सोलापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो म्हणून एक जेसीबी मशीन भाड्याने देणाऱ्यासह अनेक लोकांची १ कोटी ६ लाख ९५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मयत व्यक्तीसह तीन जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. As much as one crore fraud for getting loans; Crime against three people including dead person in Solapur
याप्रकरणी रविराज सूर्यकांत कदम (वय-३८, रा. मु. पो. देगाव, ता.उ. सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मयत बजरंग उर्फ दीपक बन्सीसिंग लंगडेवाले, जितेंद्र बन्सी नाईकवाडे, सुजित नाईकवाडे (सर्व.रा. कुमठे गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास आर्थिक मंडळाचे कर्ज प्रकरण करून देतो, मी अनेक लोकांना लाखो करोडो रुपये कर्ज मिळवून दिले आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी १२ ते १५ करोड रुपये कर्ज मिळून देतो असे फिर्यादी रविराज कदम यांना बजरंग लंगडेवाले म्हणाला. त्यानंतर फिर्यादी यांनी मी विचार करून सांगतो असे म्हणून निघून गेले. एका महिन्यानंतर फिर्यादी हे बजरंग लंगडेवाले व जितेंद्र बन्सी नाईकवाडे यांना मला कर्ज पाहिजे, असे जिल्हा परिषद आवारामध्ये भेटून सांगितले.
त्यावर त्यांनी मला पंधरा कोटीचे लोन करायचे असेल तर मला ५० लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत, मी तुम्हाला महामंडळाकडून अडीच कोटीचे लोन व उर्वरित रक्कम मुंबई येथील चमडा व्यापारी इस्माईल रजाक, इमाम कुरेशी, इकबाल कुरेशी, अब्दुल मोहम्मद, बुरान कुरेशी यांचा भाचा व पुतण्या (नुर व अल्लाबक्ष) व मोईन कुरेशी यांचा असलेला अवैध काळा पैसा त्यांच्या ट्रस्टद्वारे आम्हाला उद्योग धंद्याकरिता दोन महिन्यात मिळून देतो असे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यावेळी फिर्यादीचा भाऊदेखील सोबत असल्याने त्यालादेखील रोड कंट्रक्शनच्या व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने त्याने सुद्धा दहा कोटी लोन मागितले. त्यालासुद्धा ५० लाख रुपये द्या तुम्हाला लोन मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी १९ लाख ५० हजार व त्यांचा भाव विजय सूर्यकांत कदम यांनी पंधरा लाख दहा हजार रुपये बजरंग लंगडेवाले व जितेंद्र नाईकवाडे यांच्या दोघांच्या हातात दिले. त्यानंतर फिर्यादी व फिर्यादी यांच्या भावाकडून रक्कम व कागदपत्रे घेऊन तुमचे काम लवकरच होईल असे सांगून निघून गेले.
फिर्यादी यांचा मित्र गणेश होटकर याला साडेतीन कोटीची लोन मिळवून देतो असे सांगून ३ लाख ५० हजार रुपये घेऊन फिर्यादी व फिर्यादीचा भाव विजय व मित्र गणेश यांना लोन न देता त्यांची फसवणूक केली आहे. फिर्यादीस तुम्ही आमच्याविरुद्ध कोठेही तक्रार केल्यास तुमच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे पोलीस स्टेशनला तक्रार देतो अशी धमकी जितेंद्र नाईकवाडे व सुजित नाईकवाडे यांनी दिली.
फिर्यादीप्रमाणेच आणखीन इतर लोकांकडून देखील रक्कम घेऊन एकूण १ कोटी ६ लाख ९५ हजार रुपये इतकी रक्कम वरील संशयित आरोपींनी स्वीकारून त्यांची देखील फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोसई मंद्रुपकर हे करीत आहेत.
□ ‘फोन पे’वर पाठवले तीन हजार
जितेंद्र नाईकवाडे यांचे नातेवाईक सिद्धार्थ शंभूदेव बागले यांच्या फोन पेवर तीन हजार रुपये पाठवा. तुमचे लोनचे किरकोळ काम राहिले आहे. असे सांगून फोन पे वर १ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी यांनी पैसे पाठवून दिले. लोनचे काम न करता पुन्हा पैशाची मागणी करत फसवणूक केली.
□ मयत करत होते कन्ट्रक्शनचे काम
मयत बजरंग उर्फ दीपक बन्सीसिंग लंगडेवाले सन २०१६ पासून कन्स्ट्रक्शनचे काम करत होते. त्यांची फिर्यादी यांच्याशी चांगली ओळख होती. तसेच जितेंद्र बन्सी नाईकवाडे हे बॉन्ड रायटरचे काम करतात व ते देखील स्वतःला वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास आर्थिक मंडळाचे काम करतो अशी ओळख सांगून, व्यवसायासाठी करोडो रुपये कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केली.
□ एका आरोपीचे कोरोनात निधन
या प्रकरणातील ज्यांनी फिर्यादी आणि मुख्य आरोपी यांची ओळख करून दिली ते संशयित आरोपी बजरंग लंगडेवाले यांचे २०२० मध्ये कोरोनाच्या आजारांनी निधन झाले. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. या व्यवहारात लंगडेवाले यांची पत्नी यांना हा व्यवहार माहीत होता. त्यामुळे फिर्यादीने याबाबत विचारणा केली असता आरोपी नाईकवाडे यांनी मी स्वतः तुमचे लोनचे काम करून देतो, असे आश्वासन दिले होते.
□ ॲट्रॉसिटीची धमकी
तुम्ही आमच्या विरोधात कुठे तक्रार केली तर मी तुमच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे पोलीस स्टेशनला तक्रार देतो, अशी धमकी आरोपींनी फिर्यादीस दिली होती.