सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या एका युवा डॉक्टरने आपल्या राहणाऱ्या क्वार्टर्समध्ये आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी (ता. 14) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात बोलले जात आहे. Suicide of a young doctor in Solapur Civil Hospital with bead injection
डॉ गौरव राजू वाखरे असे त्या डॉक्टराचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई इथले रहिवासी आहेत. 5 नोव्हेंबर 2022 रोजी डॉक्टर वाखरे यांनी डॉक्टर वैशंपायन शासकीय मेडिकल कॉलेज याठिकाणी ‘आनेस्थेशिया’ या डिग्री साठी ऍडमिशन घेतले होते. सिव्हिल हॉस्पिटल मधून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळच्या सुमारास डॉक्टर वाखरे हे आपल्या ड्युटीवर आले नाहीत तेव्हा याबाबत विचारणा झाली असता ते राहत असलेल्या क्वार्टर्सकडे काही जणांना पाठवण्यात आले. दरवाजा आतून बंद होता खिडकीतून पाहिले असता ते झोपले होते.
आरडाओरडा करूनही ते उठत नसल्याने शेवटी दरवाजा तोडण्यात आला आत पाहिले तर ते आपल्या बेडवर आत्महत्या केलेल्या अवस्थेत मिळून आले, अशी माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नाही याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
● चार्जिंगला लावलेला मोबाईल लंपास
सोलापूर : काळजापूर मारूती मंदिरात प्रदक्षणा मारण्यापूर्वी अविनाश हरिभाऊ कामत (रा. वसंत विहार, राधा-कृष्ण कॉलनी) तेथे चार्जिंगला लावलेला दहा हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला आहे. काल सोमवारी (ता. 13) सकाळी अकरा ते सव्वाअकरा या अवघ्या १५ मिनिटात चोरट्याने ही संधी साधली. मोबाईल चोरीला गेल्यानंतर कामत यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिस हवालदार आटुळे तपास करीत आहेत.
● रिक्षाची दुचाकीला धडक
सोलापूर : पत्नीला घेऊन दुचाकीवरून (एमएच ४५, पी ६५९९) घराकडे जात असताना गिरीश बसवंत बगले (रा. डीसीसी बॅंक कॉलनी) याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रिक्षा चालवून दुचाकीला (एमएच १३, सीटी ३८१०) धडक दिली. त्यात विजय अण्णासो चौगुले (रा. आदित्य नगर, नवीन आरटीओजवळ) व त्यांची पत्नी जखमी झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर गंभीर दुखापत होऊनही उपचारासाठी न्यायला न थांबता तो रिक्षाचालक तेथून पळून गेला, अशी फिर्याद विजय चौगुले यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस हवालदार जाधव तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पोलिसांची हातगाड्यांवर कारवाई
सोलापूर : सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना अडथळा होऊन इजा होईल, असे कृत्य केल्याबद्दल सदर बझार पोलिसांनी सात रस्ता व त्याच परिसरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील हातगाड्यांवर कारवाई केली. हातगाडी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शहरात रस्ते अपघात वाढले असून अरुंद रस्त्यांमुळे जड वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यातून काहींचा जीव गेला असून पोलिसांनी रस्त्याला अडथळा करणाऱ्यांविरुद्ध आता कारवाईचा बडगा उचलला आहे. काल सोमवारी सदर बझार पोलिसांनी फळ व ज्यूस विकणाऱ्या हातगाडी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
त्यानुसार इम्तियाज लालसाब सय्यद, इम्तियाज इक्बाल शेख, शब्बीर अब्दुल मा. शेख, शाहरुख शौकतअली सय्यद, फैसल फायाज शेख व समीर रफिक सय्यद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता पोलिसांनी रस्त्यालगत वाहने किंवा हातगाडी उभी करून अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करायला सुरवात केली आहे. रस्त्याला अडथळा होऊन तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांना इजा होणार नाही, असे कृत्य न करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
● माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा छळ
सोलापूर : कोरोनाच्या काळात घाईगडबडीत अनेकांनी मुलींचे विवाह उरकले. पण, आता विवाहात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, व्यवसाय टाकायचा आहे, कर्ज फेडायचे आहे, नवीन गाडी घ्यायची असल्याचे सांगून विवाहितांचा छळ केला जात आहे. अशाच दोन विवाहितांनी पतीसह सासरच्यांविरूद्ध पोलिसांत धाव घेतली आहे.
घोंगडे वस्तीतील अश्विनी विरेश बोतल यांचा २१ जून २०१८ रोजी एनजी मिल चाळीतील विरेश बोतल याच्याशी विवाह झाला होता. दोन महिन्यांतच सासरच्यांनी काही ना काही कारण सांगून छळ सुरु केला. शिवीगाळ करीत जाचहाट केला. अपमानास्पद वागणूक देऊन उपाशीपोटी ठेवले. कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आण म्हणून शिवीगाळ व मारहाण केली, अशी फिर्याद अश्विनी बोतल यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यावरून पती विरेश, सासरा सिद्राम बोतल, सासू कमलाक्षी बोतल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक ढोबळे तपास करीत आहेत.
दुसरीकडे होटगी रोडवरील सहारा नगरातील यास्मीन दबीरअली शेख यांनी पतीसह सासरच्यांविरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. १३ जून २०२१ रोजी यास्मीन यांचा दबीरअली याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर तीन-चार महिन्यांतच सासरच्यांनी यास्मीनचा छळ सुरू केला. कर्ज फेडण्यासाठी माहेरहून लाख रुपये आण, नाहीतर सोडचिठ्ठी दे, अशी धमकी पतीने यास्मीनला दिली. तु आमच्या घरात येवू नकोस म्हणून हाकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार मणुरे तपास करीत आहेत.