सोलापूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या सोलापूर महापालिकेचा कारभार महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 10 प्रमुख महिला अधिकारी मिळून यशस्वीपणे चालवत असल्याचे प्रेरणादायी चित्र दिसून येत आहे. “मिळून साऱ्याजणी” जणू महापालिकेचा प्रशासकीय गाडा चालविला जात आहे, हे विशेष ! महिला दिनाच्या निमित्ताने “हम भी कुछ कम नही” हा संदेश यातून दिला जात आहे. Women’s Day Special: Women’s Raj in Municipal Corporation: Ten prominent women officers look after the affairs of Solapur cycle distribution
सोलापूर महापालिका स्थापनेपासून शितल तेली उगले या पहिल्या महिला आयुक्त म्हणून लाभल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेत जणू प्रशासकीय “महिलाराज” दिसून येते. सोलापूर महापालिकेत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांचा कारभार एक नाही, दोन नाही तर तब्बल दहा महिला अधिकारी सांभाळत आहेत.
यामध्ये विविध विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या उपायुक्त विद्या पोळ, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, मुख्य लेखा परीक्षक रूपाली कोळी, बांधकाम परवाना विभाग उपअभियंता सारिका अकुलवार, संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, जन्म मृत्यू नोंदणी विभाग प्रमुख डॉ.अरुंधती हराळकर, लसीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. मंजिरी कुलकर्णी, एक हजाराहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणाऱ्या नेत्ररोग विभाग प्रमुख तनवंगी जोग, डॉ. मीनल चिडगुपकर, पीएम स्वनिधी योजनेत महापालिकेला अव्वलस्थानी घेऊन जाणाऱ्या युसीडी विभागांतर्गत राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाच्या तांत्रिक तज्ञ उज्वला गणेश आदी महिला अधिकारी आपले कर्तव्य सक्षमपणे बजावत आहेत.
महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक इतकेच नव्हे तर स्मार्ट सिटीचे सीईओ अशी तीन महत्वाची पदे भूषवण्याची संधी मिळालेल्या आणि ही पदे शितल तेली – उगले यांनी भूषवत आहेत. त्यांच्या 107 दिवसाच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात सोलापूर शहर विकासासंदर्भातील विविध विकास कामे आणि अनेक विषय मार्गी लागले आहेत.
महापालिकेत आकृतीबंधानुसार मंजूर असलेले अतिरिक्त आयुक्त पद भरण्यात आले. अनेक वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित असलेली भरती नियमावली (आर आर) शासनाकडून मंजूर झाली. यामुळे पदोन्नती व नव्या भरतीचा मार्ग सुकर झाला. अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिसंख्य पदावर वर्ग कर्मचारी व अधिकाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्याचा निर्णयही शासन स्तरावरून पालिकेला प्राप्त झाला. हद्दवाढ भागाकडील 300 कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभ देण्याचाही प्रलंबित असलेले मार्गदर्शन शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाल्याने या कर्मचारी वर्गांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिका परिवहन विभागास प्राप्त झालेल्या पोलीस अनुदानापोटीच्या 3.54 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या देय रकमा वितरणाचा तत्काळ निर्णय घेऊन त्या रकमा अदा केल्या. यामुळे सुमारे वीस वर्षापासून प्रलंबित असलेले हे अनुदान अखेर महापालिकेला प्राप्त झाले. राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमांतर्गत महापालिकेला 22 कोटीचा निधी प्राप्त झाला. या अंतर्गत आता शहरातील अनेक रस्ते धुळमुक्त आणि सुशोभित दिसणार आहेत. शहरात नव्या 17 रस्त्याची बहुतांश कामे पूर्ण झाली. सोलापूर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत असलेल्या कामांना भेट देऊन त्या कामांना गती दिली.
सोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम केल्यानंतरच विकास कामांना गती मिळू शकते, या दृष्टिकोनातून मिळकत कर वसुलीला प्राधान्य दिले. खाजगी शिक्षण संस्था व व्यावसायिक आस्थापनांना रडारवर घेत मोठ्या थकबाकीच्या वसुलीकडे लक्ष दिले. हद्दवाढ भागासह काही ठिकाणी शहरात घंटागाड्या पोहोचत नसल्याच्या तक्रारीचा विचार करून दोन शिफ्ट मध्ये घंटागडीचे नियोजन करण्याच्या सूचनाही तत्काळ त्यांनी दिल्या.
शहरातील मूलभूत सोयी सुविधांसाठी शासनाकडून 10 कोटीचा निधीही यादरम्यान मंजूर झाल्याचे आदेश निघाले. अखेर पूर्णवेळ प्रशासन अधिकारी लाभला. नव्या आयुक्तांच्या कार्यतत्पर पद्धतीमुळे महापालिकेतील जनता दरबारातील तक्रारीही सोडविल्या जातील या अपेक्षा अनेकांच्या वाढल्या आहेत. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह विना विलंब सुरू केले. यामुळे येथे महिलांची मोठी सोय झाली. याचे उद्घाटनही पाच गर्भवती महिलांच्या हस्तेच केले. इतकेच नव्हे तर खण नारळाने ओटी भरून त्यांचा सन्मानही केला. इतकेच नव्हे तर येथील सफाई महिला कामगारांचाही यावेळी सत्कार करण्यास त्या विसरल्या नाहीत.
अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठका घेऊन अडचणी जाणून घेतल्या. मार्गदर्शन करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मुदतीत काम न करणाऱ्या मक्तेदारांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. विशेष म्हणजे सोलापूर महापालिकेचे प्रशासकीय राजवटीतील पहिलेच अंदाजपत्रक मांडले. यामध्ये महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळासाठी भरीव तरतूद केली. त्याचबरोबर महिला दिनाच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रथमच महापालिकेच्या वतीने महापालिका शाळेतील सुमारे 230 विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप हे करण्यात येत आहे. सोलापूर शहराबरोबरच महापालिका शाळांचाही चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त शितल तेली – उगले या करीत आहेत.
एकूणच सोलापूर महापालिकेचा कारभार महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी समर्थ आणि सक्षमपणे पहात असल्याचे चित्र दिसून येते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● जागतिक महिला दिन : महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप
सोलापूर : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व प्राथमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सायकल वाटप करण्यात आले.
महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या संकल्पनेतून यंदा हा नवीन उपक्रम हाती घेण्यात आला असून यासाठी कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक यांच्या सीएसआर फंडातून आणि सरकारचे प्रशासकीय सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या कन्येसह आदींचे सहकार्याने आज महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीतील शिकणाऱ्या 230 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केले. आज कॅम्प शाळा येथे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते तर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ,उपायुक्त मच्छिंद्र घोलप,सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, प्रशासन अधिकारी जाधवर, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे तसेच पंजाब नॅशनल बँकेचे देवेंद्र सिंह, मंजुनाथ कुलकर,ईशावली पिंजारी, नितीन शिंदे,अभिजीत इलग तसेच कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापक विशाल सूर्यगंध,संजय भुके, पवन भुसपुटे, मल्लेश नाराल आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या कॅम्प शाळेत आज सकाळी आठ वाजता जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेकडील प्राथमिक शिक्षण विभाग तसेच माध्यमिक विभाग, आरोग्य विभाग, मालमत्ता कर आदी विभागात काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या सर्व शाळेतील आठवी आणि नववीच्या 230 मुलींना सायकल देण्यात आले. आठवी व नववी शिकणाऱ्या मुलींना प्रोत्साहन म्हणून हे उपक्रम घेण्यात देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कस्तुरे तर सूत्रसंचालन श्रीमती गंगा शिंदे व स्नेहा पुजारी यांनी केले आभार प्रदर्शन रजनी राऊळ यांनी केली.