● दिल्ली दरबारी थोरात यांची ‘लोकप्रिय नेता’ म्हणून नोंद
सोलापूर/पंढरपूर : माजी खासदार संदीपान थोरात (वय-90) यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग 7 वेळा जिंकले. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मूळचे माढ्याचे असलेल्या थोरात यांनी सर्वात आधी 1977 मध्ये पंढरपूरमधून विजय मिळवला. त्यानंतर 1999 पर्यंत ते या मतदारसंघाचे खासदार होते. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख होती. Former MP Sandipan Thorat passes away, seven-time MP from Pandharpur Solapur Congress leader popular
अलिकडे राजकारणापासून अलिप्त राहिलेले संदीपान थोरात हे गेल्या अनेक दिवसांपासून हृदयविकारासह पोटाचे विकार आणि श्वसनविकाराने ग्रासले होते. प्रकृती खूपच बिघडल्यामुळे त्यांच्यावर गेल्या ११ मार्चपासून सोलापुरात खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम जीव संरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रूग्णालयात धाव घेऊन थोरात यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. परंतु अखेर आज शुक्रवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.
पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून गेलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान भगवान थोरात यांचे शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसापूर्वीच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रुग्णालयात जावून पाहणी केली होती. त्यांच्या पश्चात वृध्द पत्नीसह चार विवाहित पुत्र, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे पेशाने वकील होते. ते माढा तालुक्यातील निमगाव येथील मूळ राहणारे होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. १९७७ साली काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. नंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही. पुढे १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ पर्यंत असे सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते.
● माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यामुळेच त्यांना लोकसभेत प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येत असल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या दरबारी थोरात यांची ‘लोकप्रिय नेता’ म्हणूनच नोंद होती. त्यांनी माढा येथे जगदंबा मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणीची उभारणी केली होती. परंतु ती थोड्याच काळात बंद पडली.
दरम्यान, १९९९ साली काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर त्याचवर्षी लोकसभा निवडणुका झाल्या. तेव्हा पंढरपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र ते राजकारणापासून दूर राहिले.