पंढरपूर – स्थानिकांची एक इंच देखील जागा ताब्यात न घेता वारकरी, व्यापारी व नागरिक यांनी तयार केलेला भूवैकुंठ पंढरी विकास आराखडा आज सोमवारी (ता. 26) जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास सादर करण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये शासनापेक्षा तीस हजार चौ.मी. पेक्षा जास्त जागेवर विकासकामे सुचविण्यात आली आहेत. Development plan of Pandharpurkar submitted to the government; Varkari Sampraday includes instructions from local citizens Sri Vitthal Rukmini Mandir
याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नियोजित आराखडा कसा असावा याबाबत रामकृष्ण महाराज वीर यांनी सविस्तर माहिती देत सर्वांसमोर आराखडा सादर केला. राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असणार्या पंढरीचा विकास व्हावा यासाठी वाराणसी, उज्जैनच्या धर्तीवर येथे देखील कॅरिडॉरची घोषणा राज्य शासनाने जाहीर केली होती. मात्र यास स्थानिकांसह वारकर्यांनी कडाडून विरोध करण्यास सुरूवात केली.
पंढरीचे अध्यात्मिक वेगळेपणे, वारकरी परंपरा याची तुलना इतर तीर्थक्षेत्रांशी करू नये, असे सर्वांचे मत होते. यावर शासनाने कॉरिडॉर विरोधकांना आराखडा सादर करा, असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराज मंडळी, नागरिक, व्यापारी यांच्या सूचनांचा विचार करून भूवैकुंठ विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यामध्ये १ लाख ९ हजार ३५६ चौ.मी.जागेवर विकासकामे सुचविण्यात आली आहेत. तर दुसरीकडे शासनाने शेकडो घरे बाधित करून ७२ हजार चौ.मी.जागेवर विकासकामे सुचवली आहेत. विशेष म्हणजे स्थानिकांच्या आराखड्यामध्ये एक इंच देखील रूंदीकरण अथवा खासगी जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. तरीही ३७ हजारहून अधिक चौ.मी. अधिकच्या जागेत विकासकामे सुचवली आहेत. यामुळे शासनाच्या निधीची बचत होणार असून यास विरोध देखील होणार नसल्याचे वीर महाराज यांनी स्पष्ट केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना व्हिडीओ स्वरूपात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. आता जिल्हाधिकारी यांच्याकडून हा आराखडा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असून यानंतरच राज्य शासन पुढील निर्णय घेणार आहे. समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, वारकरी पाईक संघ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व संत भूमी बचाव समिती यांच्या वतीने सदर आराखडा तयार करण्यात आला आहे. तर निलेश बडवे – महाजन व मयुर पिंपळनेरकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळून अतिशय आकर्षक आराखडा बनवला आहे.
दरम्यान सदर आराखड्याचे लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर देखील सादरीकरण होणार असून कोणी सूचना केल्यास त्यांचा यामध्ये समावेश केला जाणार असल्याचे वीर महाराज यांनी सांगितले. चंद्रभागेच्या वाळवंटात उत्तर ते दक्षिण घाटालगत पूल उभारणे याद्वारे पर्यायी रस्ता होणार असून उध्दव घाट ते विप्रदत्त घाट नवीन प्रदक्षिणा मार्ग देखील तयार होणार आहे.
महाद्वार घाटावरुन चंद्रभागेच्या पैलतीरावर ६० फुटी रुंद पूल उभारुन यावर मध्यभागी विविध संतांचे भव्य पुतळे उभा करावेत. पदस्पर्श दर्शन मंडप सध्याच्या खादी ग्रामोद्योग जागेत उभा करुन टोकन दर्शन सुरु करावे. सदर जागा मंदिराच्या नजीक असून यामुळे भाविकांची पायपीट वाचणार आहे. या दर्शन मंडपाचा आकार विठुरायाच्या गंधाप्रमाणे आकर्षक असावा. टिळक स्मारक मैदान येथे मंदिर समितीचे भव्य अन्नछत्र उभारावे तसेच वारकरी सुविधा केंद्र करुन स्नान, भाविकांचे सामान ठेवणे यासाठी लॉकरुम उभारावे. जिजामाता उद्यान येथे संतांच्या मोठ्या मूर्त्या, भित्तीचित्रे, ऑडिओ टेलिफिल्म व उर्वरीत जागेत शॉपिंग सेंटर उभारावे.
शहराच्या चारही बाजुला शासकीय जागा असून येथे ६५ एकर प्रमाणे वारकर्यांना सुविधा द्याव्यात.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची ९० एकर जमीन असून याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उभा करावे. मध्यप्रदेश भवन येथे तृतियपंथीयांसाठी आधार केंद्र उभारावेत. चौफाळा ते महाद्वार हा रस्ता नो व्हेइकल झोन करावा, अशा सूचना केल्या आहेत.