● खा. धनंजय महाडिक यांनी केंद्राकडे वर्ग करण्यासाठी उपस्थित केला प्रश्न
विरवडे बु : अनेक वर्षापासून दुरावस्थ असलेल्या कुरुल – पंढरपूर रस्त्याचा प्रश्न राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत लक्षवेधीत उपस्थित केलाय. त्यांनी हा रस्ता केंद्राकडे वर्ग करण्याची मागणी केलीय. MP Dhananjay Mahadika raised the issue of Kurul-Pandharpur road in the Parliament as a central class demand
कुरुल (ता. पंढरपूर) या ३६ किलोमीटर राज्य महामार्गाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था आहे. तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा रस्ता व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहिले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रक्तदान आंदोलन घेतले. तरीही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोणतीच दखल घेतली नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार होताच त्यांनी सध्याच्या युती सरकारकडून रस्त्याच्या डागडुजीसाठी २० कोटी रुपये मंजूर करून घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत कुरुल-पंढरपूर रस्ता केंद्राकडे वर्ग करण्याची मागणी केली.
संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात बोलताना खा. महाडिक म्हणाले की, कुरुल – पंढरपूर हा महामार्ग महाबळेश्वर, सातारा, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या प्रमुख पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांना जोडणारा आहे. शिवाय हा महामार्ग पंढरपूर सारख्या धार्मिक स्थळाकडे जातो. श्रीक्षेत्र विठ्ठलाच्या आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्र या चार महत्त्वाच्या आणि मोठ्या एकादशीच्या मोठ्या यात्रा भरतात. त्यामुळे या महामार्गावरून अनेक दिंड्या जातात, हजारो भाविक पायी चालत जातात.
हा महामार्ग मुंबई – पुणे- विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडला आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी सोलापूर या महामार्गाला देखील हा मार्ग जोडलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्याच्या आसपास १५ साखर कारखाने असून कारखान्यांची ऊस आणि साखर वाहतूक याच मार्गावरून होते. त्यामुळे कुरुल पंढरपूर हा महामार्ग सातारा- पंढरपूर- कुरुल – कामती हा महामार्ग सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये समाविष्ट करावा, अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली.
□ तोपर्यंत पाठपुरावा सुरू राहील
– कुरुल पंढरपूर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारा वाटसरू अत्यंत घायकुतीला आला आहे. रस्ता व्हावा यासाठी वेगवेगळी आंदोलने झाली. मात्र राज्याच्या तत्कालीन सरकारने कसलीच दखल घेतली नाही. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मला जनतेचे प्रश्न संसदेच्या सभागृहात मांडण्याची संधी मिळाली.
पूर्वी फक्त कोल्हापूरचे आणि सर्वसमावेशक प्रश्न असायचे. आता कोणतेही भागातील प्रश्न मांडण्याची संधी आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील. पंढरपूर रस्ता जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही त्याचे नूतनीकरण होत नाही तोपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील.
– खा. धनंजय महाडिक
□ रक्त वाया जाणार नाही ही खात्री
कुरुल पंढरपूर रस्ता व्हावा यासाठी दोन्ही तालुक्यातील प्रतिनिधी मूग घेऊन गप्प होते. त्यामुळे मी व नागटिळक वकील तसेच अनेक संघटनानी सातत्याने पाठपुरावा केला. रक्ताने पत्र लिहिले. रक्तदान आंदोलन केले. मात्र तत्कालीन राज्य शासन व विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी कोणतीच दखल घेतली नाही.
मात्र आता खा. धनंजय महाडिक यांनी हा प्रश्न हाती घेतला आहे. परवा राज्य शासनाकडून २० कोटी मंजूर करून घेतले. आज संसदेत आवाज उठविला आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन केलेले रक्त वाया जाणार नाही ही शास्वती खासदार महाडिक यांच्यामुळेच वाटते.
– सुहास घोडके,
( आंदोलनकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ता )