अक्कलकोट : दुधनी मार्केट कमिटीच्या आजवरच्या इतिहासात म्हेत्रे गटाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. शेतकऱ्यांचे हित,व्यापाऱ्यांचा विश्वास आणि पारदर्शी कारभार यामुळेच मार्केट कमिटीच्या निर्मितीपासून आजतागायत सत्ता कायम राखण्यात आम्ही यश मिळवले आहे. Dhudhani market committee election: Two business members of Mhetre group unopposed Akkalkot ही वस्तुस्थिती विरोधकांना माहीत असूनही केवळ राजकारणापोटी षडयंत्र रचत मार्केट कमिटीची निवडणूक लावण्याचा चंग त्यांनी बांधल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत, असा घणाघात माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केला.
छाननीनंतर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचे ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार सिध्देश्वर गंगोडा यांचे शेत नसल्याचे कारण देत सतीश प्रचंडे यांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुरुवारी गंगोडा यांचा अर्ज नामंजूर केला. म्हेत्रे गटातील सातलिंगप्पा परमशेट्टी आणि चंद्रकांत येगदी या दोघांच्या विरोधात एकही अर्ज न भरल्याने व्यापारी मतदार संघातून हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रथमेश म्हेत्रे यांनी माहिती दिली.
पुढे बोलताना सभापती प्रथमेश म्हेत्रे म्हणाले की, स्वर्गीय लोकनेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या आशीर्वादाने माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या सहकार्याने मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आजवर हिताचे निर्णय घेतले आहेत. याचीच पोचपावती म्हणून व्यापाऱ्यांनी दोघांना बिनविरोध केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : www.surajyadigital.com
येत्या शनिवारी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा वाढदिवस असुन मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्यांनी दोघांना बिनविरोध करून अनोखी भेट दिल्याचे सांगितले. व्यापार मतदारसंघातून विश्वनाथ म्हेत्रे,रेवणसिध्द पाटील, सिध्दाराम येगदी यांनी अर्ज माघारी घेतल्याने आपोआपच उर्वरित दोघे बिनविरोध निवडून आले आहेत.
दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघासाठी १०, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघासाठी ५, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ४,सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी-३१,सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण महिला गटासाठी ८, सहकारी संस्था मतदारसंघ इतर मागासवर्ग गट ४, सहकारी संस्था मतदारसंघ भटक्या जाती जमाती ६, व्यापारी मतदार संघातून ५ तर हमाल तोलार संघासाठी ४ असे एकूण ७७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
एकूण दाखल ७९ अर्जापैकी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचे ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार सिध्देश्वर गंगोडा यांचे शेत नसल्याचे कारणाने दोन अर्ज नामंजूर झाले. उर्वरित ७७ अर्जापैकी माघार घेण्याचा गुरुवारी पहिल्या दिवशी व्यापार मतदार संघातून तीन व हमाल आणी तोलार मतदार संघातून दोन असे एकूण ५ अर्ज माघारी घेतले. गुरुवारी पर्यंत ७२ अर्ज शिल्लक होते. दुधनी बाजार समिती साठी ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असुन २१ एप्रिलला उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल व ३० एप्रिलला मतदान होणार आहे व ३० एप्रिललाच पाच वाजता मतमोजणी होणार आहे.
दुधनी साठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रकाश नालवार हे काम पाहत आहेत. दरम्यान दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर दुधनी व पंचक्रोशीत म्हेत्रे समर्थकांनी जल्लोष केला.
○ अक्कलकोट बाजार समिती सारखी हालत नको, नाराजीचा सूर…!
सद्यस्थितीत अक्कलकोट तालुक्यात दोन मार्केट कमिटी कार्यरत आहेत. अलीकडच्या काळात दुधनी मार्केट कमिटीकडे शेतकऱ्यांचा मोठा ओढा लागला आहे. याउलट अक्कलकोट मार्केट कमिटीतील नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. आगामी काळात याचे पडसाद काय असतील हे निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.