● वेळापूर पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन करे यांच्या कामाबद्दल कौतुक
वेळापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील महादेवाची यात्रा व कावड उत्सव असल्याने या कार्यक्रमाला भाविकांची महाराष्ट्रातून मोठी गर्दी होत असते. त्यातूनच अपघात होतात. पण सोलापुरातील एका पोलिस कर्मचा-यामुळे पन्नास भाविकांचे प्राण वाचले आहेत. Fifty devotees’ lives were saved in Shingnapur ghat by the intervention of the police in Solapur.
शनिवारी (ता १ एप्रिल) एकादशी दिवशी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर एसटी स्टँड वरून शिंगणापूर यात्रातील स्पेशल एसटी मध्ये ५० प्रवासी भरून व एसटीवर देवाची कावडी ठेवून परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर कडे निघाली. एसटी ही शिंगणापूर घाटातील शेवटच्या वळणावर आली असता, ती एसटी वळण घेत असताना तिचा एअर ब्रेक फेल झाला.
त्यामुळे एसटी रोडच्या संरक्षणासाठी असणा-या कठड्याला धडकण्याच्या स्थितीत असतानाच त्यावेळेस तेथे कर्तव्यावर हजर असणारे वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जनार्दन करे यांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी कोणताही विलंब न करता प्रसंगावधान साधत तात्काळ कठड्याजवळ असलेला मोठा दगड उचलून एसटीच्या पाठीमागील चाकाच्या पुढे लावला. त्यामुळे एसटी कठड्याला न धडकता जागेवरच थांबली. एसटी थांबल्याने अपघाताचा अनर्थ टळला. त्यामुळेच एसटीतील ५० भाविकांचे प्राण वाचले.
पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन करे यांच्या कृतीमुळे प्राण वाचल्याने एसटीतील भाविकांनी उतरून त्यांचे आभार मानले. एसटीचे एअर ब्रेक फेल झाल्याने गाडी रोडवर आडवी उभी राहिल्याने शिंगणापूर ते नातेपुते एक तास वाहतूक बंद पडली होती. नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन वळणावरील नेमणुकीस असलेले वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संदीप पाटील, पोलीस नाईक देशपांडे, पोलीस कॉन्स्टेबल माळी, पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार यांना बोलावून घेऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
○ चांगल्या कामाबद्दल करे यांचा सन्मान…
वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांना वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन करे यांच्या चांगल्या कामाची माहिती मिळताच लागलीच निलेश बागाव यांनी पोलीस कर्मचारी जनार्दन करे यांचा वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने फेटा बांधून शाल घालून श्रीफळ देऊन सन्मान केला. केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थिनींच्या नावे मुदतठेव
• मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
सोलापूर : बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून दोन गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी बँकेत मुदतठेव ठेवण्यात आली. मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबविला.
शनिवारी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात सृष्टी देवकर आणि अक्षरा कोंडापुरे या दोन विद्यार्थिनींना बँकेचे मुदतठेव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चिदानंद माळी, बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव दत्तात्रय पाटील, सहशिक्षक मल्लय्या स्वामी, मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. समीना नदाफ उपस्थित होते.
प्राचार्य चिदानंद माळी म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी गरिबांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांचा आदर्श घेऊन माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी राज्यभर शिक्षण संस्थांची उभारणी केली आहे. राजश्री शाहू महाराजांचा शिक्षणाचा वसा पुढे चालवण्यासाठी मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी सहाय्य करणे ही त्यांना वाढदिवसा निमित्त मिळालेली भेट आहे, असेही प्राचार्य माळी यावेळी म्हणाले. याप्रसंगी दत्तात्रय पाटील, मल्लया स्वामी, प्राचार्या डॉ. समीना नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. वासंती पांढरे, प्रा. तय्यब शेख, प्रा. देवकांत गुरव, प्रा. सचिन हेडे, प्रा. वर्षा माने, प्रा. रेश्मा जाधव, रेवप्पा दसाडे, विश्वस्त दीपक कसबे, ग्रंथपाल साळुंखे, लिपिक दसाडे आदी उपस्थित होते.
शुभांगी पिल्लारे यांनी प्रास्ताविक केले. अस्मिता बोराळे यांनी सूत्रसंचालन तर भाग्यश्री बेळ्ये यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीएडच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.