● ईडी अधिकाऱ्यांनी विविध कागदपत्रे केली जप्त
कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाहूपुरीमधील मुख्यालयासह सेनापती कापशी येथील जिल्हा बँक शाखा तसेच हरळी येथील कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेवर ईडीने छापेमारी केली. Kolhapur – 5 bank employees in custody of ED, employees stop work protest Hasan Mushrif तसेच ईडीच्या पथकाने बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले. आज सकाळी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत ईडीच्या कारवाईचा निषेध केला.
कोल्हापूर जिल्हा बँकेची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे या बँकेचे अध्यक्षपद आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन 30 तासांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून ईडी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे. कालपासून ईडीची कारवाई सुरु आहे.
माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सकाळपासूनच आणि कागदपत्र तपासणीला सुरुवात केली होती.. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापसी येथील साखर कारखाना आणि मुलीच्या घरी ११ जानेवारीला ‘ईडी’ने छापे टाकले होते. आणि अवघ्या वीस ते एकवीस दिवसांत ईडीने पुन्हा जिल्हा बँकेत छापा मारला.
ईडीने कागदपत्रांसह आणि बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेत कागदपत्रांची झाडाझडती घेतली. या कारवाई नंतर बँकेतील एका विभागात कागदपत्रे विखुरलेल्या अवस्थेत दिसून आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ‘सूडातून कारवाई’
सूडबुद्धीने हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. मागच्या वेळीच्या चौकशीमध्ये त्यांच्या घरी काय कागदपत्र सापडले, तर संजय गांधी निराधार योजनेचे डॉक्युमेंट सापडले. ह्या दुसऱ्या चौकशीतही काहीही सापडणार नाही. मात्र, चांगले काम करणाऱ्यांना जाणून बुजून अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यांच्यामागे ईडीची पीडा लागल्याने ते या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
□ बँकेच्या अधिकाऱ्यांना घेतले ताब्यात
ईडीच्या दहा ते पंधरा अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सकाळी आठ वाजल्यापासून तपासणी सुरू केली होती. संपूर्ण तपासणी आणि चौकशीनंतर ईडीने बँकेतील ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये डॉ. अशोक माने ( मुख्य कार्यकारी अधिकारी), आर. जे. पाटील (व्यवस्थापक साखर कारखाना विभाग), अल्ताफ मुजावर (उप व्यवस्थापक साखर कारखाना विभाग), सचिन डोनकर (निरीक्षक साखर कारखाना कर्ज वाटप विभाग) आणि राजू खाडे (निरीक्षक) यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे बँकेच्या कर्मचारी युनियनने ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. ईडीच्या कारवाईविरोधात उद्या एक तास जिल्हा बँकेच्या बाहेर काम बंद ठेवून युनियनकडून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.