हर्षल बागल : इंदापूरला चाललेल्या उजनीच्या पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी सर्व पक्ष मैदानात उतरले होते. आता शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये इंदापूरला पाणी जात असताना सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गट आणि भाजप गटाच्या नेत्यांच्या गोठ्यात एवढा सन्नाटा क्यु है भाई? अशी विचारायची वेळ आली आहे. From the water of Ujni running to Indapur, itna sannata kyu hai bhai? Wooden Nimbodi Solapur
करमाळा तालुक्यातील चिकलठाण, वांगी १-२- ३-४, कोंढार चिंचोली, कात्रज, टाकळी, खादगाव ओमलवाडी, केतुर एक व दोन कुगांव दहिगांव, विवरवाडी, बिटरगाव, सांगवी एक आणि दोन, केडगाव, वाशिंबे, सोगाव पूर्व पश्चिम पोपळज , उमरड, रितेवाडी अशा ३९ गावांना लाकडी निंबोळी योजनेला देत असलेल्या एक टीमएसी पाण्याचा फटका बसणार आहे. कारण ही सर्व गावे उजनी बॅक वॉटरच्या पट्ट्यात येतात. लाकडी निंबोळी योजनेला लवादाच्या पाणी वाटपात फेरबदल करून भीमा नदीवर एक टीएमसी पाणी अतिरिक्त दाखवून तेच पाणी उचलले जात आहे. भविष्यात एक टीएमसी म्हणत म्हणत पाच टीएमसी पाणी जाऊ शकते. त्यावेळी मात्र ही ३९ गावे स्मशानात बदललेली असतील.
जिल्ह्याच्या विकासाला व कृषी क्षेत्राला अधिक गतिमान बनवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी उदात्त हेतूने उजनी धरणाची निर्मिती केली. ज्वारीचे कोठार असलेला सोलापूर जिल्हा हा उजनीमुळे ऊस पट्ट्याचा जिल्हा म्हणून ओळखला जावू लागला. २०१९ साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला आणि भरणे यांची पालकमंत्रीपदाची अडीच वर्षाची कारकीर्द ही उजनीचे पाणी पळवण्यासाठीच गाजली. भरणे यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा एक दिलाने रस्त्यावर उतरला. अगदी त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रस्त्यावर होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या. पवार प्रेमी असलेल्या माढ्याच्या आमदार बबनदादा शिंदे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. तर करमाळ्याच्या आमदार संजयमामा शिंदे यांनी मंत्रालयात तत्कालीन जलसंधारण व जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा पिच्छाच सोडला नाही. आ. शिंदे हे स्थगितीचे पत्र घेऊनच जिल्ह्यात आले.
अकलूजच्या मोहिते पाटलांचा आणि जेऊरच्या नारायण पाटलांचा आवाज त्या वेळेला भरणे व बारामतीकरांवर चांगलाच गर्जत होता. बारामतीला टारगेट करणे याचा हेतू मोहिते पाटलांचा, नारायण पाटलांचा वेगळा असू शकतो. पण आज पुन्हा कागदांवर उजनीचे तीन टीएमसी पाणी जास्त दाखवत तो पळवण्याचा घाट रचला गेला. त्यातील दोन टीएमसी पाणी मंगळवेढ्याच्या उपसा सिंचन योजनेला म्हणून जाहीर झाले आणि एक टीएमसी हे इंदापूरच्या लाकडी निंबोळी योजनेला. पण याच्यात करमाळ्याच्या बॅक वॉटरच्या गावांचा घोट घेण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी सर्व पक्ष मैदानात उतरले होते. आता शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये इंदापूरला पाणी जात असताना सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गट आणि भाजप गटाच्या नेत्यांच्या गोठ्यात एवढा सन्नाटा क्यु है भाई? अशी विचारायची वेळ आली आहे. अकलूजचा मोहिते पाटलांनी आणि जेऊरच्या नारायण पाटलांनी ठाकरे आणि पवारांना त्या काळात टार्गेट केले होते. आता नारायण पाटलांचे नेते असलेले एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. तर भाजपच्या विधान परिषदेवर आमदार असलेले मोहिते पाटील हे राज्यात आणि केंद्रात देखील सत्तेत आहेत.
चाललेले पाणी थांबवून शिंदे- फडणीस सरकारमध्ये आमचं बी चालतंय हे दाखवण्याची चालून आलेली संधी आहे. आता सोलापूर जिल्ह्याचे एक टीएमसी पाणी कागदावर दाखवून ते लाकडी निंबोळी योजनेला चाललंय तरीही त्यांची चिडीचूप कशासाठी? की इंदापूरच्या पाण्याला यांची मूकसंमती आहे का असाही सूर राजकीय वर्तुळात दिसतोय.