लेकीचा बाप अन् मुंबई पोलीस दलाचा प्रमुख
विवेक फणसाळकर हे जसे त्यांच्या लाडक्या लेकीचा बाप आहेत; तसेच ते मुंबई पोलीस आयुक्त म्हणजे मुंबई पोलीस दलाचे प्रमुख आहेत. मुंबईचे पोलीस दल हेच त्यांचे सर्वात मोठे कुटुंब. या मोठ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य मोर्चातील बंदोबस्तात व्यस्त असताना त्याचा प्रमुख स्वतःच्या घरी लेकीचे लग्न करत बसेलच कसा? ते स्वतः बंदोबस्तात उतरले.
मोर्चा संपेपर्यंत ते जातीने बंदोबस्तावर देखरेख करत थांबले. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यानंतरच लग्नस्थळी जाऊन लग्न समारंभात सहभागी झाले.