सोलापूर | दीपक शेळके : सोलापुरातील आ. विजय देशमुख (मालक) आणि धर्मराज काडादी या दोन घराण्यांमधील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. देशमुख यांना मैदानात येण्याचे आव्हान देवून काडादींनी चक्क देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटले. Dharmaraj Kadadi ‘Dharma’ and owner Vijaykumar Deshmukh ‘Karma’ in crisis, all voters will decide Politics Solapur
धर्मराज काडादी यांनी ‘तुम्ही आगामी निवडणुकीत तिकीट मिळवून दाखवा’ असे उघड आव्हान देत राजकीय आखाड्यात म्हणजेच शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात उतरण्याची जणू आगाहीच काडादींनी दिल्याने सोलापूरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राजकारणात प्रवेश केल्यास कारखान्याच्या आणि समाजाच्या संस्थांमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालकांच्या विरोधात थेट निवडणुकीच्या आखड्यात उतरायचे की, सर्व पक्षांसोबत जिव्हाळ्याचे संबंध ठेवून आपली सामाजिक वाटचाल कायम ठेवत मालकांच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवायची अशा ‘धर्म’ संकटामध्ये काडादी तर काडादींना आव्हाने दिल्याने देशमुख हे ‘कर्म’ संकटात सापडल्याची चर्चा आहे.
शहरातील राजकीय पंडितांचे लक्ष सध्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर केंद्रीत झाले आहे. साऱ्यांच्या नजरा काडादी आणि देशमुख परिवाराभोवती फिरत आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा तसा पाहायला गेला तर बहुभाषिक मतदारसंघ. लिंगायत समाजाचे प्राबल्य असले तरी पद्मशाली, मराठा, मुस्लिम धनगर, दलित समाजाची मते आतापर्यंत निर्णायक ठरली आहेत. हा सर्व समाज भाजपाच्या म्हणजे मालकांच्या मागे गेली वीस वर्षे ठामपणे उभे राहिला आहे.
या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता उभारला तरी तो विजयी पताका फडकवणारच, असे बोलले जाते. अडीच लाखांच्या आसपास मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघातून देशमुख यांनी सलग चार टर्म भाजपचा झेंडा रोवला आहे. २००९ मध्ये देशमुख, कोठे. सपाटे यांच्या तिरंगी लढत नंतर सक्षम विरोधक नसल्यामुळे विजय मालकांसमोर कोणाचा निभाव लागला नाही. २००४ मध्ये विश्वनाथ चाकोते. तर २०१४ मध्ये गादेकर, चाकोते तर २०१९ मध्ये सपाटे, गावडे, चंदनशिवे, व्यास, यांचा पराभव करत विक्रमी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन मालक विजयी झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रत्येक निवडणुकीत लिंगायत समाज आणि भाजपातील मालकांचा विरोधी गट सक्रिय होतो. मतदारसंघातील मालकशाहीच्या विरोधात उठाव केला जातो. उमेदवार बदलण्याची मागणी केली जाते मात्र आतापर्यंत मालकांना पर्याय मिळाला नाही. त्यामुळे भाजपातील बंड पेल्यातील वादळ ठरले आहे.
मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. ज्यांनी बाजार समिती असो, साखर कारखाना असो. अथवा विधानसभेची निवडणूक असो. अशा प्रत्येकी वेळी मालकांना साथ केल्याचा दावा केलेल्या काडादी यांनीच मालकांना आव्हान दिले आहे. त्याशिवाय सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, शेतकरी, समाज बांधव यांचा मोठा पाठिंबा काडादींना मिळत असल्याचे चित्र आहे.
मात्र, राजकीय पटलावर पडद्याआड राहून भूमिका वठवलेले काडादी हे खरोखरच राजकीय आखाड्यात उतरणार का ? जाहीर केलेल्या आपल्या राजकीय भूमिकेवर ठाम राहाणार का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
समाजाच्या संस्थांना मालकांनी जाणून बुजून त्रास दिला. त्यामुळे आपण आता समाजाच्या संस्था वाचवण्यासाठी आणि विजयमालकांना राजकीय क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी जी काही राजकीय पावले उचलावी लागतील ते आपण उचलणार, असे काडादी हे पत्रकार परिषदेत म्हणाले.
मात्र निवडणुकीच्या वेळी काय परिस्थिती असेल त्यावर आपला निर्णय राहील, या त्यांच्या विधानाने मोठा संभ्रम देखील निर्माण केला आहे. त्यामुळे राजकारणात मालकांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास ज्या संस्था वाचवण्यासाठी दंड थोपटले त्या संस्थांचा त्रास काढणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे मालकांच्या विरोधात थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचे की, सर्व पक्षांसोबत जिव्हाळ्याचे संबंध ठेवून आपले सामाजिक वाटचाल कायम ठेवत ‘विजय मालकांच्या विरोधकांना रसद पुरवायची असा प्रश्न काडादी यांच्यासमोर आहे. त्याची कारणे देखील तशीच आहेत. मालकांनी जर काडादींच्या संस्थांना विरोध केला असेल तर तेही या कर्म संकटात असतील. पण तमाम मतदारच त्याचा फैसला करतील.
□ धर्मराज काडदी यांच्या जमेच्या बाजू
» सुवर्ण देवस्थानच्या माध्यमातून लिंगायत समाजामध्ये वजन
» कारखान्याच्या माध्यमातून हजारो तरूणांच्या हाताला काम
» शिक्षण संस्थाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण रोजगार उपलब्ध
» कारखान्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा
□ आ. विजयकुमार मालकांच्या जमेच्या बाजू
• पालिकेत सत्ता आणण्याची धमक
• शहर उत्तर मतदार संघात जास्त नगरसेवक निवडून आणण्याची ताकत
• सर्व राजकीय पक्षातील स्थानिक नेते मंडळींचा असलेले घरोबा
• लिंगायत समाजासह वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळीचा पाठिंबा
• नगरसेवकांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी देऊन प्रभागाचा विकास