गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण; राजन पाटलांकडून ना होकार ना नकार
● राष्ट्रवादीच्या मालकांना राष्ट्रवादासाठी भाजपची ऑफर
विशेष प्रतिनिधी : माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक. Invitation from Chief Minister of Goa; Neither yes nor no from Rajan Patal Mohol Pramod Sawant पक्षनिष्ठेचे दुसरे नाव म्हणजे राजन पाटील असे समीकरण मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे. अशा निष्ठावंताच्या घरी जाऊन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादाच्या नवनिर्माणाचा विचार वाढवण्यासाठी राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे, अशी ऑफर दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील भाजपमध्ये जाणार; अशा सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मात्र माझा निर्णय माझ्या मतदारसंघातील माझे मतदार घेतील, असे सांगून राजन पाटील यांनी या चर्चेत आणखीनच हवा भरली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनगर, माढा, पंढरपूर, सोलापूर अशा विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. याच दरम्यान राजन पाटील यांच्या अनगर येथील वाड्यावर डॉ. सावंतांनी भेट दिली. राजनमालक आणि सावंत यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. याच मैत्रीतून त्यांनी मालकांच्या वाड्यावर पाहुणचार घेतला. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी डॉ. सावंतांनी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरी वाट वाकडी केल्याबद्दल विचारले. तेव्हा सावंत यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले.
● सावंतांचे आमंत्रण आणि बाळराजेंचे सूचक हास्य
‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे; हे विशेष आमंत्रण घेऊन मी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलो आहे’ असे उत्तर डॉ. सावंत यांनी दिले. त्यावेळी त्यांच्याच बाजूला बसलेले बाळराजे पाटील यांनी अत्यंत सकारात्मक आणि सूचक असे स्मितहास्य केले. ते पाहून पत्रकारांनी आणि उपस्थितांनी जे ओळखायचे ते ओळखले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● आत एक तास चर्चा, बाहेर दिवसभर चर्चा
गोव्याचे मुख्यमंत्री सावंत हे सकाळी सोलापुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट अनगरमधील राजन पाटील यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान गाठले. स्वागताला पाटील पिता-पुत्र तयारच होते. औपचारिकता संपल्यानंतर पाटील पिता-पुत्र आणि सावंत यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. सावंत आले आणि गेलेसुध्दा. तरीही बाहेर मात्र दिवसभर याच भेटीची चर्चा ऐकायला मिळाली.
माझा निर्णय माझे मतदार घेतील मोहोळ मतदारसंघातील मतदारांनी पन्नास वर्षापासून आमचे नेतृत्व मान्य केले. मतदारसंघातील नागरिकांचा जो निर्णय असेल, तो माझा निर्णय असणार आहे. नागरिक जो निर्णय देतील, तो मला शिरसावंद्य असेल. सत्तेसाठी किंवा इतर कशासाठी दुसरीकडे जाणारा मी माणूस नाही.. मतदारांना सोडून मी जाऊन काय उपयोग होईल? मतदारसंघाचा निर्णय व्हायला वेळ लागू शकतो. योग्य वेळ आली की निर्णय घेतला जाईल, असे राजन पाटील (राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार ) म्हणाले.
● मालकांनी वाढवला सस्पेन्स
गोव्याचे मुख्यमंत्री गेल्यानंतर ‘माझा निर्णय माझे मतदार घेतील’ असे सांगून राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय मतदारांवर ढकलला. त्यांनी भाजप प्रवेशासंदर्भात थेट होकार दिला नाही. मात्र डॉ. सावंतांची ऑफर नाकारलीसुध्दा नाही. योग्य वेळी मतदार योग्य कौल देतील आणि योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगून राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेतील सस्पेन्स वाढवला आहे. यावरूनही विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.