● चार दिवसांची पोलीस कोठडी
सोलापूर : फसवणूक करण्याच्या उद्देशाने नाशिक मधील सोनाऱ्याशी कौटुंबिक संबंध निर्माण करत त्यांची १९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी अमोल सुरेश यादव (रा.युनिटी आयकॉन अपार्टमेंट, जुळे सोलापूर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. A man was arrested in Solapur for cheating a goldsmith of Nashik to the tune of 19 crores
नाशिक मधील सोनार प्रशांत गुरव यांच्याशी आरोपी यादव याने घराेब्याचे संबंध निर्माण केले.त्यानंतर मजरेवाडी येथील हरिओम नगर येथील जमीन डेव्हलप करण्यासाठी घेतली असे सांगून फिर्यादी गुरव यांना जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून १९ कोटी ७ लाख ८० हजार रुपये घेतले.हे पैसे परत न दिल्याप्रकरणी आरोपीवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलाबा परिसरातून अटक केली आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, राजेश पुणेवाले, अजय गुंड, गुंड यांनी केली.
》 अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
सोलापूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दीड वर्षांपासून अत्याचार करत तिला गर्भवती केल्याप्रकरणी नईम शेख (रा.सोलापूर) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे. आरोपी नईम याने पीडितेशी जवळीकता साधत तिची ओळख वाढवली. त्यानंतर तिला घरात कोणी नसताना घरी बोलावून मागील दीड वर्षांपासून अनेक वेळा अत्याचार केला. काही दिवसानंतर पीडिता ही गर्भवती राहिली. ही बाब पीडितेने आपल्या आई वडिलांना सांगितली नाही. एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखू लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता नुकतेच पीडितेने मुलीला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● बेकायदेशीर हातभट्टी दारूची विक्री ; एकावर गुन्हा
सोलापूर : बेकायदेशीर रित्या हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने १४ लिटर हातभट्टी दारू जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याप्रकरणी इरण्णा लक्ष्मण केंचगुंडी (वय-५९,रा.न्यू पाच्छा पेठ,महालक्ष्मी नगर, सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दि.२७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अशोक चौकातील ७० फूट रस्त्यावरील एका गोळात घडली.अशा आशयाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रमेश अरुण सिनारे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
● पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज वर्षभर जतन करण्याच्या सूचना
सोलापूर : पोलीस आयुक्तालयातील बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा जतन कालावधी हा ९- १० दिवसांचा होता,तो यापुढील कालावधीत एक वर्षांसाठी करण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी बिनतारी संदेश विभागाच्या पोलीस निरीक्षकांना दिल्या आहेत.
जनमाहिती अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त विभाग- २ तथा दंडाधिकारी कार्यालय,अजिंक्यतारा बंगला सदर बझार पोलीस स्टेशनशेजारी कार्यालयाचा परिसर व कार्यालयात अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सिस्टीमच अस्तित्वात नाही ही बाव दिनेशसिंग शीतल यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता उघड झाली आहे.
पोलिस आयुक्त, मानवी हक्क आयोग व माहिती आयुक्त यांना पुरावे देण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. दररोजचे फुटेज जतन करुन ठेवण्याची क्षमता किंवा तसा शीतल यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने व पोलीस उपायुक्त बोऱ्हाडे यांना निवेदन देऊन पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्या ठिकाणी तत्काळ लावण्याचे आदेश देणे तसेच फुटेज जतन करण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन यापुढे एक वर्ष सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवण्याचे आदेश जारी झाले आहेत.
》 तब्बल २१ घरफोड्या करून फरार असलेल्या आरोपीला अटक
सोलापूर : तब्बल २१ घरफोड्या करुन फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बबन अंकुश पवार (वय-४०,रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. माळशिरस तालुक्यातील बायपास रोड चौक, पिलीव येथील तक्रारदारांचे बंद घराच्या खिडकीचे ग्रिल कापुन घरात प्रवेश करून सुमारे साडेचार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याने माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्याकडे दिला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचा फरार साथीदाराचा वाखरी (ता. पंढरपूर) येथे शोध घण्यात येत होता. हा आरोपी हॉटेल गावरान तडका वाखरी येथे येणार असल्याचे माहिती मिळाल्याने या पथकाने त्यास सापळा रचून पकडले आहे.
हा आरोपी सांगोला पोलीस ठाण्याच्या 10 गुन्ह्यात, मोहोळ 4, वेळापूर 2, माळशिरास, नातेपुते, माढा, पंढरपूर प्रत्येकी एका अशा 20 गुन्ह्यात फरार होता.
ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षकपोरे, श्रेणी फौजदार राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, विजयकुमार भरले, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे आदींनी केली.